किराणा दुकानदारांची सूची प्रशासनाकडून सिद्ध ! – माधवी कदम, नगराध्यक्षा, सातारा नगरपरिषद

भाजीपाला घरपोच देण्याविषयीही विचार चालू

सातारा, २६ मार्च (वार्ता.) – पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे देश लॉकडाऊन असतांनाच्या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता भासणार आहे; मात्र नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा. जिल्हा प्रशासन आणि पोलीस नागरिकांची योग्य ती काळजी घेत आहेत. सातारा शहर आणि उपनगरे येथील किराणा माल दुकानदारांची सूची जिल्हा प्रशासनाने सिद्ध केली आहे, अशी माहिती सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे कळवली आहे.

नागरिकांनी भ्रमणभाषद्वारे किंवा र्व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे साहित्याची सूची दुकानदारांना द्यावी. साहित्य भरल्यावर दुकानदार आपणास कळवतील किंवा आपल्या मागणीनुसार ते साहित्य घरपोच देतील. यापुढे भाजीपाला घरपोच कसा देता येईल, याविषयी प्रशासन विचार करत असून नागरिकांच्या आरोग्यासाठी ही सर्व उपाययोजना केली जात आहे. तरी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष कदम यांनी केले आहे.