श्रीराम आणि हनुमान यांच्यावरील श्रद्धेमुळे इतिहासाची शिक्षिका सांगत असलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचे तिला धैर्याने सांगणारा कु. संस्कार सभरवाल (वय १४ वर्षे) !

मुलाच्या शाळेत चुकीचा इतिहास शिकवला जात असल्याने पालकांचे प्रबोधन करणे; पण पालकांना शाळेसमोर सत्य मांडण्याचे न पटणे : ‘२ वर्षांपूर्वी आम्ही अमेरिकेत होतो. त्या वेळी संस्कार १२ वर्षांचा होता अन् तो ६ वीत शिकत होता. त्याच्या इतिहासाच्या पुस्तकातील ‘प्राचीन भारत’ या उपभागात ‘रामायणा’विषयी धडा होता. त्यात ‘रामायण हे काल्पनिक आहे. तसेच हनुमानाचा उल्लेख ‘वानर देवता’ असा केला होता. वर्गशिक्षिकाही तसेच शिकवत होती. हे त्याला आवडले नाही. त्याने मला सांगितले होते. त्यामुळे मी त्याच्या वर्गातील इतर दोन भारतीय मुलांच्या पालकांशी बोलले. ‘वर्गात चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. वर्गात ५० ते ६० टक्के मुले हिंदू असल्याने आपण सर्व पालकांनी शाळेत जाऊन त्यांना सत्य सांगायला हवेे’, असा विचार मी त्यांच्या समोर मांडला; पण तो त्या पालकांना पटला नाही.

एकदा संस्कारने श्रीराम आणि श्री हनुमान यांना प्रार्थना करून त्याच्या इतिहासाच्या शिक्षिकेशी बोलण्याचे ठरवले. त्यांचे संभाषण पुढीलप्रमाणे होते.

कु. संस्कार : आपल्या इतिहासाच्या पुस्तकात ‘रामायण हे काल्पनिक आहे’, असे सांगितले आहे. ते मला मान्य नाही. ‘रामायण’ सत्य असून तो आमचा इतिहास आणि संस्कृती आहे.

शिक्षिका : या जगात आता राक्षस आणि बोलणारी माकडे नाहीत. त्यामुळे ते काल्पनिक आहे.

कु. संस्कार : पण पुरातत्व विभागाने रामायणाच्या अस्तित्वाचे पुरावे दिले आहेत. हनुमानाचे मुख जरी माकडाप्रमाणे दिसत असले, तरी तो माकड नाही. तो देवाचा अवतार असून त्याच्यात सेवाभावाचे गुण आहेत. रामसेतू, राक्षसांची राजधानी श्रीलंका, रामेश्‍वर हे अस्तित्वात आहे. त्याचे दाखले आहेत. त्यामुळे ते काल्पनिक नाही.

शिक्षिका : जगातील बहुसंख्यांकांना रामायण काल्पनिक असल्याचे वाटते. मला तुझ्या धर्माविषयी आदर आहे. तुम्हालाही आमच्या धर्मातील काही सूत्रे स्वीकारणे कठीण जाते. त्याचप्रमाणे इतरांनाही दुसर्‍या धर्मातील काही सूत्रे स्वीकारणे कठीण असते.

– श्री. बलविंदर आणि सौ. बबिता सभरवाल (कु. संस्कारचे आई-वडील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

आम्ही अमेरिकेहून भारतात परत आलो. त्यानंतर तो येथील शाळेत जाऊ लागला. त्याच्या शाळेत शिकवली जाणारी इतिहासाची पुस्तके पाहून त्याला पुष्कळ राग आला. ‘या हिंदूबहुल राष्ट्रात चुकीच्या पद्धतीने हिंदु संस्कृतीचा इतिहास लिहिला जात आहे. याविषयी कुणाला काही वाटत कसे नाही ?’, असे म्हणून तो पुष्कळ रडला. तो मला म्हणाला, ‘‘चुकीचा इतिहास शिकवणारी ही इतिहासाची पुस्तके मी जाळून टाकीन. मी मोठा होईन, तेव्हा भारताचा योग्य आणि प्रभावशाली इतिहास शिकवणारी पुस्तके मी प्रकाशित करीन. इतिहासाचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे; पण माझ्या वर्गात शिकवला जाणारा इतिहास वाचून मला लाज वाटते.’’ – श्री. बलविंदर आणि सौ. बबिता सभरवाल (कु. संस्कारचे आई-वडील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.