आज मोठ्या प्रमाणात होणारी धर्महानी किंवा वाढते पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण याला हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव कारणीभूत आहे. हिंदु संस्कृती धर्माधारित आहे. हिंदु धर्माने शिकवलेले आचार, तत्त्वज्ञान, नीती, वेशभूषा, केशभूषा, आहार यांमुळेच हिंदु संस्कृती विकसित झाली. आज हिंदु संस्कृती संकटात येण्यामागील कारणांचा अभ्यास केला, तर हिंदू धर्माचरण करत नाहीत, असे लक्षात येते. हिंदूंना धर्मशिक्षण देणारी व्यवस्थाच उपलब्ध नाही, हे मुख्य कारण आहे. जसे मुसलमानांना मदरशांत आणि ख्रिस्त्यांना चर्चमध्ये धर्मशिक्षण मिळते, तसे हिंदूंना आपल्या निधर्मी राज्यात धर्मशिक्षण मिळत नाही. हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे आणि त्यांचा धर्माभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणाचा प्रसार करणारे विविध उपक्रम आयोजित करते.
१. धर्मसत्संग
हिंदु जनजागृती समितीकडून धर्मशिक्षण देणारे विनामूल्य साप्ताहिक धर्मसत्संग देशभरात सर्वत्र आयोजित केले जातात. केवळ मंदिरांतच नव्हे, तर शाळा, महाविद्यालये, कार्यालये, खासगी आस्थापने, महिला मंडळे इत्यादी ठिकाणीही आयोजित केले जातात. ‘सनातन संस्थे’ने प्रकाशित केलेल्या अध्यात्म, धर्म, आचारधर्म आदी विषयांवरील ग्रंथांचा अभ्यास करून समितीचे कार्यकर्ते हे धर्मसत्संग घेतात. हिंदुत्वनिष्ठ संघटनाही धर्मसत्संगाचा उपक्रम आपापल्या कार्यक्षेत्रात राबवू शकतात.
१ अ. आयोजन : सर्वसाधारणतः प्रत्येक आठवड्यात एकदा आयोजित करण्यात येणार्या धर्मसत्संगाचा अवधी एक ते दीड घंटा (तास) असावा. यामध्ये हिंदु धर्माची श्रेष्ठता, धार्मिक कृतींमागील शास्त्र, धर्माचरणाच्या कृती, हिंदु धर्मावर होणारे आघात आणि धर्महानी रोखण्याच्या कृती यांविषयी ज्ञान (माहिती) देता येईल. हे धर्मशिक्षणवर्ग घेण्यासाठी आवश्यक असलेली तात्त्विक माहिती समिती आपणास पुरवेल.
१ आ. ‘धर्मसत्संगां’च्या माध्यमातून समितीने साध्य केलेल्या गोष्टी ! (फलनिष्पत्ती)
१. धर्मसत्संगांमध्ये येणारे अनेक युवक आज व्यसनमुक्त झाले आहेत.
२. कित्येक जण कपाळाला कुंकवाचा टिळा लावूनच घराबाहेर पडतात. धर्माचरण करता करता ते हिंदूसंघटनाचे कार्य करू लागले आहेत.
३. धर्मसत्संगांना श्रोते म्हणून आलेले अनेक युवक आपापसांतील भांडणे, मतभेद विसरून धर्मावरील आघात रोखण्यासाठी सिद्ध झाले आहेत.
४. एके ठिकाणी धर्मसत्संगामुळे मंदिरांचे महत्त्व गावातील हिंदु तरुणांच्या लक्षात आले. त्यामुळे आता ते मंदिरे स्वच्छ ठेवू लागले आहेत. काही जुनी मंदिरे अनेक वर्षांपासून बंद होती. मुसलमान या मंदिरांच्या आजूबाजूला वस्ती करून ती बळकावू पहात होते. या तरुणांनी ही मंदिरे स्वच्छ करून तेथे पूजाअर्चा चालू केली आहे.
५. धार्मिक उत्सवांतील अनुचित (उदा. मिरवणुकीतील वाद्यवृंद, जुगार, बीभत्स नाचगाणी, देवतांचे विडंबन करणार्या मूर्ती) प्रकार बंद करण्यासाठी धर्मसत्संगात येणार्या धर्माभिमान्यांनी पुढाकार घेतला.
६. अनेकांनी नववर्ष ३१ डिसेंबरला साजरे न करता गुढीपाडव्यालाच साजरे करणे चालू केले.
७. देवतांचे विडंबन करणार्यांचे प्रबोधन करणे, वेष्टने किंवा विज्ञापने यांतून देवतांचे विडंबन होत असेल, तर ती उत्पादने खरेदी न करणे, अशा प्रकारे वैयक्तिक स्तरावर विडंबन रोखण्यासाठी धर्माभिमान्यांनी प्रयत्न चालू केले.
८. धर्मकार्यासाठी लागणारा अर्पणनिधी काही प्रमाणात धर्मसत्संगांतून जमा होतो.
अशा प्रकारे आपणही आपल्या संघटनेच्या वतीने आपल्या कार्यकक्षेत हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती आणि त्यांचे संघटन करणारा धर्मसत्संग आयोजित करू शकता.
२. बालसंस्कारवर्ग
२ अ. आयोजन : लहानपणापासून नीतीमत्ता, सदाचार अन् सुसंस्कार यांचे शिक्षण मिळाले, तरच रामराज्याचे प्रतीक असलेल्या हिंदु राष्ट्रातील प्रजा खर्या अर्थाने सदाचरणी असेल. यासाठी आतापासूनच भावी पिढीला शाळा, बालसंस्कारवर्ग यांमधून धर्मशिक्षण मिळेल, अशी व्यवस्था करायला हवी. धर्मशिक्षित समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला न्यूनतम १-२ पिढ्या कार्य करावे लागेल, तेव्हा पुढच्या पिढी धर्मशिक्षित होतील.
हिंदु राष्ट्राची स्थापना हे तात्कालिक कार्य आहे, तर हिंदु राष्ट्र टिकवणे, हे चिरंतन कार्य आहे. त्यासाठी भावी पिढीला आतापासूनच संस्कार आणि साधना शिकवली पाहिजे. त्यासाठी समितीकडून बालसंस्कारवर्ग चालवले जातात.
सध्याची मुले ‘व्हॉट इज रामरक्षा ?’ असे विचारतात. अशा स्थितीत आपण हिंदूंच्या शाळा, तसेच ओळखीच्या शाळा यांमध्ये धर्मशिक्षण आणि सुसंस्कार यांविषयीचे उपक्रम राबवावेत. शाळांतून बालसंस्कारवर्ग घेतले जावेत.
विविध सण आणि उत्सव यांच्या काळात विद्यार्थ्यांसाठी शाळांमधून संस्कारप्रद प्रश्नमंजुषाही समितीच्या वतीने घेतल्या जातात. या प्रश्नमंजुषा उपक्रमांचा लाभ १ सहस्र ५०० शाळांमधील १ लाख २० सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. अशाच पद्धतीने लहान मुलांवर सुसंस्कार होतील, असे उपक्रम आपणही आपल्या परिसरांतील शाळांत चालू करू शकता, उदा. शाळा चालू होण्यापूर्वी आणि नंतर १५ मि. धर्मशिक्षण देता येईल, विविध स्तोत्रे त्यांच्याकडून म्हणून घेता येतील.
२ आ. फलनिष्पत्ती : समितीच्या कार्यात सहभागी असलेले अनेक तरुण कार्यकर्ते विद्यार्थीदशेत असतांना बालसंस्कारवर्गात येत. आज समितीचे अनेक उपक्रम आणि कार्यक्रम यांचे दायित्व घेऊन ते यशस्वी करण्यात त्यांचा हातभार असतो. आज बालसंस्कारवर्गांत येणारी मुलेच पुढे क्रियाशील होतात, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.
या उपक्रमांतून संघटनेच्या कार्याचा उत्कर्ष होतोच; पण त्यातून हिंदुत्वाचे कार्यही प्रभावीपणे होते. यासाठीच ‘या माध्यमांचा वापर हिंदुत्वनिष्ठ संघटनांद्वारे भारतातील कानाकोपर्यांतून व्हावा आणि हिंदु राष्ट्र्राच्या उभारणीच्या दृष्टीने हिंदूंच्या मानसिक जडणघडणीसाठी अनेक व्यासपीठे ठिकठिकाणी सिद्ध व्हावीत’, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भारतात स्थानिक दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित होणारे धर्मसत्संग !
हिंदूंना स्थानिक दूरचित्रवाहिन्यांद्वारे घरबसल्या धर्मशिक्षण मिळावे, यासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’ने आतापर्यंत ‘ईश्वरप्राप्तिके लिए साधना’ आणि ‘धार्मिक कृत्योंका शास्त्र’ या दोन धर्मसत्संग मालिकांचे एकूण ३६७ भाग सिद्ध केले होते. ‘श्रीशंकरा’, ‘सुदर्शन’ आणि ‘मॅजिक’ या तीन उपग्रह दूरचित्रवाहिन्यांवर वर्षभर हे धर्मसत्संग प्रसारित करण्यात आले. समितीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक केबल वाहिन्यांच्या चालकांना संपर्क करून ही मालिका दाखवण्याविषयी प्रयत्न केले. या संपर्कांमुळे भारतभरात ५१ स्थानिक दूरचित्रवाहिन्यांवर त्यांचे नियमित प्रसारण केले जाते.