प्रार्थनेचे महत्त्व जाणून धर्माचरण करा !

प्रार्थनेचे महत्त्व

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

‘इच्छित कार्य देवतेला प्रार्थना करून केल्याने त्या कार्याला देवतेचा आशीर्वाद मिळतो. तसेच आत्मशक्ती अन् आत्मविश्‍वास वाढतो. त्यामुळे कार्य चांगले अन् यशस्वी होते. प्रार्थना करून कृती करतांना मनःशांती लाभते आणि मन शांत अन् स्थिर ठेवून केलेली कृती चांगली होते.’   

– (सद्गुरु) कु. अनुराधा वाडेकर, सनातन संस्था.  

‘उषःकाली प्रार्थनेच्या किल्लीने दिवसाचे दार उघडावे आणि रात्री प्रार्थनेची कडी घालून ते बंद करावे’, असे सुवचन आहे. प्रार्थनेमुळे श्रद्धेचे बळ आणि ईश्‍वराचा आशीर्वाद लाभतो. ‘प्रार्थनांचा आरोग्यावर सुपरिणाम होतो’, असे जपानी वैज्ञानिक डॉ. मासारू इमोटो म्हणतात. प्रार्थना हे सतत ईश्‍वरी अनुसंधानात रहाण्यासाठीचे अनमोल साधन आहे. प्रार्थनेमुळे कोणत्याही प्रतिकूल स्थितीचा सामना करण्यासाठी, तसेच स्थिर रहाण्यासाठी बळ मिळते.

सकाळी उठल्यावर करावयाच्या प्रार्थना

१. करदर्शन : दोन्ही हातांची ओंजळ करून त्यामध्ये मन एकाग्र करून पुढील श्‍लोक म्हणावा.

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती ।
करमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम् ॥

२. भूमीवंदन : यानंतर भूमीला प्रार्थना करून पुढील श्‍लोक म्हणावा आणि भूमीवर पाऊल टाकावे.

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले ।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ॥

स्नानापूर्वी करावयाची प्रार्थना

हे जलदेवते, तुझ्या पवित्र जलाने माझे शरीर शुद्ध होऊन अंतर्मनही निर्मळ होऊ दे.

भोजनापूर्वी करावयाच्या प्रार्थना

भोजनाला आरंभ करण्यापूर्वी जेवायला बसलेल्या सर्वांनी हात जोडून पुढील श्‍लोक आणि प्रार्थना म्हणावी.

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ॥

जीवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥

हे अन्नपूर्णामाते, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ या भावाने माझ्याकडून ग्रहण होऊ दे. या प्रसादातून मला शक्ती आणि चैतन्य मिळू दे. हे देवा, तुझ्या कृपेने मिळालेले हे अन्न माझ्याकडून नामजपासह सेवन होऊ दे.

झोपण्यापूर्वी करायची प्रार्थना

हे उपास्यदेवते आणि निद्रादेवते, तुमच्या कृपेचे संरक्षककवच माझ्याभोवती सतत असू दे आणि झोपेतही माझा नामजप चालू राहू दे.

दैनंदिन पूजाअर्चा, धार्मिक विधी इत्यादी प्रसंगी करायच्या प्रार्थना

हे भगवंता, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती भक्तीभाव निर्माण होऊ दे. या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे.

सण-उत्सव यांच्या दिवशी त्या त्या संबंधित देवतांना करायच्या प्रार्थना

हे देवा, या मंगलदिनी वातावरणात नेहमीपेक्षा सहस्रो पटींनी कार्यरत असलेल्या तुझ्या तत्त्वाचा मला अधिकाधिक लाभ होऊ दे. तुझ्या अलौकिक गुणवैशिष्ट्यांचे आणि लीलाकार्यांचे मला सतत स्मरण राहून हा सण/उत्सव भावपूर्णरित्या साजरा करून घे.

धर्माचरणाच्या संदर्भात करायची प्रार्थना 

हिंदु धर्मानुसार आचरण करण्याची वृत्ती माझ्यात निर्माण होऊ दे आणि धर्माचरणाचे महत्त्व मला इतरांनाही सांगता येऊ दे.

प्रवासाला निघण्यापूर्वी करायच्या प्रार्थना

१. प्रवासाला बाहेर पडतांना : हे भगवंता, माझा प्रवास निर्विघ्नपणे पार पडू दे. तुझ्या कृपेचे संरक्षककवच संपूर्ण प्रवासात माझ्याभोवती सतत असू दे.

२. वाहनात बसल्यावर करायच्या प्रार्थना : हे वाहनदेवते, तुझ्या कृपेने माझा संपूर्ण प्रवास सुरक्षितरित्या पार पडू दे. हे ईश्‍वरा, या वाहनाभोवती तुझे संरक्षककवच सदोदित असू दे. प्रवासात माझ्याकडून सतत नामजप होऊ दे.

वस्तूखरेदीच्या वेळी करायची प्रार्थना

हे देवा, मला सात्त्विक (चांगली स्पंदने असलेली) वस्तू निवडता येऊ दे. त्या वस्तूतून मला सात्त्विकता (चांगली स्पंदने) मिळू दे.

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘प्रार्थना’)

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिदिन प्रार्थना करा !

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ एखाद्या अन्य संघटनेचा उपक्रम किंवा आंदोलन होत असल्यास त्याच्या यशस्वितेसाठी उपास्यदेवतेला प्रार्थना करा. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीही प्रतिदिन प्रार्थना करावी. भावपूर्ण केलेली प्रार्थना ईश्‍वरापर्यंत पोचतेच ! सर्व हिंदूंनी केलेली प्रार्थना ऐकून भगवंतच हिंदु राष्ट्राची स्थापना करणार आहे, हे निश्‍चित !