डॉ. दुर्गेश सामंत यांना साधनेत वेळोवेळी प्रोत्साहन देऊन त्यांना आधार देणारे प.पू. डॉक्टर आठवले !

१६ एप्रिल २०२५ या दिवशी प्रसिद्ध केलेल्या भागात आपण डॉ. दुर्गेश सामंत यांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने केलेले प्रयत्न पाहिले. या भागात आपण प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. दुर्गेश सामंत यांचा साधनेचा पाया कसा भक्कम केला आणि ते साधनेत टिकून रहाण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी केलेले विविध प्रयत्न यांविषयीची माहिती वाचूया.  

(भाग ७)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/903396.html

प.पू. भक्तराज महाराज

१०. प.पू. भक्तराज महाराज यांच्यामुळे साधनेत आल्यावर विविध सेवा करण्याची संधी देऊन, तर कधी प्रोत्साहन देऊन प्रत्येक प्रसंगात सांभाळणारे प.पू. डॉक्टर ! 

मी मुंबई सेवाकेंद्रात ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’साठी आलेले कच्चे लिखाण गोळा करणे, त्याची निवड करणे आणि त्यावर पुढील संस्करण करणे’, हे शिकण्यासाठी आलो होतो. पहिल्या काही दिवसांतच हे सर्व थोडेफार शिकून झाले. त्यानंतर प.पू. डॉक्टर मला अन्य सेवाही सांगू लागले. त्यामुळे मी त्या सेवा समजून घेऊ लागलो. हीसुद्धा प.पू. डॉक्टरांचीच कृपा ! अशा प्रकारे मी सेवाकेंद्रात सेवा करत असल्यापासून आतापर्यंत साधनेत टिकून रहाण्याची पुढील काही कारणे आहेत.

१० अ. प.पू. भक्तराज महाराज यांनी साधनेचा पाया भक्कम करणे 

१. प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) माझ्याशी दूरभाषवर वारंवार बोलत असत. ते मला इंदूरहून आठवणीने पुनःपुन्हा प्रसाद पाठवत, तर कधी इंदूरहून ईश्वरपूरला येऊन प्रत्यक्ष सत्संग देत. अशा प्रकारे त्यांनी माझ्या साधनेचा पाया अगदी भक्कम केला.

२. प.पू. बाबांनी वैखरीतून दिलेल्या आशीर्वादामुळे ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ आजच्या काळातही शक्य आहे, तसेच ‘बाह्य स्थिती कशीही असली, तरी अंतर्मनात साधना चालू रहाणारच आहे’, असे मला वाटते. माझ्या मनाला कधी निरुत्साह वाटला, तर केवळ प.पू. बाबांच्या स्मरणाने माझ्या मनाला बरे वाटते.

३. सूक्ष्मातून प.पू. बाबांची माझ्यावर कृपा आहेच, हे निःसंशय ! यामुळे प्रथमपासूनच माझी साधना निर्विघ्नपणे आणि उत्तम प्रकारे चालू झाली. विशेषतः नामजप अधिकाधिक होत राहिला.

४. प.पू. बाबांनी मला ‘अद्वैत तत्त्वज्ञानाविषयीची सूत्रे आणि त्या दृष्टीने साधना’, यासंदर्भात सांगितले. अद्वैत तत्त्वज्ञानाचे ज्याला पूर्ण ज्ञान झाले आहे, तोच आपल्या शब्दांतून आणि वागण्या-बोलण्यातून ते सांगू शकतो.

५. प.पू. बाबांनी मला त्यांच्या भजनांचा अभ्यास करायला सांगितले. ‘मी अध्यात्माच्या दिशेने जाऊ शकतो’, असा आत्मविश्वास वाढण्यासाठी त्यांनी मला स्वतःचा अनमोल सहवास दिला. यामुळे माझी अद्वैत दर्शनाची गोडी वाढली. आज या संदर्भात मला झालेला कणमात्र बोध केवळ प.पू. बाबांमुळेच आहे.

६. सर्वांत महत्त्वाचे आणि साधनेत टिकून रहाण्याचे एकमेव कारण, म्हणजे प.पू. बाबांनी मला आवर्जून ‘तू शेवटपर्यंत डॉक्टरांच्या समवेत रहा’, असे सांगितले होते.

७. यामुळे ‘प.पू. बाबांमुळे मी कुठेही गेलो, कोणत्याही स्थितीत असलो, तरी या जिवाची साधना कदाचित् धीम्या गतीने होईल; परंतु बंद कधीच पडणार नाही’, याची मला निश्चिती झाली.

१० आ. साधकाने साधनेत टिकून रहावे, यासाठी प.पू. डॉक्टरांनी केलेले विविध प्रयत्न 

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१० आ १. विविध सेवा करण्याची संधी देणे : प.पू. डॉक्टरांनी मी सेवाकेंद्रात असतांना आणि नंतरही माझ्यामध्ये विविध प्रकारच्या सेवा करण्याची रुची निर्माण केली. त्यांनी मला विविध प्रकारच्या सेवांमध्ये सहभागी करून घेतले. त्यामुळे माझी सतत नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची आणि त्यातून सतत शिकत रहाण्याची प्रक्रिया चालू राहिली. ‘प.पू. डॉक्टरांनी मला त्या त्या सेवेच्या अंतर्गत त्यांचे दृष्टीकोन कसे असतात ?’ हे कधी माझ्या चुका प्रत्यक्ष दाखवून किंवा अन्य प्रकारे सांगितले. कधी त्यांनी लेखनावर दिलेल्या टिपण्या ते मार्गदर्शनात सांगत असत. यांमुळे माझे मन अप्रत्यक्षरित्या सेवेत गुंतत राहिले.

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

१० आ २. प्रोत्साहन देणे : प.पू. डॉक्टरांनी मला विविध प्रकारे प्रोत्साहन दिले. कधी प्रसाद देऊन, तर कधी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष बोलण्यातून त्यांनी मला प्रोत्साहन दिले. कधी नियतकालिकांत माझ्यासंदर्भात चांगले बोल लिहून मला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये संपादकत्व दिले, तर कधी मला दूरचित्रवाहिनीवर बोलण्यासाठी प्रोत्साहित केले. कधी माझ्या नावाने ग्रंथ प्रसिद्ध करून, तर कधी मी सहभागी असलेल्या ध्वनीचित्रचकत्या प्रसिद्ध करून, अशा कितीतरी मार्गांनी त्यांनी मला प्रोत्साहित केले. त्यांनी मला हर प्रकारे सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे.  प.पू. बाबांमुळे मी सनातनमध्ये आलो. आजवर मी प.पू. डॉक्टरांच्या समवेत राहिलो आणि सनातनमध्ये राहिलेल्या या देहाला (मनाला) प.पू. डॉक्टरांनी सनातनमधून बाहेर जाऊ दिले नाही.

१० आ ३. प.पू. डॉक्टरांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आधार दिल्यामुळे साधनेत टिकून रहाता येणे : ‘जोपर्यंत आपल्याला अंतर्यामी साधनेची दिशा सापडत नाही आणि बुद्धीचा पूर्ण निश्चय होत नाही, तोपर्यंत बाहेरील विविध प्रकारच्या साधनांचे साहाय्य घेऊन हळूहळू का होईना, साधना चालू ठेवणे आवश्यक असते’, असे मला वाटते. ‘एकदा श्रद्धा दृढ झाली की, मगच आपण साधनेत टिकून राहू’, असे मला वाटते. साधक स्वतःच्या पायावर उभा राहून क्षणोक्षणी केवळ साधनाच करू लागेपर्यंत त्याला महत्त्वाचा विविधांगी बाह्य आधार मिळाल्यास त्याची साधना सोपी होते. प.पू. डॉक्टरांनी हस्ते-परहस्ते, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मला आधार दिला. त्यामुळे मी साधनेत टिकून राहिलो आहे.

१० इ. साधकांचे अनमोल साहाय्य : साधनेला आरंभ केल्याच्या अगदी आरंभीच्या काळात परिचित झालेले साधक, तसेच प.पू. बाबांचे भक्त, सेवा करतांना समवेत असणारे साधक, कोणत्याही अडीअडचणीला धावून येणारे साधक, ही साधना करणार्‍यांसाठी एक मोठी कृपा आहे. सनातनमध्ये आल्याने ती आपसूक मिळते. साधनेत टिकून रहायला, हेही एक महत्त्वाचे सूत्र आहे. विशेषकरून ऑक्टोबर १९९८ मध्ये गोव्यात आल्यानंतर येथील साधकांनी मला पुष्कळ प्रेम आणि आधार दिला.’

(क्रमश : )

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२४)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/904199.html