गोव्यात ३ कोरोनाबाधीत सापडले

तिघांनीही विदेशवारी केल्याचे निष्पन्न

पणजी – गोव्यात विदेशातून आलेले ३ गोमंतकीय कोरोनाबाधीत असल्याचे त्यांच्या चाचणीअंती निष्पन्न झाले आहे. हे तिघेही रुग्ण पुरुष आहेत. त्यातील एक रुग्ण २३ वर्षांचा, दुसरा २९, तर तिसरा रुग्ण ५५ वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वी हे तिघे जण ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि स्पेन या देशांतून गोव्यात आले होते. त्यांना संशयित म्हणून विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते आणि त्या तिघांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तपासणीअंती ते कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले असून गोव्यात कोरोनाबाधीत रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कोरोनाबाधितांच्या संपर्कात असलेल्यांचे विलगीकरण करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

तिन्ही कोरोनाबाधीत रुग्णांना उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवण्यात येईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती घेतली असून त्या सर्वांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खबरदारी घेऊ ! – आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

गोव्यात ३ रुग्ण कोरोनाबाधीत सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्राने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ.