वाराणसी – येथे राज्य सरकारने दळणवळणबंदी घोषित केलेली असतांना काही विदेशी नागरिकांकडून या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कौशल किशोर शर्मा यांनी विदेशी पर्यटकांसाठी एक कठोर निर्णय लागू केला आहे. त्यानुसार विदेशी पर्यटक रस्त्यावर फिरतांना आढळल्यास त्यांंचे पारपत्र कह्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हॉटेल मालकांवरही कारवाई केली जाईल. याचसमवेत हॉटेल मालकांना या पर्यटकांना ‘होम क्वारंटाईन’ (घरातच थांबण्याचे) करण्याचे आदेश दिले आहेत. याच कारवाईचा भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने हॉटेलमध्ये निवासाला असलेल्या विदेशी पर्यटकांसंबंधीच्या सूचना विदेशींना न देणार्या ‘सूरजकुंड हॉटेल’चे व्यवस्थापक अभिराज गुप्ता आणि सुभाष यादव यांना अटक केली.