पणजी, ७ एप्रिल (वार्ता.) – गोवा राज्यात प्रथमच इयत्ता ६ वी ते १२ वी (इयत्ता ११ वी वगळता) यांचे नवीन शैक्षणिक वर्ष ७ एप्रिलपासून प्रारंभ झाले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्यातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ९० टक्के उपस्थिती होती. काही शाळांनी फुले, फळे आणि वह्या देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दुपारी ११.३० वाजता शाळा सोडण्यात आल्या. बहुतांश शाळांमध्ये उष्म्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घेण्यासह पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
राज्यात पहिल्यांदाच एप्रिल मासात शाळा चालू करण्यात आल्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक शैलेश झिंगडे आणि गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी तिसवाडी तालुक्यांतील अनेक शाळांना भेटी दिल्या. पालक सीसील रॉड्रिगीस आणि अन्य काही जणांनी एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्षाला प्रारंभ केल्याने सरकारच्या धोरणाचा शिक्षण संचालनालयासमोर एकत्र येऊन विरोध दर्शवला.
विरोध करणार्यांनी विनाकारण पालकांना वेठीस धरू नये ! – प्रसाद लोलयेकर, सचिव
नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये चालू करण्यास विरोध असलेले या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात गेले होते; मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून एप्रिलमध्ये शाळा चालू करण्यास अनुमती दिली आहे. हा विषय येथेच संपायला पाहिजे होता; मात्र काही जण याला आताही विरोध करत आहेत. या विरोधामागे नेमका उद्देश काय आहे ? हे सर्व पालकांनी ओळखणे आवश्यक आहे, असे मत शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर यांनी या वेळी म्हटले.