भक्तीसत्संगातील सूत्रांवरून भगवान श्रीविष्णु आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील लक्षात आलेले साम्य !

‘सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यानंतर आरंभीची जवळजवळ ३ वर्षे जरी मला गुरुदेवांचे दर्शन झाले नव्हते, तरी ‘ते साक्षात् ईश्वरच आहेत’, असे जाणवायचे. प्रत्यक्ष दर्शनानंतर आणि आश्रमात राहून साधना करू लागल्यानंतर कधी वाटायचे, ‘ते श्रीराम आहेत’, तर कधी वाटायचे, ‘ते श्रीकृष्ण आहेत.’ पुढे ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव हे साक्षात् श्रीविष्णूचे कलियुगातील अंशावतार आहेत’, असे नाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले. स्वाभाविकच गुरुदेवांमध्ये श्रीविष्णूची वैशिष्ट्ये आहेत !

वैकुंठचतुर्दशीच्या निमित्ताने झालेल्या भक्तीसत्संगात श्रीविष्णूची वैशिष्ट्ये आणि विविध नावांचा कार्यकारणभाव सांगितला. ते ऐकत असतांना मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे स्मरण झाले. श्रीविष्णूच्या वैशिष्ट्यांशी साम्य असलेली मला जाणवणारी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची काही निवडक वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

(भाग १)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. साधना करण्यास इच्छुक जिवांसाठी आश्रमांची कवाडे सदैव खुली ठेवणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव ! 

वैकुंठचतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णु आपल्या भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार उघडतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अखिल जगतातील साधना करणार्‍या जिवांसाठी भारतातील विविध ठिकाणी असणार्‍या आश्रमांची कवाडे सदैव उघडी ठेवली आहेत. केवळ सनातन संस्थेच्या साधकांनाच नव्हे, तर साधना करण्यासाठी उत्सुक असणार्‍या जिज्ञासूंनाही ते ‘आश्रमात येऊन रहा आणि साधनेतील बारकावे शिकून घ्या’, असे नेहमी सांगतात.

२. साधना करणार्‍या प्रत्येक जिवाविषयी निरपेक्ष प्रेम आणि करुणा असणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव ! 

‘ज्याच्या मनात भक्तांविषयी दया असते, प्रेमाचा ओलावा असतो, तो विष्णु’, असे श्रीविष्णूचे एक वैशिष्ट्य आहे.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या मनातही साधना करणारा प्रत्येक जीव आणि उपासक यांच्याविषयी निरपेक्ष प्रेम अन् करुणा असते. एखाद्या साधकाकडून चूक झाल्यानंतर काही वेळा गुरुदेव कठोर होऊन चुकीची जाणीवही करून देतात; परंतु ते कठोर होणे तात्कालिक असते. (त्यांनी कितीही प्रेमाने जाणीव करून दिली, तरी आम्हा साधकांना ते जाणीव करून द्यावी लागते, हाच मोठा अपराध वाटतो.- श्रीमती वाघमारे) दुसर्‍याच क्षणी त्यांच्या मनातील त्या साधकाप्रतीचे वात्सल्य जागृत होते. ‘त्या साधकाच्या जन्माचे कल्याण व्हावे’, हा त्यांचा त्यामागील शुद्ध हेतू असतो. साधक चुकला; म्हणून त्यांनी त्याला दूर ढकलले, असे आजवर कधीच झाले नाही आणि होणारही नाही. हे केवळ मीच नव्हे, तर अनेक साधकांनी अनुभवले आहे.

श्रीमती अलका वाघमारे

३. अखिल जगतातील सर्व साधकांच्या अवतीभोवती गुरुदेवांचा सूक्ष्मरूपात सदैव संचार असणे  

भगवान श्रीविष्णूचा संपूर्ण विश्वामध्ये सदैव आणि सर्वत्र संचार असतो. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या संदर्भात हे मी गेली २५ वर्षे अनुभवत आहे. साधक जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी सूक्ष्मरूपाने समवेत राहून गुरुदेव साधकांची काळजी घेतात. साधकांपासून गुरुदेव कितीही दूर असले, तरी त्यांचे पुसटसे स्मरण झाल्यासही साधकांना त्यांचे अस्तित्व जाणवते. अखिल जगतातील सर्व साधकांच्या अवतीभोवती गुरुदेवांचा सूक्ष्मरूपात सदैव संचार असतो. केवळ सनातन संस्थेच्याच नव्हे, तर जगाच्या पाठीवरील कोणत्याही साधकाच्या संदर्भात आपल्याला असेच आढळेल.

४. साधकांचे सर्वस्व हरण करून त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव ! 

‘हरि’ हे भगवान श्रीविष्णूचे एक संबोधन आहे. भक्तांचे दुःखासह सर्वस्व हरण करून कृपावर्षाव करणारा तो ‘हरि !’ हे भगवान विष्णूचे एक वैशिष्ट्य आहे.

अ. नेमके हेच सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी साधकांच्या जीवनात दुःख, दैन्य काहीच ठेवलेले नाही. जीवनात कितीही मोठे संकट आले, दुःख आले, तरीही गुरुदेवांच्या केवळ स्मरणाने साधकांना आधार वाटतो. ‘ते सूक्ष्मरूपाने आपल्या समवेत आहेत’, या जाणीवेने साधक आपले दुःख विसरतात. गुरुकृपायोगानुसार साधना शिकवून गुरुदेवांनी आम्हा साधकांना ‘आनंदी कसे रहायचे ?’, हे शिकवले आहे.

आ. गुरुदेव जसे दुःख हरण करतात, तसेच साधना करणार्‍या जिवाचा अहंकारही हरण करतात. अहंकार वाढला असल्यास तो नष्ट होण्यासाठी अगदी छोटासा का होईना; पण असा काही प्रसंग घडवतात की, साधकाला त्याची जाणीव होते आणि तो शरणागतीने अहं-निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे चालू करतो. याशिवाय ‘स्वभावदोष आणि अहंकार यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’सारखे माध्यमही त्यांनी साधकांना दिले आहे. त्या माध्यमातून गुरुदेवांनी आम्हा साधकांवर अखंड कृपाच केली आहे.

इ. साधक कितीही आजारी असू दे, तो अंथरूणावर खिळलेला असला, तरी गुरुदेवांच्या आंतरिक सान्निध्यामुळे आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने तो आनंदी असतो.

ई. गुरुदेवांचे ओझरते दर्शन जरी झाले, तरी साधक चिंता, निराशा विसरतो आणि आनंदी होतो. गुरुदेवांचा एक प्रीतीयुक्त कटाक्ष जरी साधकावर पडला, तरी साधक आपले दुःख विसरतो.

उ. त्यांचे छोटेसे प्रीतीयुक्त स्मितही साधकांना आनंदी करते.

ऊ. इतकेच काय पण आपसात बोलतांना जरी गुरुदेवांचा विषय आला, तरी साधक आपल्या सर्व व्यथा विसरून आनंद अनुभवतात. हे त्यांचे वैशिष्ट्यच आहे. आम्हा साधकांच्या बोलण्यात गुरुदेवांचे स्मरण आणि त्यांचा उल्लेख असतोच असतो. साधकांच्या बोलण्यातला प्रत्येक विषय हा गुरुदेवांच्या उल्लेखानेच पूर्ण होतो.

५. एकाच स्थळी बसून कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव ! 

भगवान श्रीविष्णु क्षीरसागरात शेषशय्येवर विराजमान असतो. तेथूनच तो सर्व चराचर सृष्टीचे पालनपोषण करतो. सार्‍या जगाचे कार्य पहातो.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवही गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे एक तपापेक्षा अधिक काळ रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या १८ x १४ च्या एका खोलीत बसून अखिल जगतातील साधना करणार्‍या जिवांचा संभाळ करत आहेत. सहस्रो साधकांना घडवत आहेत. तेथे बसूनच ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्याला दिशादर्शन करत आहेत. सनातन संस्थेच्या कार्याचे विविध प्रकार त्यांच्या दिशादर्शनामुळेच चालू आहेत.

६. भक्तवत्सल असलेले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव ! 

भक्तवत्सलता हे श्रीविष्णूचे सर्वांत सुंदर वैशिष्ट्य आहे. सनातनच्या सहस्रो साधकांनीही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या भक्तवत्सलतेची अनुभूती घेतली आहे आणि प्रतिदिन घेतच आहेत. त्यांच्या भक्तवत्सलतेची ‘न भूतो न भविष्यति ।’ अशी असंख्य उदाहरणे आहेत, ज्यांची आपण आजच्या कलियुगातील वैज्ञानिक आणि बुद्धीप्रबल पर्वात (काळात) कल्पनाही करू शकणार नाही. विस्तारभयास्तव ती येथे देण्याचे टाळत आहे.

७. भक्तवत्सल भगवंताचे ‘योगक्षेमं वहाम्यहम् ।’  हे वचन सार्थ ठरवणारे गुरुदेव !

भगवान श्रीविष्णु आपल्या भक्तांचा योगक्षेम सांभाळतो. त्या भक्तवत्सल भगवंताचे ‘योगक्षेमं वहाम्यहम् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक २२) म्हणजे ‘(नित्य माझे चिंतन करणार्‍या माणसांचा) योगक्षेम मी स्वतः चालवतो’, असे वचन आहे.

अ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवही सहस्रो साधकांचा योगक्षेम सांभाळत आहेत. केवळ साधकांचे पालनपोषणच नव्हे, तर साधकांच्या कुटुंबियांची, परिवारांची काळजी देखील वहात आहेत. गुरुदेवांची ही कृपा स्थुलातून दिसत नाही; परंतु केवळ आणि केवळ त्यांच्या कृपेमुळेच साधकांच्या परिवारांचे संसारगाडे आज ओढले जात आहेत. साधकांना प्रारब्धाची झळ म्हणावी तितकी पोचत नाही.

आ. योग्य वेळ येताच साधकांना कुटुंबियांकडून होणारा विरोध मावळत आहे. साधकांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नकळत तेही साधनेकडे वळत आहेत. मग एकदा का साधनेकडे वळले, की जीवनातील दुःख, प्रारब्धाची तीव्रता सर्व काही गुरुदेवांच्या कृपेने सुसह्य होत जाते. भक्तवत्सल भगवंताचे ‘योगक्षेमं वहाम्यहम् ।’  हे वचन गुरुदेवांनी सार्थ ठरवले आहे.’

– श्रीमती अलका वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.११.२०२४)

(क्रमश:)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/894217.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक