समाजवादी दिखाऊपणा !

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना ‘देशाचे युवा नेते’ म्हणून सगळेच ओळखतात. असे असले, तरी त्यांचा निधर्मीपणा, हिंदुद्वेष आणि मुसलमानधार्जिणेपणा हिंदूंसाठी नवीन नाही. सद्य:स्थितीत सर्वत्र वाढत जाणारे आणि भारावणारे हिंदुत्वाचे वातावरण पहाता यादव महाशयांनीही त्यात उडी घेतली, तर नवल ते काय ? कारण वहात्या पाण्यात हात कसे धुऊन घ्यायचे (आपली प्रतिमा उंचावू पहायची), हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. हाच हेतू बाळगून त्यांनी हिंदूंच्या बाजूचे असल्याचे दाखवत म्हटले, ‘‘आम्ही रामभक्त आणि कृष्णभक्त आहोत. मी भगवान श्रीरामाची पूजा करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसह लवकरच अयोध्येला जाणार आहे.’’ अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आहेत. हा पक्ष कसा आहे, हे जनतेला वेगळे सांगायची आवश्यकताच नाही. ज्या पक्षाने राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडवली होती, ज्यांच्या सत्ताकाळात तेथे ४५७ मोठ्या दंगली झाल्या, त्या पक्षाच्या अध्यक्षाला ‘मी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा भक्त’ असे म्हणून घेण्याचा अधिकारच काय ? ज्या भगवंताची आपण आराधना करतो, त्याच्या आज्ञेनुसार आपण आचरणही करत असतो. तसे झाल्यासच भगवंत आणि भक्त हे अद्वितीय नाते निर्माण होते. श्रीरामाच्या वेळी रामराज्य होते. ते अजूनही आदर्श मानले जाते. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामामुळे प्रजा सुखी, समाधानी, आनंदी, बुद्धीमान, तसेच ज्ञानी होती. भय, क्रोध, मत्सर हे रिपू तर कुणालाही स्पर्शत नव्हते. श्रीकृष्ण हाही सर्वश्रेष्ठ राजकारणी होता; कारण तो कधीच राष्ट्रकारण विसरला नाही. त्याने समाजकारणही केले. त्यामुळेच त्यालाही आदर्श मानले जाते. प्रजाजनांची श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा होती. ‘यथा राजा तथा प्रजा’ याप्रमाणे श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या काळातील जनता आदर्शवत् होती. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावरून अखिलेश यादव यांच्या विधानांचा तुलनात्मक विचार केला, तर भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना स्वतःच्या पक्षात स्थान देऊन त्या पक्षाच्या पक्षाध्यक्षाने स्वतः ‘भक्त’ असल्याचे सांगणे म्हणजे हास्यास्पद आहे. हा शब्दप्रयोग त्यांना अशोभनीयच आहे.

खायचे आणि दाखवायचे दात वेगळे !

यादव यांनी आणखी एक विधान केले होते, ‘भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर कुणाचाही अधिकार नाही. भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही आहेत.’ आज अनेक राजकीय पक्षांची स्थिती ‘ना घर का, ना घाट का’, अशी झाली आहे. असे असतांना देवाला राजकीय पक्षात बांधू पहाण्याचा काय अधिकार ? देवांवर कुणाचाही अधिकार नसतो. केवळ भक्त-भगवंत नाते खर्‍या अर्थाने अनुभवणारा भक्तच तो ‘अधिकार’ जाणू शकतो. अर्थात् तो अधिकार राजकीय नव्हे, तर आध्यात्मिक असतो. हिंदु, अध्यात्म आणि देवता यांचा काडीमात्र अभ्यास नसतांना हिंदुत्वाच्या समर्थनाचा देखावा करणार्‍यांनी स्वतःचे बुद्धीचातुर्य दाखवून काय उपयोग ? उलट असे बोलून यादव स्वतःचेच हसे करून घेत आहेत. वर्ष २०१७ मध्ये मुख्यमंत्रीपदावर असतांना अखिलेश यादव यांनी वाराणसी येथील विश्‍वनाथ मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले होते. तेव्हा पूजा करतांना ते नमाज पढण्यासाठी बसतात, तसे बसले होते. पुजार्‍यांनी जाणीव करून दिल्यावर ते मांडी घालून बसले. ‘खायचे आणि दाखवायचे दात वेगळे’ या म्हणीचा प्रत्ययच यादव यांच्या कृतीतून दिसून आला होता. वर्ष २०१९ च्या निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव श्रीकृष्णाची ५० फुटांची काशाची मूर्ती सिद्ध करत होते. तेव्हा त्यांच्याच पक्षाच्या एका माजी नेत्याने ‘अखिलेश यादव आता हिंदु मतपेढीसाठी श्रीकृष्णाचा जप करू लागले आहेत’, अशी टीका केली होती. त्यामुळे आताही त्यांनी केलेली श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याविषयीची विधाने पहाता हिंदूंनी हुरळून जाऊ नये. अखिलेश यादव यांनी अयोध्येच्या विकासासाठी त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात केलेल्या विविध कामांची सूचीही वाचून दाखवली; पण केवळ कामांची सूची दाखवून काय साध्य होणार ? अयोध्येचा विकास नेमका कुणी केला ? रामजन्मभूमीला खर्‍या अर्थाने न्याय कुणी मिळवून दिला ? हे न समजायला जनता काही दूधखुळी नाही. ऐतिहासिक निकालानंतर अयोध्या येथील भूमीचे आध्यात्मिक महत्त्व विश्‍वात पसरू लागले. त्यानंतर जागे होऊन तेथील विकासाचे श्रेय अखिलेश यादव स्वतःकडे लाटू पहात आहेत. स्वतःच्या सत्ताकाळात काहीही करायचे नाही आणि उसनी कर्तबगारी दाखवत स्वतःचीच मखलाशी करायची, हा दिखाऊपणा किती दिवस चालणार ? निधर्मीवादाचा टेंभा मिरवणार्‍या; पण अनेकदा हिंदूंवर अन्याय करून अन्य धर्मियांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देणार्‍या अखिलेश यादव यांच्या सर्वच विधानांवर कोण विश्‍वास ठेवणार ? काही वर्षांपूर्वी उत्तरप्रदेश येथील अलीगढ मुस्लिम विद्यापिठात आतंकवादी महंमद अफजल याच्या समर्थनार्थ ‘भारत मुर्दाबाद’ अशा घोषणा दिवसभर देण्यात आल्या. भारतीय संसदेवर ज्याने आक्रमण केले, ज्याने देशाच्या विरोधात युद्ध पुकारले, सर्वोच्च न्यायालयाने ज्याला फाशीची शिक्षा दिली, त्या महंमद अफजल याचा उदोउदो होऊनही अखिलेश यादव सरकारने त्याकडे कानाडोळा केला होता. त्या दांडगाईला वेळीच रोखले नाही. हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर नव्हे का ? या आणि अशा सर्वच घटनांमधून अखिलेश यादव यांचा खरा (ढोंगी) तोंडवळा समोर येतो.

खोटारडेपणा ओळखा !

आज हिंदुत्वाचे सामर्थ्य प्रत्येक जण जाणतो. त्या प्रचंड सामर्थ्यापुढे प्रत्येकाला झुकावेच लागते; मात्र तात्कालिक परिस्थितीत हिंदूंच्या बाजूने उभे रहाण्यापेक्षा खर्‍या अर्थाने देशहित जाणून त्यानुसार कृतीशील होणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदी यांनी जसे देशहित जाणले, तसे अखिलेश यादव यांसारख्या युवा नेत्यांना ते जाणता येईल का, याचे उत्तर सूज्ञ जनतेला, म्हणजेच हिंदु समाजाला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे खोटारडेपणा करणार्‍या अशा नेत्यांवर विश्‍वास ठेवायचा कि नाही, हे हिंदूंनी ठरवावे. प्रत्येक वेळी हिंदूंच्या देवतांची नावे घेऊन आणि ‘भक्त’पणाचा आव आणून सत्ताकारण करता येत नाही, हे अखिलेश यादव यांनी लक्षात घेऊन श्रीरामाप्रमाणे आदर्श ‘रामराज्य’ आणण्यासाठी अन् श्रीकृष्णाप्रमाणे आदर्श राष्ट्रकारण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे !