‘गोमाताच सर्व काही करते’, असा भाव ठेवून गोव्यातील सर्वांत मोठी गोशाळा चालवणारे श्री. कमलाकांत तारी !

श्री. कमलाकांत तारी हे ‘गोमंतक गौसेवक महासंघ, गोवा’ संचालित मये, डिचोली येथील सिकेरी गोशाळा चालवतात. वर्ष २०१५ मध्ये केवळ २ गायींनी प्रारंभ केलेल्या या गोशाळेत आज ५ सहस्र ५०० गोवंश आहे. गोव्यातील ही सर्वांत मोठी गोशाळा आहे. श्री. कमलाकांत तारी यांनी ३३ वर्षे सरकारी खात्यामध्ये निःस्वार्थीपणे नोकरी करून ते सेवानिवृत्त झाले. गोशाळेत गायीच्या पुंगनूर, ओंगोल, संचोर, नागोरी, थरपारकर, कोंकरेज, राठी, सहिवाल, गीर, देओनी, श्वेत कपिला, कोकण गिड्डा, कोकण कपिला आणि मलनाड गिड्डा या जाती पहायला मिळतात. ‘गोमाताच सर्व काही करते आणि आम्ही काहीच करत नाही’, असा भाव ठेवून श्री. कमलाकांत तारी हे गोशाळेचे मोठे दायित्व पार पडत असतात. गोशाळा चालवण्यासाठी त्यांना प्रेरणा कुठून मिळाली ? गोसेवा करतांना त्यांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती, गोसेवेचे महत्त्व आज आम्ही त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊया.

श्री. कमलाकांत तारी

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल ! – संपादक

१. योगऋषी रामदेवबाबा यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेतून गोशाळा चालू करणे !

वर्ष २००९ मध्ये मी पडिक शेती ओलीताखाली आणून त्यामध्ये विविध प्रकारचे भातांचे बियाणे पेरायला प्रारंभ केला. या वेळी लक्षात आले की, गायीविना शेती अपूर्ण आहे. प्रारंभी डिचोली येथील प्राणीमित्र श्री. अमृत सिंग आणि वाळपई येथील गोप्रेमी श्री. हनुमंत परब यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी गोशाळेच्या कार्यात उतरण्याचे ठरवले. यानंतर योगऋषी रामदेवबाबा यांच्याशी जोडण्याचा योग जुळून आला आणि मी योगशिक्षक झालो. योगऋषी रामदेवबाबा ‘गायीला वाचवा आणि देश वाचवा’, असे सांगायचे अन् या घोषणेमुळे मी प्रेरित झालो आणि गोसंवधर्नाचा विषय हाती घेतला. प्रारंभी वर्ष २०१५ मध्ये आम्ही साळ, डिचोली येथे ‘श्वेत कपिला गोशाळा आणि संशोधन केंद्र’ चालू केले. या गोशाळेसाठी श्री. दिगंबर राऊत यांनी भूमी दिली होती. ही जागा पुढे अपुरी पडायला लागल्याने मोठ्या गोशाळेचा विचार पुढे आला. गोशाळेत प्रतिदिन गोवंशियांना केवळ खावडीसाठी (चार्‍यासाठी) ८ लाख ५० सहस्र रुपये व्यय येत असतो. सरकारच्या विविध योजनांमधून मिळत असलेले अर्थसाहाय्य आणि गोप्रेमी सढळ हस्ते करत असलेले साहाय्य यांद्वारे हा व्यय भागवला जातो. गोवा सरकार ‘रस्त्यावरील गायींचे व्यवस्थापन’ योजना राबवत असल्याने गोशाळेचे कार्य करण्यास प्रोत्साहन मिळाले आणि सरकारच्या साहाय्यानेच गोशाळा मोठी झाली आहे.

२. ‘गोमाताच सर्व काही करते’ असा भाव ठेवून कार्य करणे

‘केवळ ९ वर्षांमध्ये एवढी मोठी भरारी कशी घेतली ? आणि आपण एवढी मोठी गोशाळा कशी चालवता ?’, याविषयी सांगायचे झाल्यास मी काही केलेले नाही, तर सर्व गोमाताच करत असते. सामान्य माणूस हे कार्य करू शकत नाही. गोमाताच आम्हा सर्वांच्या माध्यमातून हे कार्य करून घेते. यामुळे या कार्यात अडचणी येत नाही. अडचणी आल्याच, तरी त्या गोमातेने अगोदर सोडवलेल्या असतात. ‘गोमाता ही विश्वाची जननी आणि संकट निवारण करणारी आहे’, असा पुराणात उल्लेख आहे. सर्वांचे दु:ख सर्वप्रथम गोमातेलाच लक्षात येते. गोमातेमध्ये सर्व देवतांचा वास असतो. गायीला मिठी मारल्यानंतर मनुष्याचा ताणतणाव, नैराश्य न्यून होते आणि रोग निवारण होते. विदेशी लोकांनी आम्हाला गायीचे महत्त्व सांगायची आवश्यकता नाही; कारण आमच्या ऋषिमुनींदी गायीचे महत्त्व सांगून ठेवलेले आहे. गाय ही आमची संस्कृती आहे आणि अमृत आहे. गायीचे दूध आणि मूत्र प्राशन केल्याने मनुष्याचे रोग बरे होतात. गायीचे महत्त्व पटल्याने आज श्रीमंत लोक ‘पुंगनूर’ जातीची गाय (ही गाय आकाराने लहान असते) घरी आणून तिचे पालनपोषण करत आहेत. यामुळे लोकांच्या हातातून गायीची सेवा घडू लागली आहे. गोमातेची महत्त्व समजलेला गायीची सेवा करतो, आनंदी जीवन जगतो आणि ज्याला गोमातेचे महत्त्व समजलेले नाही तो गायीची सेवा करत नाही अन् तो जीवनात दु:खी होतो. मनुष्याने दु:खातून बाहेर पडण्यासाठी गोमातेला शरण जावे, ती काहीच कमी पडू देणार नाही.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून पुरस्कार स्वीकारतांना श्री. कमलाकांत तारी (उजवीकडे)

३. गोमातेची महती न समजल्याने ही समस्या उद्भवली आहे. गोमातेची सेवा करणार्‍या गोसेवकांची आज उणीव भासते. गोमातेची महती आज आम्हाला सर्वांपर्यंत पोचवायची आहे.

‘गोमंतक गौसेवक महासंघ, गोवा’ला मिळालेले विविध पुरस्कार

‘गोमंतक गौसेवक महासंघ, गोवा’ संचालित गोशाळेला वर्ष २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वर्ष २०२३ मध्ये ‘श्वेत कपिला’ (गोव्यातील गायीची एक जात) गायीचे संरक्षण करणारी भारतातील पहिली गोशाळा म्हणून गौरवण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी ‘इंडियन रिसर्च ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट’कडून गोशाळेला ‘इनोव्हेटीव्ह फार्मस’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

४. गोशाळा स्वत:च्या पायावर उभी रहाण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न

वर्ष २०२३ मध्ये योगऋषी रामदेवबाबा यांचा सिकेरी येथील गोशाळेत चरणस्पर्श झाला. योगऋषी रामदेवबाबा यांनी ‘गोशाळा स्वत:च्या पायावर उभी करावी आणि त्यासाठी दुसर्‍यावर अवलंबून रहायला नको’, अशी शिकवण दिली. या वेळी योगऋषी रामदेवबाबा यांनी गोमूत्रापासून अनेक औषधांची निर्मिती, गोअर्क, गोनाईल् (गोमूत्रापासून घरी लादी पुसण्यासाठी सिद्ध केलेले रसायन) सिद्ध करण्याचे मोठे प्रकल्प उभारण्यास सांगितले आणि यासाठी ५० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले. यंदाच्या वर्षी हे प्रकल्प मोठ्या स्वरूपात चालू होणार आहेत. सध्या गोशाळेत शेणापासून लाकडे बनवली जातात आणि या लाकडांचा स्मशानभूमीत वापर होऊ शकतो. शेणापासून गोवर्‍या, ब्लॉक, विविध प्रकारचे खत सिद्ध केले जात आहे.

५. ‘प्रत्येक गावातील प्रत्येक वाड्यावर एक गोशाळा असावी’ असा संकल्प !

गोशाळा ही सर्वांची प्रेरणास्थान बनली पाहिजे. गोशाळा ही गोप्रेमी आणि गोसेवक यांची झाली पाहिजे. या ठिकाणी प्रत्येकाने निःस्वार्थी भावनेने काम करून गोमातेचा आशीर्वाद घेतला पाहिजे. गोशाळेकडे एक धंदा म्हणून पाहू नये, अन्यथा तिला एक डेअरी म्हणावे लागले. गोशाळेतील उत्पन्न केवळ गोशाळेच्या उद्धारासाठीच वापरले पाहिजे. ‘गोव्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यात न्यूनतम एक गोशाळा, दुसर्‍या टप्प्यात प्रत्येक गाव किंवा प्रत्येक पंचायत क्षेत्रात एक गोशाळा आणि शेवटच्या टप्प्यात प्रत्येक पंचायतीच्या प्रत्येक प्रभागामध्ये एक गोशाळा असावी’, असा आमचा संकल्प आहे. प्रत्येक गोसेवकाने एक गाय आपल्या घरी पोसावी. गावातील प्रत्येक मंदिरात न्यूनतम एक गोशाळा किंवा ‘एक गाय आणि एक वासरू’ असलेच पाहिजे. याचा लाभ सर्वांनाच होऊ शकतो. आज तरुण पिढीने सनातन संस्थेसारख्या संस्थांचे मार्गदर्शन घेऊन गोसेवेच्या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे.

६. गोसेवेत युवा वर्गाचा सहभाग वाढण्यासाठी ‘गोमंतक गौसेवक महासंघ’ योजना

युवा वर्ग आज गोसेवेत यावा; म्हणून ‘गोमंतक गौसेवक महासंघ’ अनेक योजना राबवत आहे. एखाद्या तरुणाला गोसेवा करण्याची इच्छा असल्यास त्याने गोशाळेत यावे आणि तेथे त्याला आम्ही भूमी देऊ, गायी अन् गायींना खाण्यासाठी चारा देऊ. संबंधित तरुणाने गायीचे केवळ पालनपोषण करायचे आहे आणि गायीपासून मिळणारे दुधाची विक्री करून स्वत:चा संसार चालवायचा आहे. मये परिसरात एखादा व्यक्ती गोसेवा करू इच्छित असल्यास आणि त्याच्याकडे त्यासाठी भूमी असल्यास ‘गोमंतक गौसेवक महासंघ’ त्याला साहाय्य करण्यास सिद्ध आहे. प्रत्येकाने नोकरीच्या मागे धावल्यास अंग मेहनतीची कामे कोण करणार? प्रत्येकाने चांगला व्यवसाय किंवा नोकरी करावी; मात्र दिवसाकाठी सुमारे २ घंटे गोसेवेसारखी अंग मेहनतीही कामे करावी; मात्र आज असे होतांना दिसत नाही. युवा वर्ग देशाचे रक्षण आणि उदरभरण करण्यासाठी कमी पडत आहे. ‘काम करण्याची आवश्यकता नाही, तर सरकार आम्हाला सर्व काही तोंडापर्यंत आणून देतो’, अशी तरुणांची भावना झालेली आहे.

७. गोमंतकियांना आवाहन

नागरिकांनी घरात राहिलेले अन्न, हिरवा भाजीपाला, चिकन, मटण, बाटलीच्या काचा, लोखंडी तारा, स्क्रू डायव्हर आदी प्लास्टिक पिशवीत घालून ती उकिरड्यावर टाकू नये. परिणामी गायी अशा प्लास्टिकमधील पदार्थ खाण्यासह ती पिशवीही खातात. यामुळे गोवंश दगावत असून प्लास्टिक ही एक गंभीर समस्या बनली आहे. सिकेरी येथील गोशाळेत प्लास्टिक खाल्ल्याने आजारी पडलेल्या ४ गायींवर आम्ही शस्त्रक्रिया केल्या. या वेळी एका गायीच्या पोटातून ३५ किलो, दुसर्‍या गायीच्या पोटातून ५५ किलो, तिसर्‍या गायीच्या पोटातून ६१ किलो अन् चौथ्या गायीच्या पोटातून ७५ किलो प्लास्टिक आम्ही बाहेर काढले; मात्र त्या गायींना आम्ही वाचवू शकलो नाही. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिक पिशवीचा वापर न्यूनतम करावा.

८. ‘गोवंश दत्तक योजने’चे २५० जण आहेत लाभार्थी !

‘गोमंतक गौसेवक महासंघा’च्या वतीने ‘गोवंश दत्तक योजना’ राबवली जाते आणि या योजनेचा लाभ २५० जण घेत आहेत. यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पशूसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांचाही समावेश आहे. याखेरीज गोशाळेत ‘गोवंश दत्तक योजना’, ‘गोदान योजना’, ‘सप्रेम दान योजना’, ‘अन्नदान योजना’ आणि ‘खाद्य दान योजना’ राबवल्या जातात.

९. गोवा सरकारसह मोकाट गुरांसाठी योजना

गोवा सरकारची ‘मोकाट गुरे व्यवस्थापन’ योजना असून या अंतर्गत उत्तर गोव्यातील अनेक पंचायतींनी मोकाट गुरांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने ‘गोमंतक गौसेवक महासंघ, गोवा’कडे करार केलेला आहे. या अंतर्गत रस्त्यावर मोकाट फिरणारी आणि अपघातात घायाळ झालेली गुरे पालनपोषण करण्यासाठी आणली जातात. यानंतर सरकार गोवंशियांच्या पालनपोषणासाठी प्रत्येक गोवंशियांच्या मागे ठराविक रक्कम गोशाळेला संबंधित पंचायतीच्या माध्यमातून पुरवत असते.

‘गोमाताच पालनपोषण करणारी आहे’, हे दर्शवणारी वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

कोरोना महामारीच्या काळात सिकेरी येथील गोशाळेत १ सहस्र २०० गोवंश होता. या वेळी गोवंशियाला लागणारी खावड (चारा) दारोदारी फिरून गोळा करत होतो. एक दिवस असा प्रसंग आला की, काहीच खावड मिळू शकली नाही. यामुळे गोवंशियांना खावड देता आली नाही आणि सर्व गोवंशियांना जवळच्या मोकाट शेतात सोडले. गोवंशियांना गोठ्यात खावड खायची सवय असल्याने सर्व गायी लगेच गोशाळेत परतल्या. या दिवशी सर्व गोवंश केवळ पाण्यावर होता. दुसर्‍या दिवशीही खावड मिळाली नाही. गोवंशियांना पुन्हा मोकाट शेतात सोडले; पण ते काहीच न खाता गोशाळेत परत आले. दुसर्‍या दिवशी केवळ पाणी आणि खायला काहीच नाही, अशी स्थिती होती. त्या दिवशी सायंकाळी गायींच्या हंबरण्याचा (रडण्याचा) आवाज चालू झाला आणि त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. असाच तिसरा दिवसही गेला.

चौथ्या दिवशी मी गोठ्यात गेलो आणि गायींच्या पुढे लोटांगण घातले अन् गोमातेच्या पुढे नाक घासले. ‘‘एवढे दिवस मला वाटत होते की, मीच तुम्हाला खायला घालतो, मी लोकांकडून पैसे गोळा करून पालनपोषण करतो, ही सर्व व्यवस्था मीच उभारली आहे. आता माझ्या लक्षात आले की, हे सर्व करणारा मी कुणी नाही, तर गोमाते तूच सर्व काही करत असते. हे मला आता समजून चुकले आहे. गोमाते हे सर्व तूच करत आहे, त्यामुळे तू सर्व दायित्व स्वीकार’’, असे म्हणून मी पुष्कळ रडलो. आम्ही सर्वजण ३ दिवस जेवलो नाही. त्यानंतर तिसर्‍या दिवशी रात्री ३.३० वाजता मला एक भ्रमणभाष आला. ‘खावडीच्या दोन गाड्या उभ्या आहेत आणि त्या घे’, असे भ्रमणभाषवर बोलणार्‍या व्यक्तीने सांगितले. मी धावत जाऊन ती खावड आणून गायींना भरवली. ज्याने भ्रमणभाष केला, त्याला ‘धन्यवाद’ म्हणण्यासाठी मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण त्या व्यक्तीचा भ्रमणभाष बंद होता. तब्बल १६ दिवसांनी त्या व्यक्तीने भ्रमणभाष घेतला. मी त्याला ‘चारा पाठवल्याबद्दल आभारी आहे’, असे म्हटले आणि यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘‘आपण आभार का मानता ? तुमच्या गोशाळेत खावड पाठवण्याचा मला दृष्टांत ३ दिवसांपूर्वी झाला होता. त्यानुसार मी कृती केली.’’ या घटनेनंतर गोशाळेत गोवंशियांसाठी खावड कधीच न्यून पडलेली नाही. गोशाळेतील सर्व गोदाम आतापर्यंत भरलेले आहे.

– श्री. कमलाकांत तारी