
नवी देहली – अमेरिकेने आयात शुल्क लागू केल्यानंतर जगभरात त्याचे नकारात्मक परिणाम दिसू लागले आहे. भारतासाठी २६ टक्के शुल्क आकारण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी अमेरिकेचे ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ आणि राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे आंतरराष्ट्रीय संबंधविषयक प्रमुख सल्लागार मार्को रूबियो यांच्याशी चर्चा केली.
१. डॉ. जयशंकर यांनी ‘एक्स’वर याची माहिती देत सांगितले की, या चर्चेत दोन्ही बाजूंनी लवकरात लवकर भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार पूर्ण करण्यावर सहमती दर्शवण्यात आली. या वेळी भारतीय उपखंड, इंडो-पॅसिफिक, मध्य-पूर्व आशिया आणि कॅरेबियन (अमेरिकेजवळील बेटांचे देश) राष्ट्रांविषयी आमच्यात संवाद झाला. द्विपक्षीय व्यापर कराराला लवकरात लवकर मूर्त रूप देण्यावरही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.
२. अमेरिकेकडून भारतावर २६ टक्के व्यापार कर लागू करण्यात आल्यानंतर भारताकडून इतर बाजारपेठांचा शोध चालू आहे. युरोपीयन युनियन, ब्रिटन, न्यूझीलंड आणि ओमान या देशांशी मुक्त व्यापारासंदर्भात चर्चा वाढवण्याच्या संदर्भात पावले उचलली जात आहेत.