
१. दोन युवक युवतीला त्रास देत असल्याचे पाहून साधिका अस्वस्थ होणे
‘डिसेंबर २०२४ मध्ये अनुमाने दुपारी ३ वाजता मी एका दुकानात जात होते. तेव्हा मार्गातील देवीच्या मंदिरासमोर मला २ युवक आणि १ युवती दिसले. ‘तेथे काहीतरी गडबड आहे’, असे मला वाटले. मी मार्गाच्या कडेला थांबले. त्या २ युवकांच्या हातांत ‘सेल्फी स्टिक’ (छायाचित्र काढण्यासाठी भ्रमणभाष ठेवण्याचा स्टँड) होत्या. त्यातील एक युवक ‘सेल्फी स्टिक’वर भ्रमणभाष ठेवून युवतीचे छायाचित्र काढत होता, तर दुसरा युवक ‘सेल्फी स्टिक’ने त्या युवतीला पाठीमागून मारत होता. आरंभी मला वाटले, ‘ते मित्र-मैत्रिणी असतील’; पण ती युवती त्या २ युवकांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती आणि रडत होती. ते सर्व पाहून मी अस्वस्थ झाले.
२. युवतीला त्रास देणार्या २ युवकांना विरोध करण्यासाठी गुरुदेवांनी सूक्ष्मातून साधिकेला आधार देणे आणि साधिकेने प्रशिक्षणवर्गात शिकवल्याप्रमाणे युवकांवर प्रहार केल्यावर दोन्ही युवक पळून जाणे
त्यानंतर मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) सूक्ष्मातून म्हणाले, ‘हे गुरुदेवा, हे जे घडत आहे, ते तुम्ही पहात आहात ! मी आता काय करू ?’, हे मला कळत नाही.’ तेव्हा गुरुदेव सूक्ष्मातून मला म्हणाले, ‘संध्या, तू पुढे हो. मी आहे ना !’ त्याच क्षणी मी गुरुदेव, आई भवानी आणि श्रीकृष्ण यांना प्रार्थना करून पुढे पाऊल टाकले. ते दोन्ही युवक एकमेकांच्या शेजारी पूर्वेकडे तोंड करून उभे होते. मी त्यांच्या उजव्या हाताच्या बाजूने गेले. मी त्यांच्याजवळ जाता क्षणी माझा उजवा पाय वर उचलला गेला आणि त्या युवकांवर माझ्या पायाने जोरात ‘मार’ (स्वसंरक्षणाचा एक प्रकार) लागला अन् लगेच ते २ युवक खाली पडले. एका युवकाला त्याच्या डोळ्याजवळ पुष्कळ लागले; म्हणून त्याला लगेच उठता आले नाही; मात्र दुसरा युवक उठला आणि हातातील ‘सेल्फी स्टिक’ने माझ्यावर प्रहार करण्यासाठी उभा राहिला. तेवढ्यात मी माझ्या हाताने ‘रोध’ (स्वसंरक्षणासाठी समोरच्या व्यक्तीला अडवण्याचा एक प्रकार) केला आणि मी त्याच्याच ‘सेल्फी स्टिक’ने त्याला मारले. त्यानंतर ते २ युवक पळून गेले.

३. समाजातील व्यक्तीने साधिकेचे कौतुक करणे
एक आजोबा ही घटना पहात होते. त्या आजोबांनी मला त्यांच्याजवळ बोलावले. ते मला पैसे देत होते. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘आजोबा, मला पैसे नको. तुमचा आशीर्वाद हवा आहे.’’
४. कठीण प्रसंगाला सामोर जाण्याचे सामर्थ्य केवळ ईश्वरभक्ती आणि गुरुभक्ती निर्माण करू शकणे
मला स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे प्रकार परिपूर्ण येत नाहीत, तरीही गुरुदेव, आई भवानी आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे मी त्या दोन युवकांना विरोध करू शकले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपल्याला स्वसंरक्षण प्रशिक्षण किती उत्तम येते. त्यापेक्षाही आपली गुरु आणि ईश्वर यांच्यावरील भक्ती अन् श्रद्धा महत्त्वाची आहे. आपल्यामध्ये कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य केवळ ईश्वर आणि गुरुभक्तीच निर्माण करू शकतात.’
५. माझे धाडस पाहून त्या युवतीने सांगितले, ‘‘मला स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात जायचे आहे. तुम्ही आमच्या भागात प्रशिक्षणवर्ग चालू करा.’’ मी गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. संध्या कुरापाटी (वय १९ वर्षे), सोलापूर (११.१.२०२५)
(‘अशा साधिकाच राष्ट्राच्या शक्ती आहेत. सध्याच्या काळात महिलांवर वाढत्या प्रमाणात होत असलेले अत्याचार आणि लव्ह जिहादच्या घटना पहाता ‘सर्वत्रच्या महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे’, ही काळाची आवश्यकता आहे.’ – संकलक)
|