‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत योग्य आणि आवश्यक ते पालट करण्याचे निर्मात्यांसह वाहिनीच्या अधिकार्‍यांचे आश्‍वासन !

निर्माते महेश कोठारे, लेखक विठ्ठल ठोंबरे, ‘स्टार प्रवाह’चे अधिकारी यांच्याशी जोतिबा  डोंगर येथील पुजारी, ग्रामस्थ, अभ्यासक यांची मुंबई येथे चर्चा

निर्माते महेश कोठारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी जातांना जोतिबा डोंगर येथील पुजारी, ग्रामस्थ, अभ्यासक, आणि अन्य
निर्माते महेश कोठारे यांच्यासह जोतिबा डोंगर येथील पुजारी, ग्रामस्थ, अभ्यासक, आणि अन्य

कोल्हापूर – ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत योग्य आणि आवश्यक ते पालट करण्यात येतील, यांविषयी ग्रामस्थांशी चर्चा करू, असे आश्‍वासन मालिकेचे निर्माता महेश कोठारे, लेखक विठ्ठल ठोंबरे, ‘स्टार प्रवाह’चे अधिकारी यांनी दिले. १८ नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे वरील सर्वांशी जोतिबा डोंगर येथील पुजारी, ग्रामस्थ, ‘केदार विजय’ ग्रंथाचे अभ्यासक, विश्‍वशक्ती मित्र मंडळ, जोतिबा युवक क्रांती संघटना, उत्कर्ष समिती, तसेच मान्यवर यांनी चर्चा केली. या वेळी वरील आश्‍वासन देण्यात आले. या वेळी शालिनीताई ठाकरे उपस्थित होत्या. (जोतिबा देवतेविषयी असलेल्या मालिकेत चुकीची माहिती दाखवल्यानंतर त्याविषयी आवाज उठवणारे सर्वच भाविक, पुजारी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, गुरव समाज आणि सामान्य हिंदू यांचे अभिनंदन ! आतातरी शासनाने यात लक्ष घालून यापुढे कोणत्याही देवता किंवा ऐतिहासिक विषयांवर मालिका बनवतांना त्यांतील संदर्भ अन् इतिहास हा योग्य आहे ना, याची पडताळणी केल्याशिवाय अशा मालिकांना मान्यता मिळू नये, यासाठी यंत्रणा उभारावी ! – संपादक)

या संदर्भात अधिक माहिती अशी की

१. कोट्यवधी हिंदु भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जोतिबा देवतेवर आधारित ‘दख्खनचा राजा जोतिबा’ नावाने २३ ऑक्टोबरपासून ‘स्टार प्रवाह’ या मराठी वाहिनीवर मालिका दाखवण्यात येत आहे.

२. या मालिकेत अनेक विपर्यास करणारे प्रसंग दाखवण्यात येत असून अत्यंत ज्योतिबा देवाच्या संदर्भात आयुधे, भाषा आदी अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत आहेत. मालिकेतील वेशभूषा, तसेच व्यक्तिरेखा या ही अत्यंत चुकीच्या असून आजपर्यंत दाखवण्यात आलेले कथानक हेही चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत आहे. यामुळे  अनेक भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि भक्तांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.

३. यामुळे संतप्त झालेल्या भाविकांनी आंदोलन छेडले. प्रारंभी गुरव समाज, भाविक, ग्रामस्थ यांच्या वतीने स्थानिक सरपंच राधाताई बुणे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जोतिबा गडावर निदर्शने करण्यात आली. विश्‍वशक्ती मित्र मंडळ यांनीही महेश कोठारे यांना निवेदन दिले.

४. श्री शिवप्रतिष्ठान , हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन त्यांनाही विश्‍वशक्ती मित्र मंडळाच्या वतीने २ नोव्हेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी पू. भिडेगुरुजी यांनी ‘या प्रकरणात लक्ष घालून सर्व प्रश्‍न आणि अडचणी मार्गी लावू’, असे सांगून आश्‍वस्त केले होते.

५. ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत चुकीची माहिती दाखवून भक्तांच्या भावना दुखावल्याविषयी ‘कोठारे व्हिजन प्रा.लि.’वर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, जोतिबा देवस्थान येथील पुजारी, भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने १२ नोव्हेंबर या दिवशी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. मालिकेत अशा प्रकारे दाखवण्यात येणारा कोणत्याही प्रकारचा खोटा इतिहास आम्ही सहन करणार नाही, अशी चेतावणीही या प्रसंगी देण्यात आली होती.

६. या कालावधीत जोतिबा देवाचे असंख्य भक्त, हिंदुत्वनिष्ठ संघटना, भाविक यांनीही निवेदन, सामाजिक माध्यम, तसेच विविध माध्यमांद्वारे आवाज उठवला होता.

७. अखेर या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबईत झालेल्या बैठकीत भाविकांच्या भावनांचा विचार होऊन निर्माते महेश कोठारे यांना मालिकेत योग्य ते पालट करण्याचे मान्य करावे लागले.