गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार्‍यांची आजपासून ‘स्क्रिनिंग टेस्ट’ केली जाणार ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

  • कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा निर्णय

  • कोरोना अहवाल सकारात्मक येणार्‍यांना कोविड केअर सेंटरमधील सर्व खर्च करावा लागणार

  • प्रतिदिन गोव्यात कामानिमित्त ये-जा करणार्‍यांची होणार तपासणी

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने २३ नोव्हेंबर २०२० या दिवशी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार देहली,  राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यांतून महाराष्ट्रात प्रवेश करणार्‍यांची ‘स्क्रिनिंग टेस्ट’ करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने २५ नोव्हेंबर २०२० पासून गोवा राज्याच्या सीमेवर कार्यवाही चालू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी २४ नोव्हेंबरला बैठक घेतली. या बैठकीस संबंधित प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचना ..

१. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रादेवी येथे महसूल विभाग, पोलीस आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांची मिळून ३ पथके तैनात करण्यात यावीत.

२. दोडामार्ग येथे २ आणि सातार्डा, आरोंदा, रेड्डी अन् आयी या ठिकाणी प्रत्येकी १ पथक तपासणीसाठी तैनात करण्यात यावे.

३. ताप आदी लक्षणे असलेल्या प्रवाशांची ‘अँटिजेन टेस्ट’ करावी, जर तपासणी सकारात्मक (पॉझिटीव्ह) आली, तर संबंधितांना नजिकच्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवावे.

४. कोविड केअर सेंटरमधील सर्व खर्च हा संबंधित प्रवाशांनी करावयाचा आहे. त्या दृष्टीने महसूल आणि आरोग्य यंत्रणा यांनी समन्वय साधून काम करावे.

५. बांदा येथील प्रवाशांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे, तर दोडामार्ग येथील प्रवाशांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे तपासणीसाठी पाठवावे.

६. रेल्वेने योणार्‍या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात यावी. त्यासाठी कुडाळ, सावंतवाडी, कणकवली या स्थानकावर आरोग्य पथके तैनात ठेवावीत.

७. गोवा, गुजरात, राजस्थान आणि देहली या राज्यांमध्ये थांबा असलेल्या गाड्यांमधून जिल्ह्यात प्रवेश घेण्यापूर्वी ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा अहवाल नकारात्मक (निगेटीव्ह) असणे आवश्यक आहे. हा अहवाल प्रवाशांनी आपल्या सोबत ठेवावा.

८. ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ नमुना चाचणी सिंधुदुर्गात प्रवेश करण्यापूर्वी ९६ तासांच्या आत झालेली असावी. ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा नकारात्मक अहवाल नसलेल्या प्रवाशांच्या शरीराचे तापमान आणि कोरोनाच्या लक्षणांची तपासणी संबंधित रेल्वे स्थानकावर केली जाईल.

९. लक्षणे नसलेल्या प्रवाशांना घरी जाण्याची अनुमती दिली जाईल. ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील, त्यांची ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’ करण्यात येईल.

१०. विमानाने येणार्‍या प्रवाशांच्या माहितीसाठी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी गोवा विमानतळ प्रशासनाशी समन्वय ठेवावा आणि प्रवाशांची माहिती संबंधित तालुक्यातील तहसीलदार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे द्यावी.

११. प्रतिदिन कामानिमित्त आणि नोकरीनिमित्त गोवा राज्यात ये-जा करणार्‍यांचे ‘थर्मल स्कॅनिंग’ करावे.