संपादकीय : ‘टेरिफ वॉर’ ! 

डॉनल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग

‘तिसरे जागतिक महायुद्ध होणार’, असे म्हटले जात आहे. अनेक संत, भविष्यवेत्ते आणि ज्योतिषी असे सर्वच जण याविषयी सांगत आहेत; मात्र सध्यातरी जगभरात ‘टेरिफ वॉर’ (आयात शुल्काचे युद्ध) चालू झाले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी प्रखर राष्ट्रवादी विचारांचे डॉनल्ड ट्रम्प बसल्यानंतर त्यांनी युक्रेन आणि रशिया युद्ध थांबवण्याचा प्रयत्न चालू केला, तर इस्रायल अन् हमास यांच्यातील युद्धावर काही काळासाठी तरी प्रतिबंध लावला. एकीकडे ट्रम्प शस्त्रांनी लढण्यात येणारे युद्ध थांबवत असतांना त्यांनीच ‘टेरिफ वॉर’ आरंभले आहे, असेच चित्र सध्या जगाच्या पटलावर आहे. या युद्धात ‘अमेरिका विरुद्ध संपूर्ण जग’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या युद्धाचा परिणाम आर्थिक स्तरावर दिसून येत असून अनेक देशांचे शेअर बाजार लाखो कोटी रुपयांनी कोसळले आहेत. याचा फटका जागतिक स्तरावर होऊन जगात मंदीची लाट येणार असल्याचा दावा तज्ञांकडून केला जात आहे. कोरोना महामारीनंतर अमेरिका आणि युरोप येथे मंदी निर्माण झाली होती. त्यातून हे देश सावरलेले नसतांना युक्रेन आणि रशिया युद्ध चालू झाले अन् आता टेरिफ वॉर चालू झाले आहे. याचा पुष्कळ मोठा परिणाम येत्या काही दिवसांत दिसून येणार आहे. त्याच वेळी अमेरिकेला कोंडीत पकडण्यासाठीही प्रयत्न केला जात आहे, हेही दिसून येत आहे. ट्रम्प यांच्या आयात शुल्क वाढीचे कोणत्याही देशाने १०० टक्के समर्थन केलेले नाही. प्रत्येक देश याला अल्प-अधिक प्रमाणात विरोध करत आहे. अमेरिकेचे मित्र असणार्‍या युरोपातील राष्ट्रांनाही ट्रम्प यांनी धक्का दिल्याने तेही त्यांच्या विरोधात गेले आहेत, तर चीनने अमेरिकेला ‘जशास तसे’ उत्तर दिल्याने ट्रम्प यांनी चीनवर ३४ टक्क्यांवरून १०४ टक्के आयात शुल्क वाढवले आहे. हे टोक गाठल्यासारखे आहे. याचा परिणाम जागतिक स्तरावर होणार, हे स्पष्ट आहे. दोन्ही देशांत आतापर्यंत असलेले शीतयुद्ध आता करांच्या मार्गाने उघडपणे चालू झाले आहे. यात कुणाचा विजय आणि कुणाचा पराभव होणार, हे आगामी काळच सांगणार असला, तरी यातून प्रचंड मोठी उलथापालथ होणार, यात शंका नाही. ‘या काळात भारताला कसे स्थिर ठेवायचे ? आणि त्यातून बाहेर काढून पुढे कसे जायचे ?’ याचा विचार भारत सरकार करत आहे अन् त्या दिशेने पावले टाकली जात आहेत. भारताने ट्रम्प यांच्या शुल्कवाढीच्या धोरणाला यापूर्वीच पाठिंबा दिला होता. तसेच अमेरिकेच्या उत्पादनांवर भारतात लावण्यात येणारा कर अल्पही केला. तरीही ट्रम्प यांना त्याहून अल्प कराची अपेक्षा आहे आणि याविषयी भारत मुत्सद्देगिरीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून भारताला या कराची झळ अल्प प्रमाणात सोसावी लागेल. त्याच वेळी तज्ञांच्या मतांनुसार भारताला अमेरिकेच्या टेरिफ वॉरचा लाभही होणार आहे. अमेरिकेत चीनने मोठी बाजारपेठ मिळवली आहे. आता चीनवर मोठा कर लागल्याने त्याची उत्पादने महाग होतील आणि त्याच वेळी भारतीय उत्पादने त्या तुलनेत स्वस्त मिळाल्याने अमेरिकी नागरिक त्याला प्राधान्य देतील, असे म्हटले जात आहे. असे होईल का ? हे येणारा काळच सांगेल. तूर्तास तरी अमेरिकेच्या बाजारपेठेतून चीन हद्दपार होणार, असेच चित्र आहे. याचा प्रचंड मोठा तोटा चीनला सोसावा लागणार आहे. इतकेच नाही, तर ट्रम्प यांचे जीवलग मित्र आणि अमेरिकी उद्योगपती इलॉन मस्क यांनाही याची मोठी झळ बसणार आहे; कारण मस्क यांच्या टेस्ला वाहनांचे उत्पादन चीनमध्येही केले जाते. चीनमधून त्यांची वाहने अमेरिकेत विक्रीसाठी आल्यास त्यावर १०४ टक्के कर आकारण्यात आल्यावर ती महाग होतील आणि त्यातून ती कुणी विकत घेणार नाही. यामुळे मस्क यांनी ट्रम्प यांना कर अल्प करण्याची विनंतीही केली आहे. दुसरीकडे अमेरिकेत ट्रम्पविरोधी वातावरण निर्माण झाले आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. ज्या अमेरिकेसाठी ट्रम्प यांनी टेरिफ वॉर आरंभ केले आहे, त्या अमेरिकेतील जनताच ट्रम्प यांच्या एकूणच धोरणांच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. ‘या युद्धाचा अंत कधी आणि कसा होणार ?’, हे सांगणे तज्ञांनाही अवघड झाले आहे. ट्रम्प यांची मानसिकता पहाता ते कधी आणि कोणता निर्णय घेतील ?, याचा अंदाज वर्तवणे कठीण असल्याने भविष्यात अमेरिकेत अन् जगात काय घडणार ?, हे सांगता येणार नाही; मात्र सध्या इतकेच खरे आहे की, टेरिफ वॉर चालू झाले आहे. जे तिसर्‍या महायुद्धामुळे होऊ शकणार आहे, त्याचा बराचसा परिणाम या युद्धाने होऊ घातलेला आहे आणि त्याची चुणूक शेअर बाजाराने दाखवून दिली आहे. कदाचित् प्रत्यक्ष तिसर्‍या महायुद्धाला टेरिफ वॉर कारणीभूत ठरू शकेल, असेही म्हणता येऊ शकेल. ‘अमेरिकेची कोंडी करण्यासाठी चीनसह युरोप आणि अन्य देश एकत्र येऊ शकतील’, असे म्हटल्यास आश्चर्य वाटणार नाही; कारण ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने सर्वच देश एकत्र येऊ शकतील. नाहीतरी ट्रम्प यांनी युरोपला नाटो देशातून बाहेर पडत असल्याचे सांगून आणि युक्रेनच्या संदर्भात रशियाची बाजू घेऊन दुखावलेले आहे. त्याला टेरिफ वॉरची फोडणी मिळालेली आहे.

जनतेने काय करावे ?

‘टेरिफ वॉर’मुळे जागतिक स्तरावर मंदी येण्याची शक्यता असल्याने या काळात जगभरातील जनतेने खर्च अल्प करण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उधळपट्टी न करण्यासह काटकसर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यातून जितकी बचत करता येईल, तितकी करावी लागेल. शेअर बाजार गडगडल्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. त्यातून उत्पादन ठप्प होऊ शकेल. त्यातून बेरोजगारी निर्माण होईल. आधी भारतासह बहुतेक देशात बेरोजगारीची समस्या असतांना त्यात प्रचंड वाढ होईल. उत्पादन ठप्प झाल्यास बाजारात वस्तूंची मागणी वाढेल आणि त्याचा परिणाम महागाईवर होईल. या वेळी हातात पैसा असेल, तर याची झळ काही प्रमाणात सोसता येईल. जर बचत नसेल, तर जगणे आणखी कठीण होऊ शकते. उद्या शेअर बाजार कोसळण्याचा परिणाम बँकांवरही झाला, तर सरकार बँकेतून पैसे काढण्यावर काही प्रमाणात निर्बंध आणू शकते. हा दुष्काळात तेरावा महिना असू शकतो. त्यामुळे जर कुणी घरात काही प्रमाणात तरी रोख रक्कम ठेवावी, असा सल्ला दिला, तर तो चुकीचा ठरणार नाही. आपत्काळात पैसा महत्त्वाची गोष्ट असणार आहे. याच काळात जर तिसरे महायुद्ध भडकले, तर देवाला शरण जाण्यावाचून पर्याय उरणार नाही. कुणी कितीही सोंग आणले, तरी पैशाचे सोंग आणता येत नाही, अशी स्थिती निर्माण होईल. त्यामुळे या ‘टेरिफ वॉर’कडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.

‘टेरिफ वॉर’ची झळ सोसण्यासाठी जनतेने काटकसर आणि बचत यांकडे लक्ष देऊन भविष्याची सिद्धता करावी !