वृत्तपत्रांना आडकाठी न करता वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी साहाय्य करा ! – केंद्रशासनाचे निर्देश

नवी देहली – संपूर्ण देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी आणि इतर कडक निर्बंध लादले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर योग्य आणि आवश्यक माहिती नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी सर्व वृत्तसंस्था, मुद्रित (वृत्तपत्र) आणि दूरचित्रवाहिन्या यांमध्ये काम करणार्‍या संस्था अन् तेथील कर्मचारी यांना कोणतीही आडकाठी करू नये. वृत्तपत्रांच्या वितरणाची साखळी व्यवस्थित चालू रहावी, यासाठी योग्य ते साहाय्य करावे, अशी स्पष्ट निर्देशवजा सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिली आहे.

या आदेशात केंद्र शासनाने म्हटले आहे की,

१. खोट्या आणि खोडसाळ बातम्या प्रसारित होऊ नयेत, तसेच योग्य अन् अचूक माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी वृत्तपत्राच्या सर्व यंत्रणा अत्यंत महत्त्वाचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची बंधने लादली न जाण्याची दक्षता राज्य सरकारांनी घ्यावी.

२. संबंधित संस्थांमधील सर्व कर्मचार्‍यांना कार्यरत रहाण्याची अनुमती दिली जावी, या संस्थांच्या कर्मचार्‍यांना प्रवासास अनुमती असावी, प्रसारमाध्यमांमधील व्यक्तींना घेऊन जाणार्‍या वाहनांना मान्यता दिली जावी आणि त्यांना इंधनाची आवश्यकता भासल्यास त्यासाठी साहाय्य करावे. याचसमवेत त्यांना विजेचा अखंड पुरवठा केला जावा आणि अन्य सुविधा तातडीने दिल्या जाव्यात, असेही या निर्देशात म्हटले आहे.