‘टॉप सिक्युरिटी’चे मालक अमित चांदोले यांची न्यायालयीन कोठडी रहित

मुंबई – आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले ‘टॉप सिक्युरिटी’ आस्थापनाचे मालक अमित चांदोले यांची न्यायालयीन कोठडी मुंबई उच्च न्यायालयाने रहित केली आहे. त्यामुळे अमित चांदोले यांची कोठडी अंमलबजावणी संचालनालयाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमित चांदोले यांच्या अटकेनंतर विशेष न्यायालयाने ‘अमित चांदोले यांची अंमलबजावणी संचालनालयाकडील कोठडी वाढवून देऊ नये’, असा आदेश दिला होता. या आदेशाच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई उच्च न्यायालयाकडे याचिका केली होती. अमित चांदोले आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने अमित चांदोले यांची कोठडी मागितली आहे.

यापूर्वी चांदोले यांनी या प्रकरणात प्रताप सरनाईक यांचे नाव घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडून दबाव आणला जात असल्याचे न्यायालयात म्हटले होते. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे केलेल्या तक्रारीमध्ये अमित चांदोले यांनी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी सुरक्षारक्षक पुरवण्याचे रुपये १७५ कोटी रुपयांचे कंत्राट घेतले; मात्र कोणतीही सुविधा न घेता पैसे लाटल्याचा आरोप केला आहे. याविषयी अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण चालू आहे.