Gadchiroli Education Director Arrested : गडचिरोली येथील शिक्षण उपसंचालकांना अटक !

  • बनावट कागदपत्रांद्वारे मुख्याध्यापकांची नियुक्ती केल्याचा आरोप !

  • भंडारा येथील मुख्याध्यापकही कह्यात !

उल्हास नरड

नागपूर – नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना ११ एप्रिलच्या रात्री गडचिरोली येथे अटक करण्यात आली. बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकी पेशाचा अनुभव नसलेल्या व्यक्तीला मुख्याध्यापकपदी नियुक्त केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

नागपूर शिक्षण विभागाचे वेतन आणि भविष्य निर्वाह अधीक्षक निलंबित !

येथे वर्ष २०१९ पासून बनावट प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यात अनुमाने ५८० बनावट कर्मचार्‍यांच्या नावे वेतन काढून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शालार्थ पोर्टलवरील त्रुटींच्या पडताळणीत हा घोटाळा उघडकीस आला. याच प्रकरणात नागपूर शिक्षण विभागाचे वेतन आणि भविष्य निर्वाह अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. या घोटाळ्यात आणखी काही वरिष्ठ अधिकारी गुंतले असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

अशांचे निलंबन नको, तर त्यांना बडतर्फच करायला हवे !- संपादक

या प्रकरणी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवताळा येथील मुख्याध्यापक पराग पुडके यांनाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे. पुडके यांना शिक्षक म्हणून कोणताही अनुभव नसतांना नरड यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांना थेट मुख्याध्यापकपदी नियुक्त केले.

संपादकीय भूमिका

जेथे मुख्याध्यापकाचीही नियुक्ती पारदर्शकपणे होत नसेल, तेथे शाळांचा कारभार कसा हाकला जात असेल ?, याचा विचारच न केलेला बरा ! विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार्‍या अशांना सरकारने कारागृहात डांबण्याचीच शिक्षा द्यायला हवी !