अभिनेते जॉन अब्राहम यांनी एका मुलाखतीत ‘मी अल्पसंख्यांक आहे; परंतु भारतात मला नेहमीच सुरक्षित वाटले आहे’, असे विधान केले. ‘मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. मला माझा देश पुष्कळ आवडतो’, असेही त्यांनी या वेळी सांगितले. एखाद्या अल्पसंख्यांकाने असे विधान करणे, हे खरच आश्चर्यकारक आहे. जे अभिनेत्याने अनुभवले, ते त्याने प्रांजळपणे व्यक्तही केले. आजवर ज्यांना ज्यांना भारत असुरक्षित वाटला, त्यांना याविषयी काय म्हणायचे आहे, हे ऐकण्यासाठी प्रत्येकच राष्ट्राभिमानी भारतियाचे कान आतुरलेले आहेत; पण दुर्दैवाचे, म्हणजे जॉन अब्राहम यांच्या विधानाविषयी ‘भारत अल्पसंख्यांकांसाठी असुरक्षित आहे’, अशी ओरड करणार्या कंपूपैकी कुणीही कसलेच विधान केले नाही किंवा त्यांच्या विधानाविषयी ‘ब्र’ही काढला नाही. अभिनेते मंडळींतही अनेक जण अल्पसंख्यांक आहेत; पण जॉनच्या विधानाविषयी त्यांना कसलेही सुवेरसुतक नाही. भारतात ऐषोरामात राहून स्वत:चे पोट भरायचे, अशी स्वार्थी मानसिकता असणार्यांना कुठे असणार भारताप्रती अभिमान ? ज्या भारतात राहून तुमचे पालनपोषण होते, करमणूक वा मनोरंजन यांच्या आधारावर कामे करून जो भारत तुमचे भवितव्य घडवतो, तुम्हाला प्रसिद्धी देतो, त्याविषयी कधीच अभिमानाची भाषा कुणाकडून केली जात नाही. उलट भारत कसा असुरक्षित आहे आणि येथे रहाणे किती धोकादायक आहे, याचीच बतावणी वारंवार करणारी मंडळी या देशात रहातात, हे दुर्दैवी आहे. अनेक इस्लामी देशांना भारताविषयी द्वेष आणि भारतातील अल्पसंख्यांकांविषयी अतिशय कळवळा असतो. भारतात अल्पसंख्यांकांवरील कथित अन्यायावरून हे देश नेहमी हिंदूंच्या विरोधात गरळओक करतात. ‘भारत अल्पसंख्यांकांसाठी असुरक्षित कसा आहे ?’, ‘तेथे अल्पसंख्यांकांवरच अन्याय आणि अत्याचार कसा होतो ?’, याविषयी ते रंगवून सांगतात, नव्हे एक प्रकारे भारताची नियोजनबद्ध अपकीर्ती करतात. आता जॉन अब्राहम यांच्या विधानाने साम्यवादी विचारसरणी बाळगणार्या सर्वांचीच बोलतीच बंद झाली आहे.
असुरक्षिततेतील पोकळपणा !
काही वर्षांपूर्वी तत्कालीन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या पत्नी गीता निरूपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘भारतात माझ्या कुटुंबाला धोका आहे’, असे म्हटले होते. अभिनेते आमीर खान यांची आधीची पत्नी असलेल्या किरण राव यांनीही भारतात असुरक्षित वाटत असल्याची ओरड केली होती; पण तरीही त्यांनी अद्याप भारताचा पदर सोडलेला नाही, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही ! अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनीही मध्यंतरी त्यांच्या मुलांना भारतात ठेवण्यास असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले. भारत असुरक्षित असल्याची ओरड करणारे खुशाल अन्य देशांत जाऊन का रहात नाहीत ? इतकीच जर भारतात भीती वाटत असेल, तर सोडून द्या भारत ! कशाला रहायचे इकडे ? पण नाही ! ‘भारत आमचा आश्रयदाता आहे, त्याला कसे सोडणार ?’, अशा प्रकारे वृथा स्वाभिमान, नव्हे अहंकार जपत राष्ट्राभिमानाला लाथाडणारे केवळ ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात’, ही म्हण सार्थ ठरवतात. आतापर्यंत अल्पसंख्यांकांचे लाड केल्याचाच हा परिणाम आहे. अशांना राष्ट्रनिष्ठ भारतियांनी भारताच्या सीमेवर नेऊनच त्यांच्या लाडक्या देशात सोडायला हवे. ‘बहुसंख्यांक भारतात अल्पसंख्य हे सुरक्षितच आहेत’, हे लक्षात घ्यावे आणि अल्पसंख्यांकांनीही राष्ट्रकर्तव्य पार पाडावे !