उत्तराखंडमधील भाजप शासन आंतरधर्मीय विवाह करणार्‍यांना ५० सहस्र रुपये देण्याचा निर्णय रहित करणार

उत्तराखंड सरकारचा अभिनंदनीय निर्णय !

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील भाजप शासन अन्य धर्मामध्ये विवाह करणार्‍या दांपत्याला ५० सहस्र रुपये प्रोत्साहन स्वरूपात देण्याची योजना रहित करणार आहे. हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर टीका केल्यामुळे आता ही योजना केवळ आंतरजातीय जोडप्यांनाच लागू होईल. आंतरधर्मीय जोडप्यांना याचा लाभ मिळणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केली आहे. तसेच ‘वरील आदेश ज्यांनी काढला त्यांची चौकशी करण्यात येईल’, असेही त्यांनी सांगितले. ही योजना पूर्वीपासून लागू असून पूर्वी त्यासाठी १० सहस्र रुपये देण्यात येत होते.

उत्तराखंड शासनाने वर्ष २०१८ मध्ये धर्मस्वातंत्र्य कायदा केला त्यानुसार अवैध धर्मांतरावर बंदी घालण्यात आली होती. ‘वरील योजना आणि हा कायदा परस्पर विरोधी आहेत’, असे हिंदु संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या ध्यानी आणून दिले. तसेच ‘वरील योजना राबवणे हे एक प्रकारे ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे’, असे म्हटले होते.