काँग्रेसची मुसलमानप्रेमी आणि राष्ट्रघातकी मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे. या वेळी काँग्रेसच्या विरोधी पक्षांनी नाही, म्हणजे भाजप, शिवसेना आदींनी नाही, तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेसची वरील मानसिकता सांगितली आहे. ओबामा यांचे आत्मचरित्र ‘अ प्रॉमिस्ड लॅण्ड’ प्रकाशित होणार आहे. त्यातील काही अंश समोर येत आहेत. त्यामध्येच याविषयी लिहिण्यात आले आहे. २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री पाकपुरस्कृत १० जिहादी आतंकवाद्यांनी मुंबईवर आक्रमण केले. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे.
त्यातील ताज हॉटेल आणि अन्य ठिकाणी आक्रमण झाले. पोलीस आणि कमांडो यांनी यांतील ९ आतंकवाद्यांना ठार केले, तर अजमल कसाब याला जिवंत पकडले. तो पकडला गेला म्हणून हे आक्रमण पाकने केल्याचे उघड होऊ शकले, अन्यथा ‘हे आक्रमण हिंदु आतंकवाद्यांनी केले’, असे भासावे, असा संपूर्ण कट पाकने रचला होता. तुकाराम ओंबळे या पोलिसाने प्राणांचे बलीदान देत कसाबला जिवंत पकडले. या आक्रमणात १५६ जणांचा मृत्यू झाला. त्यात अनेक विदेशी नागरिकही होते. इस्रायलच्या नागरिकांनाही यात लक्ष्य करण्यात आले होते. ‘इतके मोठे आतंकवादी आक्रमण होऊनही तत्कालीन काँग्रेस सरकारने पाकवर आक्रमण केले नाही. यामागे मुसलमान दुखावले जातील, त्यांच्या भावना दुखावल्या जातील, असे सरकारला वाटत होते’, असा गौप्यस्फोट ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात केला. भावना दुखावल्या गेल्यास काँग्रेसला मुसलमानांची मते मिळणार नाहीत आणि निवडणुकीत त्याची हानी होईल, असाच स्वार्थी विचार काँग्रेसने केला, हे यातून लक्षात येते. म्हणजेच देश आणि देशातील जनता यांपेक्षा मुसलमान अन् त्यांची मते यांचाच विचार काँग्रेसने त्या वेळी केला. मुळात हा विचार लोकमान्य टिळक यांचे देहावसान झाल्यानंतर काँग्रेसची सर्व सूत्रे मोहनदास गांधी यांच्या हातात आली तेव्हापासून चालू झाला. हिंदूंचा द्वेष करून मुसलमानांना मांडीवर बसवण्याचा आत्मघाती प्रकार काँग्रेसमध्ये तेव्हा चालू झाला, तो आजतागायत चालू आहे. यामुळे भारताची फाळणी झाली. त्या वेळी १० लाखांहून अधिक हिंदूंना ठार करण्यात आले. सहस्रो हिंदु महिलांवर बलात्कार झाले. त्यानंतर अर्धा काश्मीर पाकच्या घशात गेला. हे केवळ याच लांगूलचालनाचा परिणाम आहे. हा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे; मात्र ही मानसिकता आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्षही सांगत आहेत, यावरून आता देशातील तथाकथित बुद्धीवादी, पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी, तसेच पांढरपेशे हेही तोंडघशी पडले आहेत.
संसदेवरील आक्रमणानंतरही भारत शांत !
ओबामा यांच्या या गौप्यस्फोटानंतर अद्याप तरी काँग्रेसला विरोधी पक्षांकडून प्रश्न विचारण्यात आलेला नाही. यापूर्वी संसदेवर आतंकवाद झाल्यानंतर तत्कालीन भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने पाकवर आक्रमण केले नव्हते, हेही लक्षात घ्यायला हवे. त्या वेळी भारताने जवळपास ६ मास सैन्याला सीमेवर आणून ठेवले होते. तत्कालीन पंतप्रधानांनी ‘आरपार’च्या लढाईची घोषणाही केली होती; मात्र प्रत्यक्षात काहीही घडले नाही. नंतर सैन्याला माघारी बोलावण्यात आले. या माघारी मागे अमेरिकाच होती, हे समोर आले. अमेरिकेच्या दबावामुळे भारताने माघार घेत पाकवर आक्रमण केले नाही. या दोन्ही घटनांवरून लक्षात येते की, भारतियांमध्ये पाकवर आक्रमण करायची धमकच नाही. भारतावर गेली ३ दशके पाकपुरस्कृत आतंकवादी आक्रमणे करत आहे. यात सहस्रो नागरिक आणि सैनिक यांचे प्राण गेले आहेत, तरीही भारत पाकच्या विरोधात कागदी घोडे नाचवण्याच्या पलिकडे काहीही करत नाही. याला अपवाद ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअर स्ट्राईक’ हे होते; मात्र ते तात्कालीक उपाय झाले; पाकपुरस्कृत आतंकवाद ही मूळ समस्या कायम आहे. ती सोडवण्याचा कायमस्वरूपी प्रयत्न कुणी करण्याचे धाडस दाखवत नाही. आतंकवादावरून सर्वच राजकीय पक्ष मते मिळण्याचा प्रयत्न करतात; मात्र सत्तेवर आल्यावर गप्प बसतात, असेच जनतेला दिसून आले आहे. यामागे कारणे वेगवेगळी असली, तरी परिणाम एकच दिसतो.
मुळावर घाव घालणेच आवश्यक !
‘जिहादी आतंकवाद ही आता जागतिक समस्या झाली आहे. त्याचा निःपात करण्यासाठी सर्व जगाने एकवटले पाहिजे’, असे भारताकडून म्हटले जाते. असे असले, तरी भारत त्याचा निःपात करण्यासाठी काय करतो ? हा मुख्य प्रश्न आहे. श्रीलंकेमध्ये एक जिहादी आतंकवादी आक्रमण झाल्यावर श्रीलंकेने कठोर पावले उचलत मशिदी बंद करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रियामध्ये एक आतंकवादी आक्रमण झाल्यावर तेथील मशिदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. फ्रान्समध्ये आता कट्टरतावादी मुसलमानांच्या विरोधात कायदाच बनवण्यात येत आहे. त्यातून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. चीनने तर १० लाख उघूर मुसलमानांची इस्लामी जिहादी मानसिकताच नष्ट करण्याचा प्रयत्न चालू केला आहे, म्हणजेच काही देश यासाठी त्यांना जे वाटते, ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत काय करतो ? असा प्रश्न उपस्थित होतो. भारतात वर्ष १९८९ मध्ये काश्मीरमधून जिहादी आतंकवाद चालू झाला. तेथील मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवरून हिंदूंना धमक्या देण्यात आल्या. हिंदूंना त्यांच्या बायका आणि संपत्ती सोडून चालते होण्यास सांगण्यात आले. जे हिंदू गेले नाहीत, त्यांना ठार मारण्यात आले, तर महिलांवर बलात्कार करण्यात आले. साडेचार लाख हिंदूंना यामुळे पलायन करावे लागले, जे अद्याप तेथे परतू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. हिंदूंवर आक्रमण करणार्या एकाही धर्मांधावर खटला भरण्यात आलेला नाही, त्यामुळे त्यांना शिक्षा होण्याची गोष्ट तर दूरच राहिली. ज्या मशिदींवरून धमक्या देण्यात आल्या, त्यांच्यावरही कारवाई झाली नाही. आजही भारतात आतंकवाद्यांना मरदशांतून जिहादचे बाळकडू दिले जात असतांना त्यांच्यावर कारवाई होत नाही. काश्मीरमध्ये प्रतिदिन १-२ आतंकवादी ठार होतच असतात; पण त्यामुळे तेथील आतंकवाद नष्ट झालेला नाही. आजही तेथे राजकीय पक्षांच्या नेत्यांना आतंकवादी सहजरित्या ठार करू शकत आहेत. आजही पाकव्याप्त काश्मीरमध्ये शेकडो आतंकवादी प्रशिक्षण घेऊन भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त प्रसिद्ध होत असते. जोपर्यंत त्यांना आणि त्यांना प्रशिक्षण देणार्या यंत्रणेला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत हा आतंकवाद नष्ट होणार नाही. भारत जिहादी आतंकवादाच्या विरोधात लक्ष्यभेद करण्याचे धाडस दाखवत नाही, हेच सत्य आहे. अर्जुनाला माशाचा डोळाच दिसत होता, त्यामुळे तो लक्ष्यभेद करत विजयी झाला. आताच्या लोकांना केवळ मासाच दिसतो आणि त्यांचे बाण अन्यत्रच लागत आहेत. त्यामुळे जे साध्य करायचे आहे, ते होत नाही. ही स्थिती पालटली पाहिजे.