६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या विदेशी साधिकेला श्री प्रत्यंगिरादेवीचे तारक रूप दिसणे

साधिकेने रेखाटलेले तारक रूपातील श्री प्रत्यंगिरादेवीचे चित्र

१. श्री प्रत्यंगिरादेवी तारक रूपात असून तिच्यात श्री लक्ष्मीतत्त्व असणे

‘चित्रातील श्री प्रत्यंगिरादेवीचे हे तारक रूप असून तिच्यात श्री लक्ष्मीतत्त्व आहे. त्यामुळे श्री लक्ष्मीदेवी ज्या रंगाची साडी परिधान करते, तशीच साडी प्रत्यंगिरादेवीने परिधान केली असून तिने आशीर्वादाची मुद्रा धारण केली आहे.

२. मारक रूपात असलेल्या श्री प्रत्यंगिरादेवीने तारक रूप धारण करतांना झालेली सूक्ष्मातील प्रक्रिया

२ अ. ‘मारक ते तारक’ हे श्री प्रत्यंगिरादेवीचे होत असलेले अवस्थांतर : मला जेव्हा श्री प्रत्यंगिरादेवीचे प्रथम दर्शन झाले, तेव्हा मला ती मारक रूपात आणि नंतर तारक रूपात दिसली. देवीचे मारक-तारक रूप दिसले नाही किंवा ती करत असलेले रूपांतरही दिसले नाही. मी जेव्हा देवीचे मारक रूप रेखाटत होते, तेव्हा देवाने ‘देवी तिचे मुख बंद करत आहे आणि ती तारक रूपात आली आहे’, असे मला दाखवले.

२ आ. ‘मारक ते मारक-तारक’ आणि नंतर ‘पूर्णतः तारक’ अशी देवीने धारण केलेल्या रूपांची सूक्ष्मातील प्रक्रिया : श्री प्रत्यंगिरादेवी मारक रूपात असतांना तिचे मुख सिंहाप्रमाणे होते. जेव्हा ती मारक रूपातून मारक-तारक आणि नंतर तारक रूपात आली, तेव्हा तिचे मुख मानवाप्रमाणे झाले. असे होतांना प्राण्याच्या रूपात असलेले देवीचे रूप प्रथम नाहीसे झाले आणि नंतर तिचे मानवी रूप हळूहळू दिसू लागले, उदाहरणार्थ, चेहर्‍यात पालट होतांना दोन डोळ्यांतील अंतर न्यून झाले. देवीचे नाक लांब आणि बारीक झाले, मुख लहान आकाराचे झाले, तसेच देवीचे दात आकुंचन पावले आणि ते मानवाच्या दातांच्या आकाराचे झाले.

३. साधिकेने देवाला विचारलेला प्रश्न आणि त्याचे देवाने दिलेले उत्तर

३ अ. प्रश्न : श्री प्रत्यंगिरादेवीच्या डोळ्यांचा रंग हिरवा का आहे ? देवीचे डोळे बदामी रंगाचे का नाहीत ?

उत्तर : श्री प्रत्यंगिरादेवीचे डोळे बदामी रंगाचे असतात, तेव्हा ती तारक रूपात असते. जेव्हा देवी मारक रूपात असते, तेव्हा तिचे डोळे लाल रंगाचे असतात. जेव्हा ती मारक रूपातून तारक रूपात जाते, तेव्हा मधल्या टप्प्यात तिचे डोळे हिरव्या रंगाचे असतात. त्यामुळे जेव्हा तुला (ऑक्टोबर २०२१ मध्ये) चामुंडादेवीचे तारक रूप दिसले, तेव्हा तिचे डोळे हिरव्या रंगाचे होते. चामुंडादेवी आणि श्री प्रत्यंगिरादेवी या तांत्रिक देवी आहेत. त्यामुळे त्यांच्यात तारक तत्त्वाच्या तुलनेत मारक तत्त्व अधिक कार्यरत असते. परिणामस्वरूप चामुंडादेवी आणि

श्री प्रत्यंगिरादेवी तारक रूपात दिसल्या, तरी हिरव्या रंगाची मारक शक्ती अजूनही त्यांच्यात कार्यरत असल्याने त्यांचे डोळे हिरव्या रंगाचे दिसतात.

४. साधिकेने संतांना विचारलेला प्रश्न आणि त्यांनी दिलेले उत्तर

४ अ. प्रश्न : अन्य तांत्रिक देवींचे डोळे रेखाटतांना मी ते हिरव्या रंगात दाखवले आहेत. हंसवाहिनी देवीप्रमाणे अन्य ज्या देवी आहेत, त्यांचे डोळे मात्र मी बदामी रंगाचे दाखवले आहेत. सर्वच तांत्रिक देवींचे डोळे हिरव्या रंगाचे असतात का ?

उत्तर : नाही. त्यांच्या मनाच्या तारक किंवा मारक अवस्थेप्रमाणे डोळ्यांचा रंग असतो. तारक अवस्था असली, तर रंग निळा, पिवळा अथवा गुलाबी इत्यादी असतो आणि मारक अवस्था असली, तर रंग लाल, काळा किंवा राखाडी इत्यादी असतो.

परात्पर गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), तुमच्या कृपेमुळेच मला सूक्ष्मातील परिमाण (पैलू) आणि सूक्ष्मातून होत असलेल्या प्रक्रिया यांविषयी शिकता येत आहे. ही सेवा मी एकटीने करणे केवळ अशक्य आहे; परंतु तुमच्या कृपेने अशक्य असे काहीच नाही. ‘माझ्यावर तुमची सदोदित कृपा असावी, माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी ‘मी कसे प्रयत्न करू’, हे तुम्हीच मला शिकवा’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– विदेशातील एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)


साधिकेला श्री प्रत्यंगिरादेवीचे मारक-तारक रूप दिसणे

साधिकेने रेखाटलेले मारक-तारक रूपातील श्री प्रत्यंगिरादेवीचे चित्र


१.
‘१६.९.२०२२ या दिवशी श्री प्रत्यंगिरादेवीची मायावी रूप आणि मारक रूप अशी दोन चित्रे काढत असतांना ‘ती स्वतःचे मुख बंद करत असून तिने मारक-तारक रूप धारण केले आहे’, असे मला दिसले.

२. श्री प्रत्यंगिरादेवीने स्वतःचे मुख बंद केल्यावर तिच्याभोवती असलेल्या अग्नीच्या ज्वाळा शांत झाल्या. देवीच्या सभोवताली असलेली मारक शक्ती न्यून झाली आणि देवीने मारक-तारक रूप धारण केले. त्याच वेळी शीतल असे श्रीविष्णुतत्त्व देवीकडे प्रवाहित होऊन तिच्यात विलीन झाले.

३. जेव्हा महाकालीने पूर्ण मारक रूप धारण केले होते, तेव्हा केवळ शिवानेच तिला शांत केले होते. त्याचप्रमाणे प्रत्यंगिरा देवीलाही केवळ श्रीविष्णुतत्त्वच शांत करू शकते आणि ती तारक रूप धारण करू शकते.’

– विदेशातील एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक