भारतात १५ मेपर्यंत १३ लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता

भारतातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग पहाता वैज्ञानिकांनी व्यक्त केला अंदाज

लोकहो, हा वेग रोखणे आपल्या सर्वांच्या हातात आहे, हे लक्षात घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूया !

नवी देहली – भारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वेगाने होत आहे, तो पहाता १५ मेपर्यंत भारतात कोरोनाबाधितांची संख्या १३ लाखांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज ‘कोव्ह-इंड-१९’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या एका पथकाने सादर केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे. या पथकामध्ये अमेरिका, भारत या देशांसह अन्य अनेक देशांच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे.

वैज्ञानिकांच्या पथकाने अहवालात मांडलेली सूत्रे 

१. भारताने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रारंभी चांगली आणि कठोर पावले उचलली. अमेरिका, इराण आणि इटली या देशांच्या तुलनेत भारताने उचलेली पावले निश्‍चितच चांगली आहेत; मात्र भारतातील कोरोनाबाधितांची नेमकी संख्या किती हे अद्याप नीट समजू शकलेले नाही. त्यामुळे ही स्थिती उद्भवू शकते.

२. फ्रान्स, दक्षिण कोरिया, चीन, इटली आणि अमेरिका या देशांच्या तुलनेत भारतात आयसोलेशन बेड्सची संख्या अगदीच नगण्य आहे. सध्या १० सहस्र भारतीय नागरिकांमागे ७० आयोसेलेशन बेड्स आहे. ही चिंतेची गोष्ट आहे.

३. भारतात ३० कोटी लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. कोरोनाची लागण होण्यासाठी ही गोष्ट पुरेशी आहे. असा त्रास असणार्‍यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका असतो.

४. भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर आधीच ताण आहे. त्यात आता कोरोनाचे संकट समोर आले आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, तर या देशातील आरोग्यसेवेवर प्रचंड ताण येईल.