अमेरिकेच्या आयात शुल्काच्या विरोधात भारत आणि चीन यांनी एकत्र यावे !

चीनच्या दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग यांचे भारताला आवाहन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

बीजिंग (चीन) – ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या आयात शुल्कामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आणि चीन यांनी एकत्र आले पाहिजे. चीन-भारत आर्थिक व्यापारी संबंध परस्पर लाभांवर आधारित आहे. अमेरिका आयात शुल्काचा अपवापर करत असल्याने आपल्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या अडचणींना तोंड देण्यासाठी विकसनशील देशांनी एकत्र उभे राहिले पाहिजे, असे आवाहन चीनचे भारतातील दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत केले आहे.

पोस्टमध्ये यू जिंग यांनी पुढे म्हटले की, व्यापार युद्धात किंवा आयात शुल्क युद्धात कुणीही विजेता नसतो. सर्व देशांनी परस्पर चर्चेच्या तत्त्वांचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर बहुपक्षीयतेचे समर्थन केले पाहिजे. ते करत असतांना एकाधिकारशाहीचा  संयुक्तपणे विरोध केला पाहिजे.

संपादकीय भूमिका

चीनला अमेरिकेने धडा शिकवल्यानंतर चीनला भारताची आठवण होत आहे अन्यथा चीन भारताला जितका त्रास देता येईल तितका प्रयत्न करत आहे. चीनची आयात शुल्कामुळे होणारी हानी भारताच्या पथ्यावरच असल्याने भारत या आवाहनाकडे दुर्लक्ष करणार यात आश्चर्य नाही !