
१. अन्न ग्रहण करतांना आपली पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धीही अन्न ग्रहण करत असणे
‘आहार म्हटले की, आपल्याला अन्नाची आठवण येते. आपल्या शरिराचे पोषण होण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. जे अन्न आपण ग्रहण करतो, त्याला ‘आहार’ असे म्हटले आहे. ‘आहार’ म्हणजे आत घेणे, स्वीकारणे ! आपण अन्न तोंडावाटे ग्रहण करतो. ते ग्रहण करतांना आपली पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धीही अन्न ग्रहण करतात, उदा. आपण उपाहारगृहामध्ये जेवायला जातो. तेव्हा मागवलेला पदार्थ चांगला दिसावा; म्हणून ‘डिश’ सजवलेली असते. ती पाहिल्यावरच आपल्या तोंडाला पाणी सुटते, म्हणजे ते अन्न आधी आपले डोळे ग्रहण करतात. वेगवेगळ्या पदार्र्थांचा सुगंध नाकाद्वारे घेऊनच आपण तो पदार्थ आनंदाने ग्रहण करतो. पदार्थ जर कुरकुरीत असेल, तर त्याचा खातांना होणारा ‘कुरुम् कुरुम्’ असा आवाज कानाला ऐकू येतो. तो आवाज आनंदात भर टाकत असतो. हाताने अन्न खातांना बोटांना त्याचा स्पर्श समजतो. त्यामुळे ‘अन्न कडक आहे कि मऊ आहे’, हे समजते, म्हणजे त्वचाही सहभागी होते आणि शेवटी जीभ, म्हणजे रसना त्या अन्नाची चव घेत घेत, स्वाद घेत त्यातील आनंद अनुभवते. म्हणजेच आपण अन्न ग्रहण करतो, त्यामध्ये पंचज्ञानेंद्रियांचाही सहभाग असतो.
२. अन्न ग्रहण करतांना मनाचा सहभाग असल्याने आवडीचे अन्न मिळाल्यास मन प्रसन्न, तर नावडते अन्न मिळाल्यास मन दुःखी होणे
अन्न ग्रहण करतांना त्यामध्ये ‘मनाचा सहभाग कसा होतो ?’, हे पाहू. एखादा पदार्थ आवडीचा असतो, तर एखादी भाजी आवडत नसते; म्हणून नाक मुरडूनही ती खावी लागते. येथे आवड-नावड हे मनाचे कार्य, तसेच मनाचा संस्कार आहे. आवडीचे अन्न मिळाले, तर मन प्रसन्न होते. आवडत नसलेले अन्न खावे लागले, तर मन उदास आणि दुःखी होते. ‘जेवतांना मन प्रसन्न असावे, म्हणजे अन्नपचन चांगले होते’, असे शास्त्र सांगते, म्हणजेच आहारात मनाचा सहभाग महत्त्वाचा असतो. याचे कारण प्रसन्न मनाने आहार घेतला, तर योग्य प्रमाणात पाचकरस निर्माण होऊन अन्न लवकर पचते. त्यामुळे ‘जेवतांना भगवंताचे स्मरण करत आणि नामजप करत जेवण करा’, असे मोठी माणसे सांगतात.
३. आहार घेण्यामधील बुद्धीचा भाग
आहार घेण्यामध्ये ‘बुद्धीचा भाग कसा येतो ?’, तर एखादा पदार्थ आवडत असला, तरी ‘तो किती प्रमाणात खायला हवा ?’, हे बुद्धी सांगते. ‘माझ्या प्रकृतीसाठी माझ्या आजारपणात कोणता आहार घेणे योग्य आहे ?’, हे बुद्धीला कळते. बुद्धी मनावर नियंत्रण ठेवून ‘किती खावे’, याचे ज्ञान देत संयम ठेवते.
४. जेवल्यावर तृप्तीची भावना आत्म्याला होत असल्याने आहार ग्रहणात आत्माही सहभागी असणे
आता शेवटी ‘आत्मा कसा सहभागी होतो ?’, हे पाहू. पोटभर आणि आवडीचे जेवल्यावर आपण सहजच म्हणतो, ‘वा ! काय जेवण होते ! तृप्त झालो !’ जेवल्यावर तृप्तीची भावना आत्म्याला येते.
अशा प्रकारे आहार ग्रहण करण्यात पंचज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी आणि आत्मा या सर्वांचा सहभाग असतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे वरील चिंतन झाले. यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो !’
– श्री. प्रकाश वसंत करंदीकर (वय ६७ वर्षे), फोंडा, गोवा. (२०.७.२०२४)