निवडणूक निकालाच्या विरोधात आठवड्यानंतर ट्रम्प समर्थकांचे आंदोलन : पोलिसांशीही झटापट

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल घोषित होऊन आता आठवडा झाला आहे; परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निकाल अजूनही स्वीकारलेला नाही. पेनसिल्व्हेनिया, नेवादा यांसारख्या ठिकाणी मतमोजणीत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप ट्रम्प आणि त्यांचे समर्थक यांनी केला आहे. याविरोधात ट्रम्प यांचे सहस्रो समर्थक वॉशिंग्टनमध्ये रस्त्यावर उतरले. ‘निवडणुकीत गैरप्रकार करून जनमतांवर दरोडा टाकला’, असा आरोप त्यांनी केला. ‘सर्व राज्यांमध्ये पुन्हा एकदा मतमोजणी करावी’, अशी मागणीही त्यांनी केली. अनेक ठिकाणी मृतांच्या नावे मतदान करण्यात आले असल्याचा आरोप ट्रम्प समर्थकांनी केला आहे.

या आंदोलनाच्या वेळी ट्रम्प समर्थक आणि विरोधक यांच्यात वॉशिंग्टनमध्ये काही ठिकाणी चकमक झाली. ‘ब्लॅक लाइव्हज् मॅटर’ आणि ‘अँटिफा’ यांसारख्या संघटनांशी संबंधित आंदोलक व्हाइट हाऊसपासून काही अंतरावर जमले. ट्रम्पच्या समर्थकांकडून त्यांना मारहाणही करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी मिरचीच्या पुडीची फवारणी केली. परिस्थिती आणखी चिघळून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.