Dihuli Murder Case : उत्तरप्रदेशातील दिहुली हत्याकांड प्रकरणी ४३ वर्षांनंतर निकाल – ३ आरोपींना फाशीची शिक्षा !

मैनपुरी सत्र न्यायालयाने दिला निकाल

फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील दिहुली गावात १८ नोव्हेंबर १९८१ या दिवशी झालेल्या २४ दलित हिंदूंच्या सामूहिक हत्या प्रकरणी १८ मार्चला मैनपूर विशेष जिल्हा न्यायालयाने ३ आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. यासमवेतच दोन दोषींना प्रत्येकी २ लाख रुपये आणि एका दोषीला १ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. दिहुली हत्याकांड प्रकरणी निकाल देतांना जिल्हा न्यायाधीश इंदिरा सिंह यांच्या न्यायालयाने २४ जणांची सामूहिक हत्या हा एक मोठा नरसंहार असल्याचे भाष्य केले. हा एक घोर गुन्हा आहे. यासाठी मृत्यूदंडापेक्षा अल्प शिक्षा नसावी, असे त्या म्हणाल्या. न्यायालयाने आदेशात स्पष्टपणे लिहिले आहे की, मृत्यूदंडाची शिक्षा उच्च न्यायालयात सादर केली जाईल आणि उच्च न्यायालयाकडून मृत्यूदंडाची शिक्षा निश्‍चित झाल्याखेरीज ती शिक्षा अमलात आणली जाणार नाही.

१. फाशीची शिक्षा झालेले रामपाल, रामसेवक आणि कॅप्टन सिंह हे त्यांचे कायदेशीर अधिकार वापरू शकतात आणि ३० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेला आव्हान देऊ शकतात.

२. फिरोजाबाद जिल्ह्यातील दिहुली गावात २४ दलितांची हत्या करण्यात आली होती. ही घटना १८ नोव्हेंबर १९८१ या दिवशी सायंकाळी ६ वाजता घडली होती. एका खटल्यातील साक्षीला विरोध करण्यासाठी शस्त्रांनी सज्ज असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने दिहुली गावात प्रवेश केला आणि महिला, पुरुष आणि मुले यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला होता.

३.  हा खटला मैनपुरी सत्र न्यायालयापासून अलाहाबाद उच्च न्यायालयापर्यंत न्यायालयात चालला. यानंतर १९ ऑक्टोबर २०२४ या दिवशी सुनावणीसाठी हा खटला पुन्हा मैनपुरी सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. जिल्हा न्यायाधिशांच्या आदेशानुसार विशेष दरोडा न्यायालयात यावर सुनावणी झाली.

संपादकीय भूमिका

उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच ! सत्र न्यायालयाला निकाल द्यायला २ पिढ्या गेल्या. आता तो खटला जर पुढे सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला, तर किती पिढ्यांनी न्याय मिळेल, असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे.