नवी देहली – चलनी नोटा हाताळल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत, तसेच नोटा किंवा नाणी हाताळून संसर्गाला आमंत्रण देण्यापेक्षा लोकांनी डिजिटल बँकिंगचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन इंडियन बँक्स असोसिएशनने नागरिकांना केले आहे. असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांनी शक्यतो बँकांच्या शाखेमध्ये जाऊ नये आणि अधिक प्रमाणात रोख रक्कम वापरू नये. त्यातही रोखीचे व्यवहार केल्यावर आणि तसे करण्यापूर्वी किमान २० सेकंद हात धुवावेत. नोटा हाताळणे, त्या मोजणे आणि पैसे देण्याचे काम करणे आदी गोष्टींनंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.