पोलीस दलात परीक्षेसाठी बनावट उमेदवार देणार्‍या सूत्रधारास अटक 

बेळगाव – कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलामध्ये हवालदार आणि आय.आर्.बी. नेमणुकीसाठी २२ नोव्हेंबर या दिवशी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला बनावट उमेदवारांनी परीक्षा दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. बेळगाव शहरात ४ परीक्षा केंद्रांवर ४ बनावट उमेदवारांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर बनावट उमेदवारांना सिद्ध करणारा मुख्य संशयित लक्ष्मण परवण्णावर याला बेंगळुरू येथील बसवणगुडी पोलिसांनी अटक केली आहे. (या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक आहे. – संपादक)

या प्रकरणी ओळखपत्र आणि अन्य कागदपत्रे सिद्ध करणारा बसवराज गुंड्यागोळ याचा पोलीस शोध घेत आहेत. लक्ष्मण परवण्णावर याने विविध खात्यांमध्ये रिक्त असणार्‍या पदांसाठी घेण्यात येणार्‍या पदांसाठीच्या परीक्षांमध्ये बनावट उमेदवार बसवून लाखो रुपये उकळल्याची माहिती पोलीस अन्वेषणातून समोर आली आहे. बेळगाव परिसरात अनेक जणांना परीक्षेला बसण्यासाठी त्याने पैसे दिले आहेत. बेळगावात पोलीस भरतीसाठी झालेल्या परीक्षेत भीमशी महादेव हुल्लोळी, सुरेश लक्ष्मण कडबी, आनंद हणमंत वडेयर, मेहबूब बाबासाब अक्किवाट या ४ बनावट उमेदवारांना अटक करण्यात आली आहे.