देवस्थान सहलीचे ठिकाण नसल्याने तिथे साधन-शुचिता पाळायलाच हवी ! – ब्राह्मण महासंघ महिला आघाडी, पुणे

पुणे – मंदिरात दर्शनास येणार्‍या भाविकांनी वस्त्रसंहिता पाळावी, असे आवाहन शिर्डी देवस्थानद्वारे करण्यात आले आहे. हे अतिशय योग्य असून ब्राह्मण महासंघ महिला आघाडीचा या निर्णयास पूर्ण पाठिंबा आहे. देवस्थान सहलीचे ठिकाण नसल्याने तिथे साधन-शुचिता पाळायलाच हवी, असे स्पष्ट मत ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने व्यक्त केले आहे. येथील पत्रकार भवन येथे ब्राह्मण महासंघाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी धर्मविरोधकांच्या आवाहनाला विरोध करत ‘अशी आवाहने केवळ प्रसिद्धीसाठी केली जात आहेत’, असे सांगितले.

या परिषदेला ब्राह्मण महासंघाच्या विश्‍वस्त सौ. रसिका घाणेकर, प्रदेश महिला समन्वयक सौ. तृप्ती तारे, प्रदेश पदाधिकारी सौ. सुमन कुलकर्णी, पुणे जिल्हा अध्यक्ष सौ. मधुरा बर्वे, पुणे शहर अध्यक्ष अधिवक्ता नीता जोशी, युवती अध्यक्ष क्रांती गोखले यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विरोधकांनी आंदोलन आदी केल्यास ‘ब्राह्मण महासंघ महिला आघाडी त्यांना तसेच उत्तर देईल’, अशीही चेतावणी महासंघाने दिली आहे.

हिंदु संस्कृतीला विरोध करणारे लोक, हे विदेशी संस्कृतीचे दलाल ! – हिंदुभूषण ह.भ.प श्याम महाराज राठोड

शिर्डी देवस्थानने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. असा निर्णय या आधीच होणे आवश्यक होते. मंदिरात गेल्यानंतर सात्त्विकता ग्रहण करण्यासाठी वस्त्रसंहितेचे पालन व्हायला हवे. केवळ हिंदु संस्कृतीला विरोध करणे, हे काही धर्मविरोधक लोकांचे कार्य आहे. असे लोक डाव्या विचारधारेचा प्रसार करत आहेत. शनीशिंगणापूर येथेही विरोधकांना हिंदूंच्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले. इथेही हिंदू संघटितपणे विरोध करतील. जे हिंदुत्वाला मानत नाहीत त्यांनी आंदोलन करणे चुकीचे आहे. हिंदु संस्कृतीला विरोध करणारे हे लोक विदेशी संस्कृतीचे दलाल आहेत. हिंदूंनी मात्र संघटित रहावे आणि धर्मपालन करावे, असे प्रतिपादन हिंदुभूषण ह.भ.प श्याम महाराज राठोड यांनी केले.