बनावट नोटांसह देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद !

अजूनही ५०० रुपये चलनाच्या बनावट नोटा सापडणे हे गंभीर आहे. या नोटा आता कोठून आल्या हे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

सातारा, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – कराड तालुक्यातील कोळेवाडी येथे ९४ सहस्र ५०० रुपयांच्या बनावट नोटा आणि देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ठाणे गुन्हे शाखा आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.

ठाणे येथील पोलिसांना याविषयी गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना सांगितली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेषांतर करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचून ३ जणांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे २ सहस्र रुपये आणि ५०० रुपये चलनाच्या एकूण ९४ सहस्र ५०० रुपये मूल्याच्या बनावट नोटा अन् देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. या व्यक्तींच्या विरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.