नवी देहली – सध्या तंत्रज्ञान शिक्षणाचा एक आवश्यक भाग बनले आहे. भ्रमणभाषद्वारे मुले त्यांच्या पालकांशी जोडलेली रहातात, ज्यामुळे त्यांची सुरक्षिततादेखील सुनिश्चित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये भ्रमणभाष संच घेऊन जाण्यास बंदी घालता येणार नाही; पण शाळांनी या संदर्भात धोरण बनवावे आणि त्यावर लक्ष ठेवावे, असा आदेश देहली उच्च न्यायालयाने दिला. केंद्रीय विद्यालयातील एका विद्यार्थ्याने शाळेत भ्रमणभाष संच वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली होती. ती न्यायालयाने फेटाळली.
उच्च न्यायालयाने म्हटले की, शाळांमध्ये स्मार्टफोन वापराचे नियम मोडल्यास शिक्षा असली पाहिजे; पण ती फार कठोर नसावी. आवश्यकता भासल्यास शाळा शिक्षा म्हणून भ्रमणभाष संच जप्त करू शकतात, असे न्यायालयाने सुचवले.
मुले प्रतिदिन सरासरी ७ घंटे भ्रमणभाषचा वापर करतात !
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग ॲब्युज’च्या अहवालानुसार किशोरवयीन मुले प्रतिदिन ७ घंटे २२ मिनिटे भ्रमणभाष वापरण्यावर घालवतात. मुले यावर अधिक वेळ घालवल्याने त्यांचा सामाजिक विकास थांबू शकतो. या वयात भ्रणणभाषचा अधिक वापर मुलांच्या शारीरिक वाढीसह मेंदूच्या विकासात अडथळा आणू शकतो.