स्थूलता वाढण्याची कारणे आणि उपाययोजना !

बर्‍याच अनारोग्यकर गोष्टी अगदी ‘सहज असेच असते’, असे म्हणत नकळत आपण स्वीकारल्या आहेत. भले ती कार्यालयातील मेजवानी असो, वारंवार बाहेरून घरी अन्न मागवणे, पॅकबंद खाद्यपदार्थाची सोय सोडून अन्य ठिकाणीही वाढत चाललेला वापर असो किंवा कामाच्या ताणाने होणारा व्यायामाचा अभाव. त्याच्या परिणामांना सामोरे जातांना मधुमेह, कर्करोग, हृदयरोग या रोगांसह या सगळ्याच्या मुळाशी दिसते ते लक्षण म्हणजे स्थूलता. ‘हार्मोन’ (संप्रेरके) वर-खाली असणे किंवा आनुवंशिक काही घटक याने वाढलेले वजन समजून घेता येते; परंतु समाजाचा मोठा भाग जेव्हा आपले जीवन आणि खाण्याच्या निवडी यांमुळे हे ओढवून घेत असतो, तेव्हा त्याकडे लक्ष द्यायला हवे आणि सध्या अशा व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे.

‘कॅल्विन क्लाईन’ आस्थापनाचे वर्ष २०२३ मधील विज्ञापन भीत्तीपत्रक पाहिले असेल, तर तेथील मॉडेल्स पाहून ही समस्या किती अधिक आहे, हे कळते. ‘मागणी तसा पुरवठा’, या उक्तीप्रमाणे ‘नोव्हो नॉर्डिक्स’ कंपनीचे ‘wegovy’ सारखे औषध असो किंवा कपड्यांच्या उत्पादनांचे विविध प्रकार. यातूनच स्थूलतेची वाढत चाललेली गंभीर समस्या आपल्याला कळते. अमेरिका, चीन यानंतर भारताची स्थूलतेमध्ये टक्केवारी आहे. जपान या देशात स्थूलता अत्यल्प आहे आणि त्याचे कारण त्या लोकांचे त्यांच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या खाण्याचा अवलंब आहे, हे संशोधन सांगते. आपली आपल्या खाण्यापासून आणि संस्कृती नियमांपासून होत चाललेली फारकत, हेही स्थूलता वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे.

आयुर्वेदात आठ अनारोग्यकर किंवा आजारांना निमंत्रण देणार्‍या अवस्थांमध्ये अतीस्थूल किंवा अतीबारीक असणे, अशा अवस्था सांगितल्या आहेत. त्यातही स्थूल असणे, हे अधिक त्रासदायक आहे; कारण त्याविषयीचे उपचार अवघड आहेत.

१. अतीस्थूलता वाढण्यामागील कारणे

आयुर्वेदात अतीस्थूल, तसेच मेदोरोग यांत वजन वाढीची कारणे आणि उपाय दिले आहेत. प्रारंभी ही समस्या अग्नीमांद्य या कारणाने चालू होऊन मग त्यात वरील बाकी कारणे असतील, तर इतर धातूंना नीट पोषण न मिळता फक्त मेद धातूचेच पोषण अधिक अनारोग्यकर पद्धतीत होत जाते. पुढे त्यातून चालू होते अनियंत्रित वजन वाढ. साहजिकच ‘कमी खाऊनही वजनात वाढ होणे’, हे लक्षण दिसू लागते आणि अशा ठिकाणी अग्नीवर काम करणारी औषधे दिली असता चांगला लाभ झालेला दिसतो.

२. स्थूलता टाळण्यासाठी पाळावयाचे काही उपाय

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

आनुवंशिक / बीजदोष / वेगळा आजार असेल, तर सतत वजनाकडे लक्ष देणे पुष्कळ आवश्यक ठरते; मात्र जर दिनचर्या न पाळल्याने किंवा खाण्या-पिण्याचे अपथ्य किंवा व्यायामाच्या अभावाने त्रास होत असेल, तर खालील उपाय करता येतात –

अ. थंडी सोडून इतर ऋतूंमध्ये न्याहारी टाळणे.

आ. सकाळचे जेवण साधारण दुपारी १ वाजण्याच्या आत आणि रात्रीचे ८ वाजण्याच्या आत करावे.

इ. कुळीथ, मूग, सातू, बाजरी, ज्वारी, बाजरी अशा लहान आकाराच्या धान्यांचा वापर करावा.

ई. आहार मात्रा प्रमाणात ठेवणे. सर्वग्रह, म्हणजेच सर्व पदार्थ मिळून आहाराचा आकार कमी करणे.

उ. थंडी / पावसाळा यांमध्ये वैद्यकीय सल्ल्याने गरम / कोमट / औषधीयुक्त सिद्ध पाणी पिणे.

ऊ. रात्रीचे जेवण निम्मे ग्रहण करणे किंवा पातळ सूप / कढण करणे.

ए. झोप नियमित असणे आणि व्यायाम न चुकता करत रहाणे महत्त्वाचे.

…आणि अपथ्य अन्नाचे प्रमाण वाढत जाते !

घरची पाणीपुरी, घरी केलेली पावभाजी, घरात केलेले इडली, डोसा, आप्पे, हे पदार्थ स्वच्छता, रंग आणि घटक पदार्थांची गुणवत्ता यादृष्टीने चांगले असले, तरी वारंवार खाल्ले असता आंबटपणा, तिखटपणा अन् आंबवलेपणा यांतून होणारे त्रास, म्हणजे तोंड येणे, पोट बिघडणे, आम्लपित्त होऊन मानदुखी, तोंड कडू पडणे आणि मिरचीमुळे होणारे नेहमीचे त्रास देणार आहेतच. यासह आपल्याला असे वाटत असते, ‘अरेच्चा, आम्ही तर अपथ्य कधीतरीच करतो…’

‘एखादा पदार्थ कधीतरीच होतो’, असे म्हणतांना तो कुठल्या वर्गात मोडतो, हेही महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ १५ दिवसांतून एकेकदाच होणारे पावभाजी, वडापाव, बिस्कीट, वाढदिवसाचा केक, डोसा आणि इडली हे एकूण मोजले असता ते १५ दिवसांत ५-६ वेळा होतात, म्हणजेच अंदाजे आठवड्यात २-३ वेळा. यासमवेतच प्रतिदिन घेत असलेले लिंबूपाणी, ‘ॲपल सिडार व्हिनेगर’ (वजन न्यून करण्यासाठी सफरचंदाचे यिस्ट घालून सिद्ध केलेले पेय), जेवणातील टोमॅटो, कोशिंबिरीमधील दही, चिंचेची चटणी इत्यादी. अशा रितीने पदार्थ खातांना तो एकच वर्गात मोडणारा पदार्थ एकांगी सलग सलग होत नाही ना ? हे सूत्र बर्‍याचदा बघितले जात नाही आणि एकंदर त्या प्रकारच्या अपथ्य अन्नाचे प्रमाण वाढते, हे एक लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे !

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

ऐ. थालीपीठ, भाज्यांची खिचडी, फळभाज्या, भाकरी, कटलेट, सूप, वेगवेगळी धान्ये एकत्र करून घावन, मूग वरण-भात, कुळीथ पिठले-भात, धपाटा तूप, ताकातील पालेभाज्या आणि भाकरी, असे विविध पदार्थ करून खाता येऊ शकतात.

ओ. प्रतिदिन अंगाला तीळ तेल आणि विशिष्ट ठिकाणी मोहरी तेल अभ्यंग करणे. त्रिफळा, मेथी इत्यादि मेदोहर द्रव्यांचे उटणे वापरावे.

औ. पुष्कळ शहाळे, फळे, फळांचे रस, न शिजवलेल्या भाज्या खाऊन पोटात गॅस (वायू), पोटफुगी असता त्याने ही वजन वाढलेले दिसते.

अं. थायरॉईड, ‘पीसीओडी’ (’पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज’ – मासिक पाळीशी संबंधित आजार), प्रमेह, कृमीरोग यांचे आयुर्वेदाच्या दृष्टीने निदान करून वैद्यांकडून औषधे घ्यावीत.

क. पोटाची तक्रार असता औषध, पंचकर्म आणि आहार यांविषयी मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे.

हे सगळे उपाय आपल्याला माहिती असतात, त्यांच्यापर्यंत आपण पोचू शकत असतो; पण सगळ्या गोष्टीत एक महत्त्वाचे, ते म्हणजे त्या व्यक्तीची हे सर्व करण्याची इच्छा असणे. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते; पण पाणी त्यानेच प्यायला हवे हे नक्की !

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (४.३.२०२५)