ब्रिटनमध्ये दोघांवर अ‍ॅलर्जीमुळे कोरोना लसीचा दुष्परिणाम

अ‍ॅलर्जी असणार्‍यांना लस न देण्याचा निर्णय

लंडन – ब्रिटनमध्ये फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली कोरोनावरील लस देण्याला प्रारंभ झाला असतांना या लसीमुळे दोघांची प्रकृती बिघडली आहे. हे दोघेही जण  आरोग्य कर्मचारी आहेत. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने (एन्.एच्.एस्.ने) सांगितले, ‘या लसीमुळे झालेले दुष्परिणाम हे अ‍ॅलर्जीमुळे झाले आहेत.’ या प्रकारानंतर आता ब्रिटनच्या आरोग्य विभागाने सूचना देतांना, ‘ज्या नागरिकांना, लस, औषध अथवा इतर प्रकारची अ‍ॅलर्जी असल्यास त्यांनी फायजरची लस घेऊ नये.’ लसीकरण चालू असलेल्या रुग्णालयांमध्ये ही सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे अ‍ॅलर्जी असलेल्या नागरिकांना आता लस देण्यात येणार नाही.

ब्रिटीश मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रोडक्टस रेग्युलेटरीनुसार ब्रिटनमध्ये ७० लाख लोकांना खाद्यपदार्थ, औषध आणि लस यांची अ‍ॅलर्जी असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांना आता फायजरची लस देता येणार नाही.