Kerala Death Threat To Principal : भ्रमणभाष जप्त केल्याने विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांना दिली जिवे मारण्याची धमकी !

मुख्याध्यापकांना धमकावताना विद्यार्थी

पलक्कड (केरळ) – येथील अनक्कारा सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील अकरावीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या मुख्याध्यापकांना भ्रमणभाष जप्त केल्याविषयी जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर त्या विद्यार्थ्याला शाळेतून निलंबित करण्यात आले.

१. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी रागाने मुख्याध्यापक ए.के. अनिलकुमार यांना त्यांच्या कार्यालयात बोट दाखवत, ‘तू शाळेतून बाहेर पडल्यावर मी तुला संपवून टाकेन’, अशी धमकी देतांना दिसत आहे.

२. शाळेत भ्रमणभाष संच आणण्यास मनाई असतांनाही शाळेच्या नियमाचे उल्लंघन करून विद्यार्थ्याने शाळेत भ्रमणभाष आणला होता. त्याचा भ्रमणभाष जप्त करण्यात आला, तेव्हा विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांना धमकी दिली. प्रत्युत्तरादाखल शाळेच्या पालक-शिक्षक संघटनेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. शिक्षण विभाग या घटनेची चौकशी करत आहे.

३.  शाळेच्या पालक-शिक्षक संघटनेने विद्यार्थ्यांना शाळेत भ्रमणभाष आणण्यास कडक बंदी घातली होती. या धोरणाच्या अंतर्गत जप्त केलेले भ्रमणभाष संच नंतर पालकांना परत केले जातात; मात्र त्यांना ते घेण्यासाठी शाळेत यावे लागते, असे पालक-शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आणि अनक्कारा पंचायत सदस्य व्ही.पी. शिबू यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

संस्कारित पिढी घडवण्याच्या दृष्टीने  शाळेच्या अभ्यासक्रमात मूल्यवर्धित शिक्षण अंतर्भूत करणे किती आवश्यक ठरले आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते. राज्यकर्ते त्यादृष्टीने विचार करतील का ?