भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक (लॅपटॉप) यांद्वारेही कोरोना पसरू शकतो ! – प्रा. सरमन सिंह आणि शास्त्रज्ञ रजनीकांत

प्रतिदिन कपडे धुणे आवश्यक

प्रा. सरमन सिंह

भोपाळ – भ्रमणभाष, संगणक आणि भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आदी प्रतिदिन स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याद्वारेही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाची लागण झालेले रुग्ण तुमच्या आजूबाजूला असतील, तरच हा संसर्ग या उपकरणांच्या माध्यमातून पसरू शकतो. तसेच जे कपडे घालून घराबाहेर जाऊन येतात, त्यांनी ते कपडे घरी आल्यानंतर प्रतिदिन धुण्याची आवश्यकता आहे. घराबाहेर असतांना काही वेळा तुमचा इतरांना धक्का लागतो, त्या वेळी कपड्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पोचू शकतो. तेच कपडे जर नाका-तोंडाजवळ नेले, तर संक्रमित होण्याचा धोका अधिक असतो, अशी सूचना ‘एम्स्, भोपाळ’चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. सरमन सिंह आणि भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचे शास्त्रज्ञ रजनीकांत यांनी दिली आहे. या दोघांनी ‘दैनिक भास्कर’ला मुलाखत दिली असून ही सूत्रे सांगितली आहेत.

त्या मुलाखतीत पुढे म्हटले आहे की,

१. चप्पल आणि बूट यांमधून कोरोनाचा फैलाव होत नाही. जर प्रतिदिन घड्याळ परिधान केले जात असेल, तर ते प्रतिदिन स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे; कारण एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीने शिंकल्यास त्याचे थेंब घड्याळ्यावर पडून त्याद्वारे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.

२. सर्दी, खोकला आणि ताप आहे, म्हणून कोरोनाविषयक चाचणी करण्याची आवश्यकता नाही. जर विदेशात प्रवास केला असेल किंवा कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो असल्यास चाचणीची आवश्यकता आहे. पालटलेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला होणे स्वाभाविक आहे.

३. कोरोनाची लक्षणे ५ ते ७ दिवसांत दिसून येतात. काही वेळा १४ दिवसांचाही वेळ लागतो.

४. प्रत्येकापासून दूर रहा. घरात असतांनाही कुटुंबियांपासून १ मीटरचे अंतर राखा.