‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’कडून अष्टविनायक गणपतींपैकी ३ मंदिरांसह ५ मंदिरांमध्ये वस्रसंहिता लागू !

मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती !

पुणे – अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांसह चिंचवडचे मोरया गोसावी संजीवन मंदिर, तसेच खार नारंगी मंदिरात दर्शनासाठी पोशाखाची नियमावली घोषित करण्यात आली आहे. ही ५ मंदिरे ज्या ट्रस्टच्या अखत्यारीत आहेत, त्या चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून ही वस्रसंहिता (वस्रसंहिता म्हणजे मंदिरात कपडे घालून येण्याच्या संदर्भातील नियमावली) लागू करण्यात आली आहे; मात्र ही सक्ती नाही, तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आल्याचेही ‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’चे म्हणणे आहे.

वस्रसंहिता

त्यामुळे यापुढे अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यातील पाचही गणपति मंदिरांत आता परिपूर्ण आणि अंगभर पोशाख घालूनच भाविकांनी दर्शनाच्या रांगेत उभे राहिले पाहिजे.

चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या पत्रातून करण्यात आलेली विनंती !

१. महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर येथे आणि श्री मंगलमूर्ती वाडा या केवळ वास्तू नसून, ते अध्यात्म, संस्कृती आणि भक्ती यांचा केंद्रबिंदू आहेत. येथे येणार्‍या प्रत्येक भक्ताने मंदिराच्या पवित्रतेचा आदर राखावा आणि भक्तीपर वातावरण टिकवण्यासाठी सहकार्य करावे.

२. पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा. महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा. कुणीही अती आधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिराच्या प्रांगणात परिधान करू नयेत.

संपादकीय भूमिका

 ‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’चा अभिनंदनीय निर्णय !