मुंबई सेवाकेंद्रामध्ये प.पू. डॉक्टरांच्या सहवासात असतांना सेवेच्या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे !

१५ एप्रिल २०२५ या दिवशी प्रसिद्ध केलेल्या भागात आपण सेवाकेंद्रात प्रथमच आल्यावर मी अनुभवलेली प.पू. डॉक्टरांची प्रीती आणि त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेल्या विविध सेवा, तसेच मला जाणवलेली प.पू. डॉक्टरांची काही वैशिष्ट्ये पाहिली. या भागात आपण मी व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने केलेले प्रयत्न आणि सेवा करतांना साधकांनी केलेले साहाय्य, यांविषयीची काही सूत्रे पाहूया.              

(भाग ६)

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांचा साधनाप्रवास

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/902972.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

९. मुंबई येथील सेवाकेंद्रात निवासाला असतांना व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने केलेले प्रयत्न !

९ अ. नामजप

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

१. ‘सेवाकेंद्रात असतांना आमची ‘नामजप करणे’, ही प्रमुख साधना होती. त्यामुळे ‘नामजप अधिकाधिक कसा होईल ? तो अधिक खोलवर कसा जाईल ?’, हे पहाण्याचा माझा प्रयत्न असे. त्याच्या जोडीला सत्संग, सेवा आणि त्याग हे पुढचे पुढचे टप्पे होते.

२. सेवाकेंद्रात आम्ही संत आणि साधक यांच्या सहवासात असल्याने ‘नामजप मनात अधिक खोल रुजवण्याची संधी आहे’, असे मला वाटले. मी सेवा करतांना नामजप करण्याचा प्रयत्न करत होतो.

९ आ.  सेवा

१. या कालावधीत मला नवीन सेवा आणि त्यासंबंधी प.पू. डॉक्टरांचे दृष्टीकोन शिकायला मिळाले. मी एकाग्रतेने आणि परिपूर्णतेने सेवा करण्याचा प्रयत्न करत होतो.

२. माझी सेवा पूर्ण झाल्यावर प.पू.डॉक्टर मला त्यातील चुका सांगायचे. तेव्हा ‘मी नेमके कुठे अल्प पडलो ?’, हे मी पहाण्याचा प्रयत्न करत असे.

३. ‘प्रसारकार्याचे व्यवस्थापन योग्य व्हावे’, यासाठी त्यातील अडचणी सोडवणे आणि त्या दुरुस्त करण्यासाठी कार्यपद्धत घालणे, याचा मी प्रयत्न करत असे. यासंबंधी प.पू. डॉक्टरांकडून मला दिशा मिळून नवीन शिकण्यातील आनंद मिळायचा.

४. ‘अध्यात्मप्रसाराचे कार्य अधिक वाढावे आणि ते समाजोपयोगी अन् राष्ट्रहिताचे व्हावे’, अशी माझी तळमळ वाढली.

५. या काळात माझ्या मनात ‘नामजप आणि सेवा’ यांव्यतिरिक्त अन्य कुठलेच विचार येत नसत. मनात कुठेतरी व्यावहारिक गोष्टींची काळजी असायची; पण मला त्याविषयी अस्वस्थता वाटत नसे.

६. सेवाकेंद्रात असतांना मी सकाळी ९ वाजता प.पू. डॉक्टरांकडे जात असे. तेव्हा मी दिवसातील नवीन सेवांची नोंद करून घ्यायचो आणि मग नव्या अन् जुन्या सेवा एकत्र करून सेवेला आरंभ करायचो. माझी सेवा रात्री १२ वाजेपर्यंत अखंड चालू रहात असे. त्यामुळे मी सेवेमध्ये पूर्णपणे गुंतून रहात असे.

९ इ. साधकांना स्वीकारणे

१. काही वेळा साधकांकडून सेवा करून घेतांना अडचणी येत; कारण मला सर्वच नवीन होते. तेव्हा प.पू. डॉक्टर मला म्हणाले, ‘‘आपल्याला या आणि अशाच साधकांना जमेल तसे समवेत घेऊन हे कार्य पूर्ण करायचे आहे.’’ हे ऐकून मला साधकांना स्वीकारणे सोपे झाले.

२. ‘साधकांची क्षमता आणि शिक्षण पाहून त्यांना सेवा देणे किंवा त्यांना जमेल, तेवढीच सेवा देणे अन् त्यांना ती सेवा करणे जमत नसल्यास आपणच ती शिकून घेऊन ती पूर्ण करणे’, हे सूत्र माझ्या मनावर बिंबले.

९ ई. सेवाकेंद्रातील साधकांनी सेवेत साहाय्य करणे : त्या वेळी सेवाकेंद्रामध्ये श्री. दिनेश शिंदे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), श्री. मनोज कुवेलकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि श्री. सत्यवान कदम (आताचे सद्गुरु सत्यवान कदम) असे पूर्णवेळ साधना करणारे अनेक साधक होते. संदीप आळशी (आताचे पू. संदीप आळशी सनातनचे ११ वे (समष्टी) संत) आणि एक साधक हे नोकरीव्यतिरिक्त अन्य सर्व वेळ सेवेला देत होते. काही साधक प्रतिदिन थोडा वेळ येऊन सेवा करत असत, तर काही साप्ताहिक सुटीच्या दिवशी येऊन सेवा करत. त्यांच्याकडून मला पुष्कळ शिकायला मिळाले. श्री. दिनेश शिंदे यांना सर्व कार्यपद्धती ठाऊक होत्या. माझ्यावर मुंबईत जाऊन सेवा करण्याचे दायित्व आले की, मला त्यांचा मोठा आधार वाटायचा. श्री. सत्यवान कदम सेवाकेंद्रांतर्गत कोणत्याही सेवेसाठी मला साहाय्य करायचे. श्री. मनोज कुवेलकर साप्ताहिकासाठीचे संगणकीय टंकलेखन करून द्यायचे. एक साधक सेवाकेंद्रातील प्रत्येक गोष्टीविषयी म्हणजे वापरून झालेल्या कागदांची विल्हेवाट कशी लावायची ?’, येथपर्यंत सर्वच सांगत असत.

पू. संदीप आळशी

पू. संदीप आळशी शुद्धलेखनासंबंधी साहाय्य करीत.

९ उ. सेवा करतांना ‘आंतरिक समाधान झाले, तर ती सेवा परिपूर्ण होते’, हे सूत्र शिकायला मिळणे : ‘मी विविध कारणांसाठी बनवलेले संगणकीय तक्ते (सारण्या) तपासणे, ‘त्यांची मांडणी योग्य झाली आहे का ? त्यांची रचना ठीक आहे का ?’, हे पहायला शिकत होतो. हे मला सर्व नवीन होते. मी लिखाणात सुधारणा केलेला कागद घेऊन प.पू. डॉक्टरांकडे जात असे. त्यात ते आणखी सुधारणा करायला सांगत. असे हे चक्र चालत असे. एकदा असे ५ – ६ वेळा झाले आणि त्यानंतर मला ‘एकदाचे पूर्ण झाले’, असे वाटले. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘सेवा झाल्यावर आपल्या अंतर्मनात समाधान झाले का ?’, हे पहावे. ते होईपर्यंत सुधारणा करत रहाव्यात. ‘अंतर्मनात समाधान झाले’, असे वाटले, तर ‘ती सेवा परिपूर्ण झाली. नाहीतर ती परिपूर्ण नाही झाली’, असे लक्षात घ्यावे.’’

९ ऊ. संकलनासाठी आलेले कच्चे लिखाण चिकाटीने संपादन करण्यास शिकवणे : साधकांकडून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’साठी येणारे लिखाण अत्यंत कच्चे असायचे. त्यातील मराठी भाषा, शब्द, व्याकरण आणि वाक्ये, हे सर्व फार अडचणीचे असायचे. त्यात सूत्रांचा क्रम गोंधळात टाकणारा असे. अनेकदा मला वाटायचे, ‘हे सगळे असे दुरुस्त करण्यापेक्षा तीच गोष्ट आपण स्वतंत्रपणे कागदावर लिहिली आणि त्या व्यक्तीचे नाव दिले, तर त्याचे संकलन करणे सोपे होईल आणि ते अल्प वेळेत होईल.’ याचे कारण असे की, कुणीतरी लिहून पाठवलेली एखादी कथा असते. मी त्यावर पेन्सिलने दुरुस्त्या करतो. तो कागद प.पू. डॉक्टरांकडे गेल्यावर ते त्यावर आणखी दुरुस्त्या करतात. अशा प्रकारे एकाच कागदावर असंख्य वेळा दुरुस्त्या होत असत. त्यामुळे त्यात नवीन घातलेले मथळे-उपमथळे कळत नसत. शुद्धलेखनाच्या केलेल्या दुरुस्त्याही कळत नसत. ‘त्या तपासणे आणि दुसर्‍याने केलेले त्याचे टंकलेखन योग्य आहे का ? हे पहाणे’, यांत माझा पुष्कळ वेळ जात असे आणि मला पुष्कळ ताणही येत असे. मला हे चिकाटीने करणे आणि सगळ्यांचा अर्थ लावणे, फारच कठीण वाटत होते. ‘त्यापेक्षा ती गोष्ट सरळ वेगळ्या कागदावर लिहून काढली, तर ते दहा मिनिटांत होऊन जाईल’, असे मला वाटले; पण प.पू. डॉक्टर तसे फेरलिखाण करू देत नसत. मला यातून पुढील सूत्रे शिकायला मिळाली, ‘समोर जे लिखाण येते, ते दुरुस्त करून देता येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपली बुद्धी, वाचनातील कौशल्य इत्यादी बारकाव्यांचा कस लागतो. त्यातून एखाद्या मजकुरावर अनेक घंटे काम करण्याची बुद्धीची क्षमता वाढते. त्यामुळे आपण स्वतःला सुधारतो. काहीतरी सोपा मार्ग काढणे, म्हणजे समस्येतून पळवाट काढणे, असे आहे.’

९ ए. अन्य साधकांचा विचार करून महाप्रसादाचा निरोप येताच त्वरित महाप्रसादाला जाणे : ‘मी जुलै ते ऑक्टोबर १९९८ या कालावधीत सेवाकेंद्रात रहायला होतो. तेव्हा तेथील स्वयंपाकघरात सेवा करायला फारसे साधक नव्हते. कु. महानंदा पाटील (आताची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) या तेथे नियमित असायच्या. आम्ही ४ – ५ जण दूरवर असलेल्या दुसर्‍या सदनिकेमध्ये सेवा करायचो. दुपारी अथवा रात्री महाप्रसाद सिद्ध झाल्यानंतर एखादा साधक अंतर्गत दूरभाष करून महाप्रसाद सिद्ध असल्याचे सांगत असे. हा संदेश आल्यानंतर आम्ही सगळे लगेचच महाप्रसाद घेण्यास जात नव्हतो. त्यामुळे स्वयंपाक करणार्‍या आणि नंतरचे आवरणार्‍या साधकांना सेवा आटोपण्यास विलंब होत असे. माझ्याकडूनही एकदा जेवायला जाण्यास थोडा विलंब झाला. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी समर्थ रामदासस्वामी यांची पुढील गोष्ट सांगितली. ‘एकदा समर्थ रामदासस्वामी यांचा शिष्य जंगलातून जात असतांना त्याच्यासमोर वाघ आला. तेव्हा ‘वाघ आपल्याला खाणार’, असे वाटून शिष्याने श्रीरामाचा अनेक वेळा धावा केला. वाघ निघून गेला.’ त्याने समर्थांना ही अनुभूती सांगितली. तेव्हा समर्थ त्याला रागावले आणि म्हणाले, ‘एकदाच हाक मारली, तर राम येईल, याची निश्चिती नव्हती का ?’ तेव्हा ‘गुरु किंवा देव भक्ताच्या एका हाकेसरशी लगेच येतात, तर आपल्याला जेवणासाठी पुनःपुन्हा का बोलवावे लागते ?’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हापासून महाप्रसादाला येण्याचा पहिला निरोप येताच मी लगेच जात असे आणि अन्य साधकांनाही महाप्रसादाला वेळेत जाण्यास सांगत असे.

९ ऐ. दुसर्‍यांची झोपमोड होऊ न देणे : एखाद्या खोलीत कुणी साधक झोपला असेल, तर ‘प.पू. डॉक्टर त्या साधकाची झोपमोड होणार नाही’, याची पुष्कळ काळजी घेत असत. मग भले ती झोपेची वेळ असो अथवा नसो !

(क्रमशः)

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२४)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/903801.html