भारताला क्षेपणास्त्र (मिसाईल) तंत्रज्ञानात अग्रणी देश बनवण्यात ‘ब्राह्मोस’ या क्षेपणास्त्राचा मोठा वाटा आहे. भूमी, जल आणि आकाश या तिन्ही स्थानांवरून सोडता येणे शक्य असणार्या ४५० कि.मी. हून अधिक अंतरापर्यंत मारा करू शकणार्या ब्राह्मोस या ‘सुपरसोनिक क्रूझ मिसाईल’ची चाचणी २४ नोव्हेंबरला करून भारताने शस्त्रसज्जतेतील आणखी एक पुढचा टप्पा गाठला आहे. ब्राह्मोसची मुख्य दोन वैशिष्ट्ये आहेत. ते अल्प उंचीवरून डागता येते आणि रडारच्या दृष्टीक्षेपात येण्यापासून वाचते. दुसरे म्हणजे ज्याला लक्ष्य केले आहे, त्याने त्याचा मार्ग पालटला, तर हे क्षेपणास्त्र त्याचाही मार्ग पालटते. रशियाच्या तांत्रिक साहाय्याने निर्माण केलेल्या या क्षेपणास्त्राच्या वाढलेल्या क्षमतेमुळे गेले काही दिवस भारताने वाढवलेल्या युद्धसज्जतेच्या सिद्धतेत एक पुढचे पाऊल टाकले गेले आहे. यापूर्वी निर्माण केलेली पृथ्वी, धनुष्य, अग्नी, प्रहार, प्रगती, त्रिशूळ, नाग आदी आण्विक क्षेपणास्त्रे आपल्याकडे आहेत. भारताने मागील वर्षी शत्रूचे उपग्रह पाडणारे क्षेपणास्त्र (ए-सॅट) निर्माण केले आहे. हेही एक महत्त्वाचे संशोधन मानले जाते, जे केवळ ३ देशांकडेच उपलब्ध आहे. भारत वर्ष १९७९ पासून विविध क्षेपणास्त्रे निर्माण करत आहे. वर्ष २००४ पर्यंत त्यातील ३० टक्के क्षेपणास्त्रे विशेष लांबवर मारा करता येतील, अशा पद्धतीची नव्हती. त्यानंतर त्यात पुष्कळ प्रगती झाली. ‘अग्नी व्ही’ हे ५ ते ८ सहस्र कि.मी.पर्यंत मारा करू शकेल, असे क्षेपणास्त्र निर्माण केले आहे. याच क्षमतेचे दुसरेही क्षेपणास्त्र निर्माण होत आहे. जगातील शक्तीशाली मानल्या गेलेल्या सैन्यामध्ये भारतीय सैन्य गणले जात असूनही आतापर्यंत भारताने क्षेपणास्त्राचा वापर केला आहे, असे मात्र झालेले नाही.
क्षेपणास्त्रांचा वापर कधी ?
अरुणाचलप्रदेश आणि लडाख येथील चीनला लागून असलेल्या सीमांवर ही ब्राह्मोस क्षेपणास्त्रे भारताने पूर्वीच आणूनही ठेवली आहेत. चीनकडून वारंवार दिल्या जाणार्या घुसखोरीच्या आव्हानामुळे या सीमावादाचे पर्यवसान कोणत्याही क्षणी प्रत्यक्ष युद्धात होऊ शकते, अशी स्थिती आहे. दुसरीकडे काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकने नेहमीप्रमाणे छुप्या मार्गाने आतंकवादी सोडण्याचे काम चालू ठेवले आहे. २३ नोव्हेंबरला आतंकवाद्यांना भारतात आणून पोचवणारे भुयार सैन्याने शोधून काढले. तेथे मिळालेल्या सर्व साहित्यावरून त्यातील पाकचा सहभाग पुन्हा एकदा पूर्णपणे उघड झाला. नेहमीप्रमाणेच पाकचे पितळ उघडे पडल्यावर त्याने सारवासारव करून वेळ मारून नेली. जागतिक पातळीवर ही गोष्ट भारताने परत एकदा चांगल्या पद्धतीने न्यायला हवी. अमेरिकेचे नवनिर्वाचित पंतप्रधान पाकधार्जिणे असल्याने पाकच्या कुरघोड्या वाढलेल्या असू शकतात; परंतु भारतही नेहमीप्रमाणे पाकला ‘जशास तसे’ उत्तर देण्यास सिद्धही आहे. येणार्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत अन्य देशांसमवेत युद्धसराव, सीमाभागातील गस्त वाढवणे, सीमाभागातील सैन्याला सर्व सुविधा पुरवणे आदी सातत्याने करत आहे. युद्ध कुणालाही परवडणारे नसतेच; परंतु संपूर्ण शांततेसाठी ‘युद्धाविना युद्धाच्या यातना प्रतिदिन सहन करणार्या’ भारताने शत्रूला अद्दल घडवण्याचा विचारच प्राधान्याने करायला हवा. केवळ क्षेपणास्त्र चाचणी पुरेशी नाही, तर आवश्यक त्या ठिकाणी क्षेपणास्त्रांचा वापर करून शत्रूला पाणी पाजण्यासाठी योग्य तो निर्णयही घ्यायला हवा. मोदी शासनाने आजपर्यंत शत्रूदेशांवर वचक ठेवण्यासाठी योग्य त्या कारवाया करून त्याला पिछाडीवर ठेवले आहे, यात वाद नाही; परंतु पाक आणि चीन यांच्या कुरघोड्या कायमस्वरूपी बंद होतील, अशी उपाययोजना हीच खर्या अर्थाने भारताच्या सर्व शस्त्रसज्जतेला न्याय देऊ शकेल. फिलिपाईन्ससारखे देश आपल्याकडून क्षेपणास्त्र विकत घेऊन त्याचा वापर करत आहेत. ‘भारत विस्तारवादी नाही’ हे सार्या जगाला ठाऊक आहे; पण ‘भारत सतत मार खाणाराही नाही’, हेही सार्या जगाला दिसूदे, असेही राष्ट्राभिमानी भारतियांना वाटते. ‘प्रतिदिन भारतात होणारी घुसखोरी आणि त्यामुळे क्षमता असूनही ‘आतंकवाद्यांकडून प्राण गमावणारे सैनिक’ ही स्थिती कायमस्वरूपी बंद व्हावी, अशी भारतियांची इच्छा आहे. भारतीय सैनिकांना मरणोत्तर सन्मान नको, तर विजयी होऊन त्यांनी जिवंतपणी सन्मान स्वीकारावेत, असे त्यांच्या घरच्यांनाच नव्हे, तर संपूर्ण देशाला वाटते. त्यामुळे जेव्हा जेव्हा नवनवीन शस्त्रास्त्रसज्जतेची वृत्ते येतात, तेव्हा ‘शक्तीमान असूनही किती दिवस दुबळ्याप्रमाणे जीवन कंठत रहायचे ?’, असा प्रश्न राष्ट्राभिमान्यांना वारंवार पडतो. भारताकडील युद्धसज्जतेचा योग्य तो वापर होऊन तो विश्वात विजयाचा ध्वज फडकावेल, हीच अपेक्षा आहे.