ईश्‍वरपूर येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात भीतीचे वातावरण

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), २४ मार्च (वार्ता.) – शहरातील ४ जणांना कोराना झाल्याचे समजल्यावर शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. याच समवेत शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रस्त्यावर अनावश्यक फिरणार्‍यांना चोप देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार शहराबाहेर वाढू नये म्हणून शहराचा संपूर्ण तालुक्याशी संपर्क तोडण्यात आला आहे. शहरात येणार्‍या ५ मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नगरपालिकेने शहरात औषध फवारणी चालू केली आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आव्हान मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी केले आहे.