फोंडा, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालय फोंडा आणि शांताप्रसाद अद्वैतानंद न्यास शिरोडा यांच्या वतीने २२ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता शांताप्रसाद अद्वैतानंद सभागृह, चिकनगाळ, शिरोडा येथे चक्रीकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात कीर्तन विद्यालयातून शिक्षण घेणारे बाल कीर्तनकार प्रथमच कीर्तन करणार आहेत. या कार्यक्रमापासून त्यांच्या कीर्तनाचा प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला शिरोडा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री सुभाष शिरोडकर, डॉ. शिरीष बोरकर, जयंत मिरिंगकर आणि कीर्तनकार सुहास वझे उपस्थित रहाणार आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून संस्कार, सामाजिक एकता, भक्ती, मानवता वाढत आहे. अशा या कार्यक्रमात या सर्व मुलांचे कौतुक करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी सर्वांनी यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम करण्यात येईल, असे कीर्तन विद्यालयाचे दामोदर कामत यांनी कळवले आहे.