१. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पूरक असलेले समष्टी नामजप आणि ते केल्याने होणारे लाभ
अ. ‘ज्या साधकांचा व्यष्टी साधनेसाठीचा कुलदेव/ कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप आणि वाईट शक्तीचा त्रास असल्यास तो दूर करण्यासाठीचा जप कमीतकमी ५ वर्षे चांगल्या तर्हेने होत असेल, त्यांनी आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पूरक असलेले पुढील समष्टी जप करावेत. आधीचे जप आता करायला नकोत.
आ. ज्यांची समष्टी सेवा योग्य तर्हेने होत आहे, त्यांनीही पुढील समष्टी नामजप करावेत. आधीचे जप आता करायला नकोत.
१ अ. प्रत्येक नामजपामुळे होणार असलेले आध्यात्मिक लाभ
१. श्री विष्णवे नमः ।
यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल आणि राष्ट्राला स्थिरता येईल.
२. श्री सिद्धिविनायकाय नमः ।
याच्या आशीर्वादामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी बळ आणि योग्य दिशा मिळेल.
३. श्री भवानीदेव्यै नमः ।
देवीच्या आशीर्वादामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी बळ मिळेल.
दिवसाला जितका वेळ नामजपाला देणार असू, त्याच्या १/३ वेळ प्रत्येक नामजपाला द्यावा, म्हणजे तीन घंटे देणार असू, तर वरील प्रत्येक नामजप प्रति १ घंटा करावा.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१ आ. वरील लिखाण वाचतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आलेल्या अनुभूती : ‘ही धारिका वाचतांना ‘माझ्या शरिरात दैवी ऊर्जेचा गतीने संचार झाला’, असे मला वाटले. सहस्रारावर पुष्कळ ऊर्जा जाणवली, तसेच पुढे स्थापन होणार्या हिंदु राष्ट्राचा शंखनाद मला सूक्ष्मातून ऐकू आला.’
– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ (२०.५.२०२०)
२. समष्टीसाठी नामजप करणार्यांनी आणि समष्टी स्तरावरील त्रास दूर होण्यासाठी साधकांनी करावयाचे नामजपादी उपाय
२ अ. जप : ‘सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत आहे. कालमहात्म्यानुसार सर्वसाधारणपणे सध्या साधकांना होणार्या त्रासांपैकी ७० टक्के त्रास समष्टी स्तरावरील, तर ३० टक्के त्रास व्यष्टी स्तरावरील आहेत.
२ अ १. उपाय म्हणून बसून नामजप करणारे साधक : यांनी जेवढा वेळ नामजप करणार, त्याच्या ७० टक्के वेळ व्यष्टी उपायांसाठीचा ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’नुसार शोधून मिळालेला जप, सांगितलेला अन्य काही जप किंवा मंत्रजप असल्यास तो करावा, तर ३० टक्के वेळ समष्टीसाठी ‘श्री विष्णवे नमः ।’, ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ आणि ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ हे नामजप करावेत.
शोधलेल्या उपायांचा २ – ३ आठवड्यांत लाभ न झाल्यास किंवा तीव्र त्रास असल्यामुळे उपाय शोधता येत नसल्यास ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीच्या साधकांना किंवा संतांना विचारावे.
२ अ १ अ. चक्रस्थानी देवतेचे चित्र वा नामपट्टी लावण्याच्या संदर्भात : हे साधक ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’नुसार शोधून मिळालेल्या देवतेच्या जपानुसार त्या देवतेचे चित्र उपायांमध्ये मिळालेल्या शरिराच्या चक्रस्थानी लावू शकतात. तेजतत्त्वाशी संबंधित अग्निदेव किंवा सूर्यदेव याचा जप आल्यास दुर्गादेवीचे चित्र लावावे. वायुतत्त्वाशी संबंधित हनुमान किंवा वायुदेव याचा जप आल्यास हनुमानाचे चित्र लावावे, तर आकाशतत्त्वाशी संबंधित आकाशदेवाचा जप आल्यास शिवाचे चित्र लावावे. देवतेच्या चित्राऐवजी त्या देवतेची नामपट्टीही लावू शकतो.
देवतेचे चित्र किंवा नामपट्टी शरिराला स्पर्श करून लावतांना ‘देवतेच्या चित्राची बाजू किंवा नामपट्टीचा अक्षरे असलेला भाग शरिराच्या दिशेने कि बाहेरील दिशेने ठेवावा ?’, याचे विवरण ‘प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्या विकारांवर करायचे उपाय’ या ग्रंथात पृष्ठ क्र. ३२ वर सूत्र ‘१ ई ६. शरिरातील एखाद्या ठिकाणी बोटे फिरवून उपाय करता येत नसल्यास किंवा न्यास करता येत नसल्यास तेथे ज्या देवतेचा नामजप करायचा असतो, तिचे चित्र सगुण किंवा निर्गुण बाजूने ठेवणे’ यामध्ये दिले आहे. ‘शून्य’, ‘महाशून्य’, ‘निर्गुण’ आणि ‘ॐ’ हे जप आल्यास, त्या त्या नामपट्टीचा अक्षरे असलेला भाग शरिराच्या बाहेरील दिशेने ठेवावा.
सध्या सर्वत्र दळणवळण बंदी असल्याने साधकांकडे सर्व देवतांची चित्रे उपलब्ध नाहीत. साधकांकडे जुने (अगोदर छापलेले); पण खराब नसलेले संबंधित देवतेचे चित्र वा नामपट्टी असल्यास ती उपयोगात आणावी. असे शक्य नसल्यास ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेला किंवा भाव असलेला; पण आध्यात्मिक त्रास नसलेला साधक आपल्या जवळपास, आश्रमात किंवा घरी उपलब्ध असल्यास त्याच्या हस्ताक्षरात संबंधित देवतेचा नामजप कागदावर लिहून घ्यावा. हे तिन्ही पर्याय अवलंबणे शक्य नसल्यास भावपूर्ण प्रार्थना करून साधकांनी स्वतःच तो नामजप कागदावर लिहावा.
२ अ २. उपाय म्हणून बसून जप न करणारे साधक : यांनी दिवसभरातील संपूर्ण वेळ ‘श्री विष्णवे नमः ।’, ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ आणि ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ हे नामजप करावेत. या साधकांना शरिराच्या चक्रस्थानी देवतेचे चित्र लावण्याची आवश्यकता नाही. त्यांना जर काही त्रास होत असेल, तर त्यांनी त्रासाच्या तीव्रतेनुसार (टीप) तेवढ्या कालावधीसाठी उपायांसाठीचा जप बसून करावा आणि उर्वरित वेळ ‘श्री विष्णवे नमः ।’, ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ अन् ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ हे नामजप प्रत्येकी १/३ वेळ करावेत.
टीप – मंद त्रास असल्यास १ ते २ घंटे, मध्यम त्रास असल्यास ३ ते ४ घंटे आणि तीव्र त्रास असल्यास ५ ते ६ घंटे उपाय करावेत.
२ अ ३. समष्टीसाठी नामजप करणारे संत आणि साधक : काही संत समष्टीसाठी काही घंटे नामजप करतात, तसेच ६० टक्क्यांहून अधिक पातळी असलेले काही साधक हिंदु राष्ट्र-जागृती सभा, आंदोलने इत्यादींमधील वाईट शक्तींचे अडथळे दूर होण्यासाठी नामजप करतात. त्यांनी तेवढा वेळ ‘श्री विष्णवे नमः ।’ ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ आणि ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ हे नामजप प्रत्येकी १/३ वेळ करावेत.
२ अ ४. सामायिक सूचना
१. ‘१.४.२०२० ते ३०.६.२०२० या कालावधीत सर्व साधकांनी ‘निर्गुण’ हा नामजप करावा आणि सहस्रार अन् विशुद्ध चक्रांवर ‘निर्गुण’ या नामजपाच्या पट्ट्या लावाव्यात’, अशी सूचना पूर्वी दिली होती. यापुढे साधकांनी ‘निर्गुण’ हा नामजप करू नये, तसेच त्या पट्ट्या लावू नयेत.
२. सकाळी किंवा रात्री ९.३० ते १० या वेळेत साधक ध्यान करतात. ही वेळ एकूण दिवसाच्या नामजपाच्या वेळेत धरावी. दिवसाला जितका वेळ नामजपाला देणार असू, त्याच्या १/३ वेळ ‘श्री विष्णवे नमः ।’ ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ आणि ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ या नामजपांपैकी प्रत्येक नामजपाला द्यावा, उदा. ३ घंटे वेळ देणार असू, तर वरील प्रत्येक नामजप १ घंटा करावा. उपाय म्हणून बसून जप न करणार्या साधकांनी हे नामजप जाता-येतांना अधिकाधिक वेळ करावेत.
३. ‘कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता आध्यात्मिक बळ मिळावे’, यासाठी सांगितलेला नामजप (‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ (३ वेळा) – ‘श्री गुरुदेव दत्त ।’ – ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ (३ वेळा) – ‘ॐ नमः शिवाय ।’) प्रतिदिन १०८ वेळा एका जागी बसून करावा. पुढील सूचना मिळेपर्यंत हा नामजप करायचा आहे.
२ आ. मुद्रा : ‘श्री विष्णवे नमः ।’, ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ आणि ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ हे नामजप जाता-येतांना किंवा बसून करतांना ‘तर्जनीच्या टोकाला अंगठ्याचे टोक जोडणे’, ही मुद्रा दोन्ही हातांनी करावी. कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी नामजप करतांनाही हीच मुद्रा करावी.’
– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ (२५.५.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.