शेकडो कि.मी. अंतर चालत घरी जाणार्‍या मजुरांना साहाय्य करा ! – केंद्रशासनाचे राज्यशासनांना निर्देश

नवी देहली – देशात दळणवळण बंदी झाल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर शेकडो कि.मी. अंतर चालत जात त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेश यांना या मजुरांना साहाय्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या रहाण्याची आणि जेवणाची सोय करण्यास शासनाने सांगितले आहे.

गुजरात, देहली आदी राज्यांतून शेकडे कि.मी. अंतर पायी पार करण्याचा प्रयत्न हे मजूर करत आहेत. अनेक जण साहित्य आणि मुले यांना खांद्यावर घेऊन प्रवास करत असल्याचे दिसत आहेत. पायी जाणार्‍यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. चालल्यामुळे त्यांना शारीरिक कष्ट होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. ‘काम बंद झाल्याने, रहाण्याची, खाण्याची कोणतीही सोय नसल्याने, पुरेसे पैसेही नसल्याने आणि गाड्याही बंद झाल्याने घरी चालत जाण्यावाचून आम्हाला पर्याय नाही’, असे या मजुरांचे म्हणणे आहे.