ए.टी.एम्. कार्डद्वारे पैसे काढतांना सतर्कता बाळगा !

साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांच्यासाठी सूचना

ए.टी.एम्. कार्डद्वारे पैसे काढतांना फसवणूक होण्याची शक्यता असते. या संदर्भात एका धर्मप्रेमीला आलेला अनुभव येथे दिला आहे.

एक धर्मप्रेमी ए.टी.एम्. मशीनमधून कार्डद्वारे पैसे काढत होते. तेव्हा त्याच्या मागे उभ्या असलेल्या एका युवकाने ‘योग्य पद्धतीने कार्ड मशीनमध्ये घाला’, असे सांगत धर्मप्रेमीच्या हातातील कार्ड घेऊन मशीनमध्ये घातले आणि मागे जाऊन निघून गेले. संबंधित धर्मप्रेमीने ‘पिन’ क्रमांक घातल्यावर तो चुकीचा असल्याची सूचना ए.टी.एम्. मशीनच्या स्क्रिनवर येऊ लागली. ए.टी.एम्. मशीनमध्ये बिघाड असेल, असे वाटून धर्मप्रेमी दुसर्‍या ए.टी.एम्. मशीनच्या ठिकाणी गेले आणि तेथून पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागले; परंतु तेव्हाही ‘पिन’ क्रमांक चुकीचा असल्याची सूचना दिसू लागली. तेव्हा धर्मप्रेमीने भ्रमणभाषमध्ये खात्यातील रक्कम पडताळली असता त्यातील १० सहस्रांहून अधिक रुपये काढले गेले असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर धर्मप्रेमीने अधिकोषात जाऊन तेथील व्यवस्थापकाला घडलेली घटना सांगितली, तेव्हा त्यांनी खात्याची माहिती पाहिली असता लक्षात आले की, धर्मप्रेमीकडे असलेले कार्ड त्याचे नव्हते. ए.टी.एम्. मशीनमधून पैसे काढतांना त्या युवकाने हातचलाखीने धर्मप्रेमीचे कार्ड पालटले होते आणि सोबत पिन क्रमांकही चोरून बघितला अन् त्या आधारे त्याच्या खात्यातील रक्कम काढून घेतली होती. नंतर धर्मप्रेमीने त्याचे कार्ड ‘ब्लॉक’ केले, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार केली.

वरील प्रकार कुणाच्याही संदर्भात घडू शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन ए.टी.एम्. मशीनद्वारे पैसे काढतांना सतर्क रहावे.