अमली पदार्थांच्या प्रकरणी जामिनावर असलेल्या कन्नड अभिनेत्री संजल गुलरानी यांचे बलपूर्वक धर्मांतर

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांची तक्रार

अभिनेत्री संजना गुलरानी

बेंगळुरू (कर्नाटक) – अमली पदार्थांच्या प्रकरणी ३ मास कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर सुटलेल्या अभिनेत्री संजना गुलरानी यांचे त्यांच्या इच्छेविरुद्ध एका मौलवीने इस्लाममध्ये धर्मांतर केले आहे, अशी तक्रार हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनी येथील कॉटनपेटे पोलीस ठाण्यात केली आहे.

१. अधिवक्ता अमृतेश यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संजना यांना ९ ऑक्टोबर २०१८ या दिवशी हिंदु धर्मातून इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांचे ‘महिरा’ असे नामकरणही करण्यात आले आहे. त्याला पुरावा म्हणून नामकरण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे; परंतु हे धर्मांतर अभिनेत्रीच्या इच्छेविरुद्ध करण्यात आल्याचे एफ्.आय.आर्. नोंदवण्यात आला आहे.

२. या संदर्भात कॉटनपेटे पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेऊन पुढची कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.

३. संजना यांनी कार्डियालॉजिस्ट डॉ. अजीज यांच्याशी विवाह केला असल्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले होते. त्यावेळी संजना यांचे दारुल उलूम शाह वलीउल्लामध्ये असलेल्या दस्तावेजानुसार धर्मांतर करून त्यांचे नामांतरदेखील करण्यात आल्याचे पुरावे मिळाल्याचे सांगण्यात आले होते.