प्रदूषणाचे कारक

विश्‍वाच्या विनाशाला कारणीभूत असलेली समस्या कोणती असेल, तर प्रदूषण ! सर्व प्रकारच्या प्रदूषणांनी टोक गाठले आहे. अनेक घटकांना दूषित करण्याचे काम गेल्या काही दशकांत झपाट्याने चालू झाले आहे. आधुनिक उपकरणांचा उपयोग आणि प्लास्टिकचा बेसुमार वापर ही या सर्व प्रकारच्या प्रदूषणांची महत्त्वपूर्ण कारणे आहेत. सध्या एव्हरेस्ट पर्वतावरील बर्फात प्लास्टिकचा अंश सापडल्याने वैज्ञानिक चिंतेत आहेत. एव्हरेस्टवर चढाई करणे, हे कित्येक गिर्यारोहकांचे स्वप्न असते. तेथे असलेल्या प्रतिकूल नैसर्गिक स्थितीमुळे फार थोड्या जणांनाच एव्हरेस्ट सर करणे शक्य होते. मानवांचा अत्यल्प वावर असलेल्या अतिदुर्गम ठिकाणच्या बर्फाच्या नमुन्यांमध्ये प्लास्टिकचा अंश सापडणे, ही विनाशाची गंभीर चेतावणी आहे. गेल्या वर्षी पॅसिफिक समुद्रातील ‘मरियाना ट्रेंच’ या पृथ्वीवरील सर्वांत सखोल विवराच्या तळाशी प्लास्टिक सापडले होते. आता हे सर्वांत उंचावर सापडले आहे. गावोगावच्या गटारे तुंबण्याचे कारण, नद्या-नाले तुंबून प्रत्येक पावसाळ्यात गावे-शहरे जलमय होण्याचे कारण, निळ्याशार समुद्रावर बेसुमार कचरा साठण्याचे कारण प्लास्टिकच आहे. आज माशांच्या कल्ल्यांत, गायी-गुरांच्या पोटात प्लास्टिकचा कचरा सापडतो. मानवाच्या बेशिस्तीविषयी अनेकदा चर्चा झाली आहे. यावरून लक्षात येते की, प्लास्टिकच्या कचर्‍याने केवळ मानवी जीवनच नाही, तर सर्व सजीव-निर्जीव सृष्टीला घेरले आहे. एकेकाळी पृथ्वीतलावर अस्तित्वात नसलेला हा प्लास्टिक नावाचा पदार्थ आता इतका फोफावला आहे की, प्लास्टिकशिवाय जीवनाचा विचारच आपण करू शकत नाही. आतापर्यंत प्लास्टिकचे धोके अनेक स्तरांवर सांगितले गेले; मात्र प्लास्टिकच्या वापरावर कठोर निर्बंध घालण्यासाठीचे प्रयत्न तात्कालिक ठरतात.

मानवी विचारांतील प्रदूषण

येथे केवळ प्लास्टिकच नाही, तर सर्व प्रकारच्या प्रदूषणांचा विचार होणे आवश्यक आहे. भूमीप्रदूषण, वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण या काही आपोआप घडणार्‍या नैसर्गिक प्रक्रिया नाहीत. त्यामागे मानवाचे चुकीचे क्रियमाण आहे. त्या टाळता येऊ शकणार्‍या चुका आहेत. असे असूनही कुणीच त्याचा किंचितही विचार करत नाही. त्यामुळेच प्रदूषणाच्या समस्येचा विचार करतांना प्रशासकीय धोरणे, सरकारने काय करायला हवे, आंतरराष्ट्रीय स्तरावर काय करायला हवे, यांसह हे सर्व होण्यासाठी कारणीभूत असलेल्या मानवाच्या विचारांतील प्रदूषणाची गांभीर्याने नोंद घेणे आवश्यक आहे.

फार मोठी उदाहरणे ऐकली की, ‘आपण त्या गावचे नाही’, असे वाटते; पण त्या मोठ्या जागा प्रदूषित होण्यासाठी आपण नित्य जीवनात करत असलेल्या अनेक चुकीच्या कृती कारणीभूत असतात. अशा समस्यांवर नेहमीच जागतिक स्तरावर चर्चा होत असते. प्रबंध सादर केले जातात, चर्चासत्रे होतात, वर्तमानपत्रांतून मोठ-मोठे लेख छापून येतात, सोशल मिडियावर ‘ट्रेंड्स’ होतात. त्यातून समस्येचा परिणाम दिसून आला, तरी मुळात काय सुधारायचे आहे, याविषयी चर्चा होतांना दिसत नाही. असे सर्व प्रकारचे अधःपतन होण्यासाठी कुणी १-२ जण नाही, तर आपण सर्वजण कारणीभूत आहोत. त्या पलीकडे जाऊन जी स्वार्थी, आपमतलबी वृत्ती बोकाळली आहे, ती दूर करण्यासाठीही ऊहापोह झाला पाहिजे. ‘सगळे स्वतःला मिळायला हवे’, या हव्यासापोटी निसर्गाने पृथ्वीवर जी भरभरून उधळण केली आहे, ती कलियुगातील मानव ओरबाडून उपभोगत आहे. श्रीमंत पित्याच्या बिघडलेल्या मुलाने जशी पिढ्यान्पिढ्यांची संपत्ती उधळून टाकावी, त्याप्रमाणे गेल्या शतकात होत्याचे नव्हते केले गेले आहे. युगानुयुगे संपन्न असलेली ही धरती अशी बकाल होण्यासाठी कोण कारणीभूत आहे ? या चुकांसाठी पुढील पिढ्यांना आपण काय उत्तरे देणार आहोत ?

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या प्रदूषणासह मानवी आचार-विचार यांनाही प्रदूषित करण्याचे कार्य गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक केले जात आहे. पुरोगामित्वाच्या नावाखाली निसर्गाधारित जीवनपद्धत भोगवादी आणि यंत्राधारित करण्यासाठी षड्यंत्रपूर्वक प्रयत्न केले गेले. आता जे पर्यावरणाच्या नावे गळे काढत असतात, त्यातील किती जण निसर्गानुकूल जीवन जगतात ? केवळ काही मोहिमा काढून, अहवाल सादर करून किंवा कायदे करूनही हे प्रदूषण रोखता येणार नाही. सर्वत्र दिसणारे प्लास्टिक हा तर परिणाम आहे. समस्येचे मूळ वर्तनातील प्रदूषणात आहे. एव्हरेस्टची सुंदर अन् स्वप्नवत् शिखरे सर केल्यानंतर तेथे सोबतचा प्लास्टिकचा कचरा सोडून येण्याची दुर्बुद्धी होणे, हे मानवी आचार-विचारांत झालेले प्रदूषणच दर्शवत नाही का ? मरियाना ट्रेंचसारख्या सर्वांत खोल विवराच्या तळाशी प्लास्टिक जाण्यास नदी-नाल्यांमध्ये प्लास्टिकचा कचरा टाकण्याची निष्काळजी वृत्तीच कारणीभूत आहे ! हे आपल्या मानवी वर्तनातील प्रदूषण आहे. अनेक वैज्ञानिक, द्रष्टे विचारवंत, संत यांनी सांगितल्यानुसार संपूर्ण पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. आपले सारे जीवनच दूषित झाले आहे.

वैचारिक परिवर्तन आवश्यक !

आता जो दृश्य संकटकाळ दिसत आहे, तो वास्तविक संकटकाळ नसून ती निसर्गानेच आरंभलेली शुद्धीकरण प्रक्रिया आहे. निसर्ग त्याचे प्रदूषण स्वतःच दूर करील; त्याचे तडाखे मात्र मानवाला सोसावे लागतील. केवळ तेवढ्याने ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही. मानवाला स्वतःच्या आचार-विचारांत पालट करावाच लागेल. वृत्ती सुधारली की, सर्व स्तरांवर परिवर्तन घडते. त्यामुळेच अशा सर्व समस्यांचे मूळ दूर करण्यासाठी मानवाला स्वतःच्या वृत्तीत पालट करावा लागेल. आपण सारे जण तीव्र आपत्काळाच्या उंबरठ्यावर आहोत. अशा वेळी सामाजिक जीवन जगण्यासाठी मारक ठरणारे दुर्गुण त्यागले नाहीत, तर आपले भवितव्य अंधारातच आहे. मानवाच्या चुकांची शिक्षा निसर्गाने अनेकदा त्याला दिलेली आहे. येणारा भविष्यकाळ हा केवळ निसर्गनिर्मित नाही, तर नियतीने कालबद्ध केलेला आहे. प्रत्येकाला त्याला सामोरे जावे लागणार आहे. त्याची पूर्वसिद्धता म्हणून तरी मानवाला स्वार्थी, निष्काळजी आणि उन्मत्त वृत्ती त्यागावी लागेल. निसर्गानुकूल जीवनपद्धत अंगीकारावी लागेल. सामाजिक वर्तनात सुधारणा करावी लागेल. एकदा मानवी आचार-विचारांतील प्रदूषण दूर झाले; म्हणजेच वृत्तीत परिवर्तन घडले की, प्रत्यक्ष प्रदूषण दूर होण्यास वेळ लागणार नाही !