फोंडा (गोवा) येथील साधक श्री. राजेंद्र नाईक यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नी सौ. मीनाक्षी नाईक यांनी विविध माध्यमांतून अनुभवलेले देवाचे साहाय्य !

‘पतीच्या मोठ्या हृदयविकाराच्या आजाराच्या वेळीही गोव्यातील सौ. मीनाक्षी राजेंद्र नाईक या साधनेच्या बळावर किती स्थिर होत्या’, हे त्यांचा हा लेख वाचून लक्षात येईल. ‘त्यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले     

श्री. राजेंद्र नाईक
सौ. मीनाक्षी नाईक

१. लग्न समारंभाहून घरी आल्यावर यजमानांना अस्वस्थ वाटणे आणि नामजपादी उपाय केल्यानंतर त्यांना बरे वाटणे

‘७.७.२०१८ या दिवशी माझे यजमान श्री. राजेंद्र नाईक एका लग्न समारंभासाठी चारचाकी घेऊन गेले होते. तेथे जेवण झाल्यानंतर घरी परत येतांना वाटेत त्यांना अस्वस्थपणा जाणवू लागला. त्यांना घशामध्ये जळजळ होऊ लागली, तरीही ते तसेच गाडी चालवत घरी आले. आमचे घर तिसर्‍या मजल्यावर आहे. घरात आल्यानंतर ते एकदम सोफ्यावर निजले आणि मला म्हणाले, ‘‘मला कसेतरी होत आहे.’’ आम्ही त्यांना तसेच उठून बसवले. आम्ही त्यांना अत्तर आणि कापूर लावला. आम्ही देवाजवळ दिवा लावला. आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण केले. त्यानंतर त्यांना थोडे बरे वाटले.

२. पू. (श्रीमती) सुमन नाईक यांनी सांगितलेले उपाय केल्यावर यजमानांना झोप लागणे

नंतर काही वेळाने यजमानांना पुन्हा त्रास होऊ लागला. त्यांना ‘उलट्या आणि ढेकरा येत आहेत’, असे वाटत होते; पण प्रत्यक्षात त्यांना उलटी होत नव्हती. त्यानंतर मी सौ. स्नेहा नाडकर्णी यांना संपर्क केल्यावर त्यांनी पू. सुमनमावशींना (पू. (श्रीमती) सुमन नाईक यांना) संपर्क करण्यास सुचवले. त्या वेळी पू. सुमनमावशी नामजप करत होत्या; तरीही त्यांनी भ्रमणभाष उचलला आणि विचारपूस केली. त्यांनी कडुलिंबाची पाने आणि कापूर जाळून त्याची धुरी देण्याचा उपाय सुचवला. मी तसे केल्यानंतर यजमानांना झोप लागली आणि बरे वाटले.

३. यजमानांना बांबोळी येथील रुग्णालयात भरती करणे

३ अ. यजमानांना रात्री त्रास चालू झाल्यावर फोंड्यातील रुग्णालयात भरती करणे आणि तेथून बांबोळी येथील रुग्णालयात नेऊन वैद्यकीय उपचार चालू करणे : दुसर्‍या दिवशी यजमान एका सेवेसाठी म्हार्दोळला आणि नंतर रामनाथी आश्रमात जाऊन ‘सनातन प्रभात’ हिंदी पाक्षिकाचा गठ्ठा घेऊन आले. त्यांनी दिवसभर त्यांच्याकडील सर्व सेवा पूर्ण केल्या. रात्री १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. त्यांना फोंडा येथील ‘आय.डी.’ रुग्णालयात नेले. त्या रुग्णालयात तपासणी आणि उपचार करून त्यांना फोंड्याहून बांबोळी येथील ‘जी.एम्.सी.’ रुग्णालयात नेले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू केले.

३ आ. घरी एकटी असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यजमानांची सर्वतोपरी काळजी घेणार’, अशी श्रद्धा असणे : यजमानांना बांबोळी येथे उपचारासाठी नेले असतांना मी घरी एकटीच होते. त्या वेळी मी स्थिर होते. दुसर्‍या दिवशी सकाळी मी पू. सुमनमावशी यांना भ्रमणभाष करून सर्व परिस्थितीची कल्पना दिली. त्यांनी ‘तू घरी एकटीच आहेस का ?’, असे विचारल्यावर मी ‘हो’ म्हणाले. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून समवेत आहेत, तर ते सर्वतोपरी काळजी घेणारच आहेत’, अशी माझ्या मनात दृढ श्रद्धा होती. रुग्णालयात यजमानांच्या समवेत नातेवाईक होते. यजमानांची स्थिती गंभीर असल्याने त्यांनी मला तसा काही निरोप संध्याकाळपर्यंत दिला नव्हता.

३ इ. ओळखीच्या आधुनिक वैद्यांकडून यजमानांची स्थिती गंभीर असल्याचे समजल्यावरही स्थिर असणे आणि दुसर्‍या दिवशी आधुनिक वैद्यांनी ‘तुम्ही नामजप करत असल्याने ईश्‍वराने यजमानांना परत आणले’, असे सांगितल्यावर श्रद्धा वाढणे : तेव्हा मी बांबोळी येथील ओळखीच्या आधुनिक वैद्यांना संपर्क केला. त्यांनी चौकशी करून सांगितले, ‘‘श्री. राजेंद्र यांची स्थिती गंभीर असून उद्या निश्‍चित काय ते कळेल.’’ ते ऐकूनही मी स्थिर होते. त्याच्या दुसर्‍या दिवशी त्या आधुनिक वैद्यांनी स्वतः भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आज स्थिती चांगली आहे. तुम्ही जो नामजप करता, त्यामुळेच ईश्‍वराने त्यांना परत आणले आहे. नामजप तसाच चालू ठेवा.’’ हे ऐकून माझी श्रद्धा अजून वाढली.

३ ई. आधुनिक वैद्यांनी यजमानांच्या हृदयाचे शस्त्रकर्म करावे लागणार असल्याचे सांगणे : त्यानंतर आधुनिक वैद्यांनी त्यांची ‘अँजिओग्राफी’ करायला सांगितली. आधुनिक वैद्यांनी ‘अँजिओग्राफी’ करण्याचा दिवस पुष्कळ पुढचा दिलेला होता. रुग्णालयातील एका व्यक्तीच्या ओळखीमुळे अलीकडचा दिवस मिळाला. हे सर्व परात्पर गुरु डॉक्टरांंच्या कृपेमुळेच घडले. ‘अँजिओग्राफी’मध्ये ‘३ ब्लॉकेजेस् आहेत’, असे समजले. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘अँजिओेप्लास्टी’ करता येणार नाही, तर हृदयाचे शस्त्रकर्म करावे लागेल.’’ त्यानंतर त्यांना दुसर्‍या दिवशी रुग्णालयातून घरी पाठवले. ‘त्यांना पायर्‍या चढू द्यायच्या नाहीत आणि काळजी घ्यायला हवी’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले होते; परंतु अजून काही पर्याय नसल्याने मी देवाला शरण जाऊन कृतज्ञता व्यक्त करून त्यांना फोंडा येथील तिसर्‍या माळ्यावरील सदनिकेत घेऊन आले.

४. यजमान बेळगाव येथील रुग्णालयात भरती होणे

४ अ. पणजी येथील रुग्णालयात यजमानांचे शस्त्रकर्म करण्याचा दिवस उशिरा ठरवल्याने बेळगाव येथील रुग्णालयात यजमानांचे शस्त्रकर्म करण्याचे ठरवणे : आम्ही संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय चालू केले. तेव्हा यजमानांच्या मनाची स्थिती स्थिर आणि शांत होती. त्यांना सतत परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते. यजमानांना पणजी येथील रुग्णालयातून शस्त्रकर्मासाठी ३ मासांनंतरचा दिवस देणार होते. त्यामुळे आम्ही बेळगावला ‘के.एल.ई.एस.’(K.L.E.S) या रुग्णालयामध्ये ओळखीचे आधुनिक वैद्य असल्याने तेथे चौकशी केली. तेथील आधुनिक वैद्य दोन दिवसांसाठी गोव्याला आले होते. त्यांनी सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल पाहून यजमानांना बेळगाव येथील रुग्णालयात भरती व्हायला सांगितले. तो दिवस गुरुपौर्णिमेचा होता.

४ आ. शस्त्रकर्माच्या आधी एक दिवस यजमानांची शारीरिक तपासणी करतांना ‘आणखी दोन ठिकाणी ‘ब्लॉकेजेस्’ आहेत’, असे समजणे : २७.७.२०१८ गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे यजमान बेळगावला रुग्णालयात भरती होण्यासाठी निघाले आणि मी रामनाथी आश्रमात गुरुपौर्णिमेच्या सेवेसाठी गेले. मी आतून अतिशय स्थिर आणि शांत होते. ‘ज्याने हे घडवले आहे, तोच सर्व व्यवस्थित निभावून नेईल’, याची सतत माझ्या मनाला जाणीव होती. शस्त्रकर्माच्या आधी एक दिवस पुन्हा सर्व शारीरिक तपासण्या करतांना अजून ‘२ ‘ब्लॉकेजेस्’ आहेत’, असे आढळले. त्यानंतर ४ दिवसांनी म्हणजे ३१.७.२०१८ या दिवशी पहाटे ५ वाजता यजमानांचे शस्त्रकर्म करण्याचे ठरले.

४ इ. ‘प.पू. गुरुदेवच यजमानांचे शस्त्रकर्म करणार आहेत आणि त्यांना साहाय्य करणारे ईश्‍वराचे सेवकच आहेत’, असा भाव ठेवून नामजप करणे अन् यजमानांचे शस्त्रकर्म व्यवस्थित पार पडल्याचे समजणे : शस्त्रकर्माच्या वेळी यजमान अतिशय स्थिर आणि शांत होते. त्यांचा ‘परात्पर गुरु डॉक्टर’ असा नामजप चालू होता. त्यांना सतत परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. मला यजमानांसाठी जो नामजप करायला सांगितला होता, तो नामजप मी करत होते. सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत माझा एकाग्रतेने नामजप होत होता. ‘शस्त्रकर्म करणारे आधुनिक वैद्य प्रत्यक्ष प.पू. गुरुदेवच आहेत आणि त्यांना साहाय्य करणारे ईश्‍वराचे सेवकच आहेत’, असे जाणवून मनाची आनंदाची स्थिती कायम होती. ‘परात्पर गुरु डॉक्टरच सर्वस्व आहेत’, याची सतत जाणीव होती. शस्त्रकर्म करण्याच्या वेळेत माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा ताण किंवा भीती नव्हती. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता शस्त्रकर्म व्यवस्थित पार पडल्याचा मला बेळगाव येथून भ्रमणभाष आला.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

परात्पर गुरु डॉक्टरांनी वरील पूर्ण प्रसंगात सर्वकाही करवून घेतले. परात्पर गुरुदेव, आम्ही तुमच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहोत. ‘हे कृपाळू, दयाघना परात्पर गुरु डॉक्टर, या सगळ्या प्रसंगांमधून तुम्ही नातेवाईक आणि साधक यांच्या माध्यमातून सहकार्य केले अन् सगळे निर्विघ्नपणे पार पडले. आम्हाला सतत तुमच्या अस्तित्वाची जाणीव होऊ दे’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– सौ. मीनाक्षी राजेंद्र नाईक, फोंडा, गोवा. (७.६.२०१९)

हृदयाचे शस्त्रकर्म होऊनही सेवा निर्विघ्नपणे पार पडल्याने साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘हृदयाचे शस्त्रकर्म झाल्याने वर्ष २०१९ मध्ये असलेली अधिवेशनाची सेवा मला करता येईल कि नाही’, अशी मनात शंका होती; पण परात्पर गुरु डॉक्टरांनीच मला अधिवेशनाच्या सेवेसाठी आणले. सर्व सेवा निर्विघ्नपणे पार पडली. मला सेवेत कोणतेही अडथळे आले नाहीत. मला सेवेत पुष्कळ आनंद मिळाला. यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. राजेंद्र नाईक, फोंडा, गोवा. (७.६.२०१९)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक