क्रौर्याच्या परिसीमेचा इतिहास असलेल्यांमध्ये औरंगजेबाचे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. ‘छावा’ चित्रपटातून जनमानसांत जागृती झाली असून केवळ राजकीय पक्ष अथवा हिंदुत्वनिष्ठ संघटनाच नव्हे, तर सामान्य राष्ट्रप्रेमीसुद्धा हिंदूंचा उपहास करणार्या औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोझर चालवण्याची मागणी करत आहेत. या मागणीचे खरे तर समाजातील प्रत्येक वर्गातून स्वागत झाले पाहिजे; परंतु या नीच औरंग्याचे वंशज ते होऊ देणार नाहीत, ही वस्तूस्थिती आहे; परंतु त्याच्या ‘वैचारिक’ वंशजांचा देशाला अधिक धोका आहे, हे विसरून चालणार नाही. या कंपूची प्रमुख ही साहजिकच काँग्रेस असून अल्पसंख्यांकांचा अनुनय करण्यासाठी औरंगजेबाला ‘भारतरत्न’ देण्यासही ती मागे-पुढे पहाणार नाही. या जोडीला या सर्वांच्या पाठीशी आहे – भारताचे अहित चिंतणारा विखारी ‘डीप स्टेट’ ! नागपूर येथील हिंसाचाराला याचीच झालर आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
शहरातील महाल भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद औरंग्याची कबर हटवण्याची मागणी करत होते. त्या वेळी आंदोलकांनी म्हणे कुराणाचे पान जाळल्याने धर्मांध मुसलमान भडकले आणि त्यांनी दंगल घडवून आणली. या वेळी उपस्थित पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले आणि ३ पोलीस उपायुक्तांसह ३३ पोलीस गंभीर घायाळ झाले. यामध्ये १० हून अधिक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. प्राथमिक अनुमानानुसार हिंसा घडवणारा जमाव हा नागपूर शहराच्या बाहेरून आला होता.
या घटनाक्रमाचा अभ्यास करता हे षड्यंत्र आहे, हे स्पष्ट आहे. औरंग्याची कबर तोडण्याच्या मागणीमुळे राजकीय आणि अराजकीय दोन्ही स्तरांवर कोण चवताळले आहे, हेही स्पष्ट आहे. नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कबरीचे रक्षण करावे लागणे, हे आमचे दुर्दैव आहे’, असे म्हटले. यामुळेच गृहखाते असलेल्या फडणवीस यांच्या पोलिसांना आणि तेही त्यांच्याच जिल्ह्यात लक्ष्य करण्यात आले. यामुळे भाजप आणि त्यातही फडणवीस यांना लक्ष्य करण्यास काँग्रेस, एम्.आय.एम्. आदी औरंग्याचे वैचारिक वंशज मोकळे ! एका बाणात किती पक्षी मारायचे, हे या हिंदुद्वेष्ट्यांकडून शिकले पाहिजे.
‘हिंदू’निश्चय !
कितीही झाले, तरी हिंदू त्यांच्या मागणीपासून मागे हटणार नाहीत; कारण ती न्याय्य आणि लोकशाहीला बळकट करणारी मागणी आहे. यामुळेच आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ‘उत्तरप्रदेश स्टाईल’मध्ये संबंधित दंगलखोरांच्या घरांवर बुलडोझर चालवणे आवश्यक आहे’, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हिंदूंच्या भावनांशी किती काळ खेळायचे ! याची मर्यादा आता ओलांडली गेल्याने हिंदू संघटित होऊ लागले आहेत, हे ‘एम्.आय.एम्.’, काँग्रेस आणि या सर्वांना पाळणार्या ‘डीप स्टेट’च्या लक्षात येऊ लागले आहे. कोल्हापुरात नुकताच १० सहस्र हिंदूंचा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ या नामविस्तारासाठी मोर्चा निघाला. यातून अधिकाधिक हिंदू जागृत होऊन रस्त्यावर उतरू लागले आहेत. अशा प्रकारच्या दंगलींमुळे हिंदू मागे हटणार नाहीत आणि औरंग्याची कबर तुटेपर्यंत शांत न बसता सर्व लोकशाही मार्गांचा अवलंब करत राहील, हे त्याच्या वैचारिक वंशजांनी लक्षात ठेवावे एवढेच !
औरंग्याची कबर तुटेपर्यंत हिंदू सर्व लोकशाही मार्गांचा अवलंब करणार, हे औरंग्याच्या वैचारिक वंशजांनी ध्यानात घ्यावे ! |