औरंगजेबाच्या कबरीभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात !

विहिंप आणि बजरंग दल यांची करसेवा करण्याची चेतावणी

औरंगजेबाची कबर

छत्रपती संभाजीनगर – खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्यात येईल, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी दिली आहे. पुणे येथे नुकत्याच घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत विहिंप आणि बजरंग दल यांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, औरंगजेबाची कबर गुलामगिरी, लाचारी आणि अत्याचार यांची आठवण करून देणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ती लवकरात लवकर काढावी. १७ मार्च या दिवशी कबर हटवण्यासाठी सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलन केले जाणार आहे, असेही या वेळी सांगण्यात आले. तसेच या वेळी ‘औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्यात येईल’, अशी चेतावणीही देण्यात आली होती.

या चेतावणीमुळे कबरीजवळ मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे ११५ शस्त्रधारी सैनिक, दंगल नियंत्रण पथकाचे २५ पोलीस आणि ६० पोलीस अंमलदार नियुक्त करण्यात आले आहेत. कबर परिसरात जातांना २ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. कबरीजवळ जाणार्‍या पर्यटकांची कसून पडताळणी करण्यात येत आहे. पोलिसांच्या समवेत पुरातत्व विभागाचेही कर्मचारी तैनात केले आहेत.

पुणे येथे पतित पावन संघटनेची निदर्शने !

औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी पुणे येथे पतित पावन संघटनेने निदर्शने केली. या वेळी औरंगजेबाच्या चित्राचा फलक जाळण्यात आला.

हिंदुत्वनिष्ठ मिलिंद एकबोटे यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेशबंदी

समस्त हिंदु आघाडीचे श्री. मिलिंद एकबोटे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन कबर उखडून टाकण्याची चेतावणी दिली असल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील काही दिवस प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका :

अशी चेतावणी का द्यावी लागते ? सरकार आणि प्रशासन यांनी स्वत:हूनच हिंदु जनभावनांचा विचार करावा. तसेच अत्याचारी शासकाच्या उदात्तीकरणाच्या सर्व पाऊलखुणा पुसण्याचे राष्ट्रीय कार्य पूर्णत्वास न्यावे, असेच विहिंप, बजरंग दल यांच्यासमवेतच सर्वत्रच्या राष्ट्रप्रेमी आणि हिंदु धर्मप्रेमी संघटना अन् जनता यांना वाटते !